उदे गं अंबे उदे! बिंब राजाची कुलस्वामिनी प्रभावती

>> राज चिंचणकर

मुंबईतील प्रभादेवी परिसराला ज्या देवीच्या नावावरून ‘प्रभादेवी’ हे नामाभिमान प्राप्त झाले, ती ‘प्रभावती’ देवी गेली अनेक शतके या ठिकाणी स्थित आहे. प्रभावती देवी ही अनेक ज्ञातींची कुलदेवता आहे. पुरातन म्हणून ओळखल्या जाणाऱया प्रभावती देवीच्या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे, इथे देवीच्या गाभाऱयात प्रभावती देवीसह कालिका व चंडिका देवींच्याही मूर्ती आहेत. त्यामुळे तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना इथे लाभते.

तत्कालीन मुंबई बेटावर 12व्या शतकात राज्य करणाऱया आणि माहीम येथे राजधानी स्थापन केलेल्या राजा बिंब याची ‘प्रभावती’ देवी ही कुलस्वामिनी! त्या काळी सतत परकीय आक्रमणे होत असत. त्यामुळे प्रभावती देवीची मूर्ती माहीमच्या खाडीत लपवली गेली होती. नंतर ती मूर्ती प्रभादेवी परिसरातील एका विहिरीत हलवण्यात आली. सन 1714 मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीतील श्याम नायक यांना झालेल्या दृष्टांतानुसार, ही मूर्ती त्यांनी त्या विहिरीतून बाहेर काढून तिथे मंदिर उभारले आणि कालांतराने पाठारे प्रभू समाजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या इतिहासाची नोंद आजही या मंदिरात असलेल्या शिलालेखावर दिसून येते. राजा बिंब याने, त्याचे प्रधान गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता असलेली कालिका देवी; तसेच पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता असलेली चंडिका देवी यांची प्रभावती देवीसह येथे स्थापना केली, असे सांगितले जाते.

प्रभादेवी मंदिरात आश्विन नवरात्रोत्सवासह पौष मासातील शाकंभरी पौर्णिमेलाही देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. शाकंभरी पौर्णिमेपासून पुढील दहा दिवस मंदिराच्या परिसरात जत्रा भरवली जाते. काळाच्या ओघात, मुंबापुरीतील अनेक जत्रोत्सवांवर कायमचा पडदा पडला असला तरी त्यातून प्रभादेवीची जत्रा मात्र आजही तिचे अस्तित्व टिकवून आहे.