लेख – आभाळमाया – ‘बेनू’चा धोका… आणि फायदा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

आपल्या सूर्यसंकुलात केवळ पृथ्वीसारखे ग्रहच नाहीत तर इतर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अनेक ग्रहांना कितीतरी उपग्रह आहेत. त्या सगळय़ा ‘चंद्रां’चा आढावा आपण या कॉलममधून एकदा घेतला होता, पण त्यांची प्रत्येकाची काही वैशिष्टय़े आहेत. त्याविषयी केव्हातरी सलग लिहूच, पण त्याव्यतिरिक्त मंगळ आणि गुरू यांच्यामधला, कदाचित एका ग्रहाच्याच तुकडय़ांमधून निर्माण झालेला ऍस्टेरॉइड बेल्ट किंवा लघुग्रहांचा पट्टा आहे. तसाच आणखी एक पट्टा नेपच्युनच्या  पलीकडे असून तो किपर बेल्ट म्हणून ओळखला जातो. अशा पट्टय़ांमध्ये काही लघुग्रह तर कितीतरी मोठी अशनी (महापाषाण) असतात. त्यात भर म्हणून अंतराळात इतस्ततः फिरणारे आणि केवळ सूर्याभोवती फिरणारे अशनीसुद्धा आहेतच. यापैकी काही निअर अर्थ म्हणजे पृथ्वीपासून बरेच म्हणजे काही लाख कि.मी.जवळ असून ते केव्हातरी पृथ्वीवर आदळू शकणारे ‘टांगते पाषाण’ आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम अमेरिकेच्या ‘नॅसा’सारख्या अंतराळ संशोधक संस्था करीत असतात.

या लेखात ‘बेनू’ नावाच्या एका 490 मीटर आकाराच्या आणि पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतून दरवर्षी 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत जातो. अर्थात त्याची कक्षा दरवेळी सारख्याच अंतराची नसते. त्यामुळे ‘पृथ्वीनिकट’ किंवा ‘निअर अर्थ’ अशनीत तो असला तरी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 2700 वर्षांत एखाद् वेळेसच आहे. तरीही 2175 ते 2199 म्हणजे याच शतकाच्या शेवटच्या पाव शतकात तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता दोन वेळ आहे. तोपर्यंत आपण त्याला रोखण्याइतकी प्रगती केली आणि त्यासाठी पृथ्वीच सुस्थितीत, आरोग्यसंपन्न ठवली तर पुढचे प्रश्न. पण ते जाऊद्या. यावेळी या ‘बेनू’विषयी थोडी वेगळी माहिती.

‘बेनू’ हे या पाषाणाचे नाव ठेवले गेले ते प्राचीन इजिप्तमधल्या सूर्यपक्ष्याच्या नावावरून. प्रत्येक संस्कृतीत एखाद्या पक्ष्याला महत्त्व आढळते. आपल्याकडे गरुडाला आहे तर पाश्चात्य देशांत ‘फिनिक्स’ला. तसाच इजिप्तचा ‘बेनू.’ आता हे नाव या महापाषाणाला द्यायचं कारण काय, तर सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातले द्रव्य त्याने जसेच्या तसे जपून ठेवले असावे म्हणून.

सूर्यमालेतल्या सर्व विशाल ग्रहांच्या जन्मानंतर त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांना असंख्य अशनी आणि धूमकेतूंचा मारा कोटय़वधी वर्षे सहन करावा लागला. त्यातून त्यामध्ये काही बदल झाले, पण ‘बेनू’सारखा छोटय़ाशा अशनीवर असे आघात झाले असण्याची शक्यता कमी. अन्यथा त्याचे अस्तित्वच धोक्यात आले असते. पण मग लक्षावधी अशनी अंतराळात भरकटत असताना ‘बेनू’च का? तर त्याचं उत्तर त्याच्या जडणघडणीत आहे. हा अशनी कार्बोनेशियस संयुगांनी भरलेला असून, पृथ्वीसारख्या जैविक उक्रांतीत त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. म्हणूनच संशोधकांना ‘बेनू’ म्हणजे सूर्यमालेतील जैविक उक्रांतीचा मागोवा घेण्यासारखी ‘टाइम कॅप्सूल’ किंवा ‘काळकुपी’ वाटली.

… आणि त्यांनी ‘बेनू’वरचे द्रव्य (दगड-माती) आणण्यासाठी 8 सप्टेंबर 2016 मध्ये ‘ऑरिस रेक्स’ नावाचे यान पाठवले. या यानाचा तिथे पोचून परतीचा एकूण कालावधी ठरला सात वर्षांचा. म्हणजे 24 सप्टेंबर 2023 पर्यंत ते ‘बेनू’वरचे द्रव्य घेऊन पृथ्वीर परत येईल. यातला महत्त्वाच टप्पा त्याने ठरल्याप्रमाणे पार पाडला. 20 ऑक्टोबर 2020 रोजी पृथ्वी इकडे ‘कोविड’ने ग्रासलेली असताना आणि सर्व व्यवहार स्तब्ध झालेले असताना तिकडे ‘ओरिस-रेक्स’ नियोजित कार्यक्रमानुसार ‘बेनू’ अशनीवर सुखरूप उतरले. मात्र या ‘छोटय़ाशा’ पाषाणभूमीवर उतरताना त्याचा एक ‘फ्लॅप’ दुखावला. तो दुरुस्त होताच त्याने या अशनीवरचे सुमारे 1 किलो द्रव्य गोळा केले आणि ‘बेनू’ची इतर माहिती कॅमेऱयात टिपायला सुरुवात केली.

एखाद्या (तुलनेने) छोटय़ा धूमकेतू किंवा अशनीवर अतिशय कौशल्याने एखादे यान उतरवणे हे संशोधकांचं अपूर्व यश आहे. पूर्वी ‘रोझेटा’ यानही धूमकेतूवर उतरले होते. तसेच हे ‘ऑरिस-रेक्स.’ 490 मीटर लांबीच्या या अंतराळातील पाषाणावर काही काळ स्वार होऊन या यानाने आपले काम उत्तम प्रकारे बजावले आहे. रॉकेटच्या खर्चासह या प्रकल्पाचा खर्च 1600 कोटी डॉलर इतका झाला, पण संशोधनासाठी तो आवश्यक होता. आता ऑरिस ‘बेनू’चा निरोप घेऊन पृथ्वीकडे निघाले आहे. ते ठरल्या वेळी अमेरिकेतील युटाहा राज्यात उतरेल… तो क्षण अंतराळ संशोधनातील आणखी एक सुवर्णक्षण ठरेल.

[email protected]