ठसा – भरतबुवा रामदासी

1139

>>  उदय जोशी

बीड जिल्हा संतमहंतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या पवित्र भूमीत राष्ट्रीय कीर्तनकार अशी आपली ओळख निर्माण केली ती भरतबुवा रामदासी यांनी. अत्यंत सोज्वळ अन् नम्र स्वभावाचे बुवा एकदा का कुणाला भेटले की, त्याच्या मनात घर करून जायचे. केवळ कीर्तनकार नव्हे, तर अध्यात्मातील चालते बोलते विद्यापीठच होते भरतबुवा रामदासी. शनिवारी दुपारी बीडमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल़े मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने अध्यात्म क्षेत्रच नव्हे, लाखो भाविक हळहळले आहेत.

गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या छोट्याशा गावातून कीर्तनाच्या माध्यमातून आपले नाव देशभर नेण्याचे काम भरतबुवा रामदासी यांनी केले. साधारणपणे पाच फूट उंची, अंगावर नेहरू शर्ट, शुभ्र धोतर आणि गळ्यात पांढरा गमजा, कपाळावर चंदनाचा टिळा अन् बुक्का असं त्यांचं रूप पाहिल्यानंतर कोणालाही ते तेजस्वी पुरुष आहेत हे चटकन लक्षात यायचं.आध्यात्मिक, ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पौराणिक असा कोणताही विषय असला तरी हजारो, लाखो लोकांच्या काळजाला भिडेल अन् मनाला पटेल अशा रसाळ वाणीतून कीर्तन सादर करणे ही भरतबुवांची खासीयत होती. बुवा कीर्तनकार होते, बुवा ह.भ.प. होते, बुवा माणुसकीचा झरा होते, बुवा पितृतुल्य होते, बुवा समाजाचा आधार होते, बुवा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. भरतबुवा रामदासी पंथातील होते. सहसा कीर्तनकार हे सहजपणे लोकांत मिसळून त्यांना देवाधर्माच्या कार्यात सहभागी करून घेणारे असतात. मात्र भरतबुवा हे देव आणि मनुष्य यांच्यामधील मैलाचा दगड होते. नारदीय असो की वारकरी अथवा सांप्रदायिक कीर्तन, ते महाराष्ट्रातील एवूâणच कीर्तन परंपरेचा चौकोनी चिरा होते. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्यासोबतच भगवंतभक्तीचे धडे देत. ‘कीर्तन महोत्सव’ ही बीडची ओळख होईल असे कधी कुणी सांगितले असते तर त्यावर कोणी कधी विश्वास ठेवला नसता, पण त्यांनी सलग सोळा वर्षे बीडमध्ये कीर्तन महोत्सव यशस्वी केला. ही ओळख त्यांना एका उंचीवर घेऊन गेली. नारदीय आणि वारकरी या दोन्ही परंपरांचे कीर्तन करण्यात त्यांचा हातखंडा होता. कीर्तनात पारंपरिक विषय आणि आख्यानाबरोबर त्यांनी जाज्वल्य देशभक्तीचे विषय मांडले आणि लोकप्रिय केले. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांवर अधिकारवाणीने त्यांनी केलेले भाष्य श्रोत्यांच्या मनात खोलवर रुजायचे आणि स्फुल्लिंग चेतवायचे. भाषेवर प्रचंड प्रभुत्व आणि ‘अभ्यासोनी प्रकटण्या’ची सवय यामुळे विषय कोणताही असला तरी बुवा त्यावर सखोलपणे भाष्य करतानाच विषय सहजसोपा करून सांगायचे. वक्तृत्वाबरोबरच सूर आणि तालावरदेखील त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. राष्ट्रीय स्तरावरील प्रखर वक्ते, भाष्यकार, मार्गदर्शक, मांगल्याचा पूजक, संवर्धक अशी ख्याती त्यांनी निर्माण केली होती. त्यांनी शेकडो विद्याथ्र्यांना कीर्तनाचे शिक्षण देऊन आध्यात्मिक क्षेत्र विस्तारण्याचे काम केले़ संपूर्ण आयुष्य त्यांनी कीर्तनासाठीच वेचले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेच स्वत:ला आध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेतले आहे. मुलगा ऋतुपर्ण आणि पत्नी प्रज्ञाताई रामदासी हेसुद्धा प्रभावी कीर्तनकार आहेत. भरतबुवांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या