
>> दिलीप ठाकूर
चित्रपटाच्या झगमगाटाच्या क्षेत्रातील वास्तव हे अनेकदा तरी विचित्र, भयावह आणि अनाकलनीय असते. आज एका मराठी चित्रपट निर्मितीचा खर्च किमान दोन-अडीच कोटी व त्यात जवळपास एक कोटी रुपयाची पूर्वप्रसिद्धी आणि चित्रपट प्रदर्शित होताच काही कोटींची कमाई अशा मोठमोठय़ा खऱ्या, खोटय़ा आकडय़ांच्या बातम्यांतून येथे सगळेच आलबेल सुरू आहे असा एक समज निर्माण झाला असतानाच एकादा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक आर्थिक संकटात सापडल्याने वा अन्य एकाद्या कारणास्तव आत्महत्या करतो तेव्हा संपूर्ण मनोरंजक क्षेत्रालाच आश्चर्याचा धक्का बसतो. त्यास जवळून ओळखणाऱयांनाही त्याच्यावरील संकटाची कल्पना आलेली नसते. निर्माता व दिग्दर्शक आशीष उबाळे यांच्या आत्महत्येच्या बातमीने सगळेच सुन्न झाले. मुंबईत एकटेच राहत असलेले आशीष उबाळे हे आपल्या भावाला भेटण्यासाठी नागपूर येथे जातात काय आणि रामकृष्ण मठात जाऊन आत्महत्या करतात काय हे सगळेच अनाकलनीय. आशीष उबाळे यांचे भाऊ सारंग हे रामकृष्ण मठात सेवेकरी आहेत.
वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी या शांत स्वभावाच्या चित्रपट दिग्दर्शकाने आत्महत्या केली. या धक्कादायक गोष्टीवर सोशल मीडियात व्यक्त होताना मनोरंजन क्षेत्रातील काही जणांनी बेभरवसा, सतत कामे मिळतीलच याची खात्री नसणे, कामे मिळवण्यासाठी अनावश्यक तडजोडी करणे अशा काही गोष्टींवर भाष्य केले आहे.
आशीष उबाळे हे मूळचे नागपूरमधील महाल येथील. बालपणापासून ते कला क्षेत्रात कार्यरत होते. याच क्षेत्रात यायचे व काही भरीव काम करावे असा त्यांचा निश्चय होता. त्यानुसार पुणे शहरातील दूरदर्शन व चित्रपट अभिनय संस्थेतून त्यांनी दिग्दर्शकाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात येऊन त्यांनी हे माध्यम व व्यवसाय अधिक प्रमाणात जाणून घेऊन नवीन गोष्टी शिकत शिकत आपली वाटचाल केली. स्वतःची ओळख निर्माण केली. ‘गजरा’, ‘अग्नी’, ‘एका श्वासाचे अंतर’, ‘किमयागार’, ‘चक्रव्यूह’ अशा मनोरंजन उपग्रह वाहिनीवरील विविध थीमवरील मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. दैनंदिन मालिकांसाठीची धावपळ व गरज त्यांनी सांभाळली. मराठी चित्रपट क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकले आणि ‘गार्गी’, ‘आनंदाचे डोही’, ‘बाबुरावला’ पकडा या चित्रपटांची कथा कल्पना, पटकथा व दिग्दर्शन केले. ‘बाबुरावला पकडा’ या मसालेदार, मनोरंजक चित्रपटाचे विदेशात चित्रीकरण केले आणि केवळ विदेशात जाण्याची संधी मिळतेय म्हणून काही कलाकारांनी त्यात काम केल्याचे या चित्रपटातील काही कलाकारांनी कालांतराने आपल्या मुलाखतीतून सांगितले. साई व्हिजन निर्मित या चित्रपटात संजय नार्वेकर, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, समीर धर्माधिकारी, निशा परुळेकर, सई ताम्हणकर, सिया पाटील, अभिजीत चव्हाण, अमृता देशमुख इत्यादी कलाकार आहेत. त्यांनी कथा, पटकथा, लेखन व दिग्दर्शित केलेला रा फिल्म निर्मित ‘गार्गी’ हा चित्रपट कार्ल्सबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला होता. या चित्रपटात दीपाली सय्यद, गिरीष जयंत सडेकर व प्रकाश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आशीष उबाळे मराठी चित्रपट लेखन व दिग्दर्शनात आणखीन उल्लेखनीय कामगिरी करतील असा विश्वास असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.