साय-फाय – अफगाणिस्तानचा बायोमॅट्रिक डाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीचा अफगाणिस्तान आणि इतर जगाला किती धोका आहे याच्या चर्चा पुन्हा एकदा जोमाने रंगू लागल्या आहेत. या चर्चा सुरू असताना पूर्वी फारसे गांभीर्याने न घेतलेले आणि आता नागाच्या फण्यासारखे डोके काढून वर आलेले अनेक विषय विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चिंता वाढवू लागले आहेत. त्यातलाच एक प्रमुख विषय आहे, ‘अफगाणिस्तानचा’ बायोमॅट्रिक डाटा’ होय.

अफगाणिस्तानकडे दोन प्रकारचा ‘बायोमॅट्रिक डाटा’ आहे. एक अमेरिकन सैन्याने आपल्या अफगाणिस्तानातील वास्तव्यात गोळा केलेला व दुसरा खुद्द अफगाणिस्तान सरकारने आपल्या नागरिकांकडून गोळा केलेला. यातील अमेरिकन डाटा हा जास्त महत्त्वाचा मानला जातो. या डाटामध्ये दुभाषाच्या मदतीने अफगाणिस्तानातील दुर्गम भागात हिंडून तिथल्या नागरिकांशी संवाद साधत या नागरिकांचा बायो-डाटा अमेरिकन सैन्याने गोळा केला होता. प्रत्येक अफगाणिस्तानी नागरिकाला एकाच डाटा प्रणालीशी जोडणे हा यामागचा अमेरिकेचा उद्देश होता. मात्र या डाटामध्ये अफगाणी नागरिकांच्या सोबतच अमेरिका आणि नाटोच्या सैन्याला मदत करणाऱया लोकांची आणि ठेकेदारांची माहितीदेखील असल्याने हा डाटा अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

दुसऱया प्रकारचा डाटा हा विविध सरकारी योजनांसाठी खुद्द अफगाणी सरकारने आपल्या नागरिकांकडून मिळवला होता. यामध्ये अफगाणी नागरिकांच्या बोटांचे ठसे, रेटिना (डोळ्यांच्या पुतळ्या स्कॅन करणे) अशा महत्त्वाच्या बायोमॅट्रिक डाटाचा सहभाग आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या अधिकृत बायोमॅट्रिक कार्डसाठी ‘ई-तझकिरा’ अर्जाच्या रूपात प्राप्त झालेला 60 लाख अफगाणी नागरिकांचा डाटादेखील आहे. जोडीला 2019 च्या निवडणुकांसाठी मतदारांची नोंदणी करताना त्यांच्या बायोमॅट्रिक डाटासह त्यांचे फोटोदेखील गोळा करण्यात आले होते. या सगळ्याबरोबरच देशातील सर्व व्यापाऱयांची एकत्र नोंदणी करणे, मदरशामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित नोंद करणे अशादेखील काही योजना अफगाण सरकारने आखलेल्या होत्या. त्यासाठीदेखील बायोमॅट्रिक डाटाची गरज भासणार होती.

तर  असा हा मूल्यवान  ‘बायोमॅट्रिक डाटा’ आता तालिबानींच्या हाताला लागला तर? ही चिंता अनेकांना भेडसावत आहे. काही प्रमुख सुरक्षा तज्ञ व पत्रकारांच्या मते आतापर्यंत हा डाटा नक्की तालिबानींच्या हाती पोचलेला आहे आणि त्याच्या मदतीने त्यांनी अमेरिका आणि नाटोच्या सैन्याला मदत करणाऱया तसेच सैनिक व सुरक्षा संस्थांमध्ये काम करणाऱया लोकांना शोधून त्यांना लक्ष्य करायलादेखील सुरुवात केलेली आहे, तर दुसऱया तज्ञ गटाचे असे ठाम मत आहे की, हा डाटा आजही सुरक्षित आहे आणि मुख्य म्हणजे हा डाटा अत्यंत सुरक्षितपणे सेव्ह केलेला असल्याने तो तालिबानींच्या हातात पडला तरीदेखील ते त्याचा फारसा फायदा घेऊ शकत नाहीत. तर हा डाटा अफगाणिस्तानमध्ये सेव्ह केलेला नसून तो थेट अमेरिकेच्या ‘पेंटागन’ या सुरक्षा यंत्रणेशी जोडला असल्याचा दावादेखील केला जात आहे. त्यामुळे तो तालिबानींच्या हाताला लागण्याची कोणतीही शक्यता नाही.

मात्र चर्चेच्या या सर्व रणधुमाळीत 2016 साली घडलेली एक घटना अनेकांनी दुर्लक्षित केल्याचे स्पष्ट जाणवते आहे. 2016 साली एका अपहरण केलेल्या बसमधील यात्रेकरूंमधून सैनिकांची अचूक ओळख पटवण्यासाठी तालिबानींनी ‘बायो मॅट्रिक रीडर’चा उपयोग केला होता. नियोजनबद्ध अशा या हल्ल्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला होता. अर्थात, तालिबानींच्या हाताला असा कोणताही डाटा लागल्याचे वा त्यांनी त्याचा दुरुपयोग केल्याचे अधिकृत वृत्त मिळालेले नाही. मात्र मानवी प्रगतीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारे आधुनिक तंत्रज्ञान जर चुकीच्या हातात गेले तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याची चुणूक म्हणून या प्रकरणाकडे पाहण्यास हरकत नाही.

[email protected]