टिबुकली – गोंडस गुबगुबीत

2994

>> विद्या कुलकर्णी

टिबुकली. गोंडस गोजिरवाण्या रुपावरूनच या पक्ष्याला हे नाव मिळाले असावे.

टिबुकली हे पाणथळी पक्षी आहेत. पाणथळी पक्ष्यांचे एक वेगळेच सौंदर्य असते. काठावरून फोटो काढत असताना त्यांची पाण्यातील छबी ही घेता येते व ती अप्रतिम दिसते. पाण्यातील त्यांच्या कसरती न्याहाळणे फारच सुंदर अनुभव असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात तर सोन्याचा गिलावाच जणू लेवून ते स्वैरपणे विहार करतात असे वाटते.

टिबुकली ताजे पाण्याचे झरे, तलाव इत्यादी ठिकाणी आढळणारे पाणथळ पक्षी असून Podicipedidae कुटुंबातील आहेत. त्यांच्या एकूण 22 प्रजाती आहेत व काहीच प्रजाती हिवाळ्यात समुद्रकिनारी स्थलांतर करतात.

टिबुकली पक्ष्यांचे पंख दाट असून ते पाण्याने ओले होत नाहीत. पंखांच्या आतील पिसे काटकोनात असून टोकाला वक्र असतात. त्यामुळे त्याचा आधार घेऊन हे पक्षी अतिशय लीलया तरंगू शकतात. ते पाण्यामध्ये खोल जाऊन फक्त डोकं व मान पाण्यावर ठेवतात. पाण्यामध्ये पायाची हालचाल बेडकाप्रमाणे करून वेगाने सूर मारतात. हे पक्षी चोचीने पंख स्वच्छ करत थोडी पिसे काढून त्याची गोळी तयार करतात व ती पिलांना भरवतात. त्यामुळे पिलांचे जीवजंतूंपासून संरक्षण होते.

छोटी टिबुकली
या पक्ष्यांचे प्रजनन युरोप, आशिया, न्यू गिनिया आणि आफ्रिकेच्या बहुतेक भागात गोडय़ा पाण्याच्या तलावांच्या जवळ लहान वसाहतींमध्ये होते. बहुतेक पक्षी हिवाळ्यात अधिक मोकळ्या किंवा किनारपट्टीच्या पाण्याजवळ जातात, परंतु ज्या भागात थंडीत पाणी गोठते त्या भागातील पक्षी दूरवर स्थलांतर करतात. प्रजननाव्यतिरिक्त काळात हे पक्षी अधिक मोकळ्या पाण्यात फिरतात, कधी कधी छोटय़ा किनाऱयांजवळही दिसतात. हे पक्षी तपकिरी रंगाचे, गोंडस, गुबगुबीत, गोलाकार आकाराचे असल्यामुळे पाण्यामध्ये उठून दिसतात. प्रजनन काळात या पक्ष्यांचे गाल, गळा व मान लालसर तपकिरी असून डोकं, छाती, पाठ व मानेची मागील बाजू काळ्या रंगाची असते. बगल गडद तपकिरी, चोच काळी असून तिचे टोक फिकट रंगाचे असते. चोचीच्या सुरुवातीला पिवळ्या रंगाचा ठिपका असतो. बुब्बुळं लालसर तपकिरी असून पाय गडद हिरवे असतात. प्रजननाव्यतिरिक्त हे पक्षी फिकट रंगाचे दिसतात. किशोरवयीन पक्षी फिकट रंगाचे असून डोक्याची टोपी, मान व पाठ गडद रंगाची असते. गाल, मानेची बाजू व बगल पिवळसर तपकिरी व छाती, मानेची खालील बाजू लालसर तपकिरी असते. या पक्ष्यांचे खाद्य मुख्यत्वे पाण्यातील छोटे मासे, छोटे व मोठे कीटक, किडे, लार्वा, विशेषतः मेफेलीज, दगडफूल इत्यादी असते. हे पक्षी खूप गोंगाट करतात.

हे पक्षी पोहण्यात व सूर मारण्यात कुशल असून आपल्या भक्ष्याचा पाण्याखाली पाठलाग करतात. या पक्ष्यांचे पाय शरीराच्या मागील बाजूस असल्यामुळे अतिशय कुशलतेने पोहतात, परंतु त्यामुळे जमिनीवर गोंधळून जातात, त्यांना चालणे अतिशय जड जाते. भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठी पाण्याखाली जाऊन डोकं फक्त वर ठेवतात. धोका वाटल्यास 20 फुटांपर्यंत खोल जाऊन 30 सेकंदांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात. पाण्याखाली ते इतके चटकन वेगात जातात, त्यामुळे त्यांना hell-diver / पाणी चुटकी म्हणतात. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ पावसाळ्यात असतो. या पक्ष्यांची घरटी पाण्याच्या काठावर असतात. सुरक्षिततेसाठी घरटे पानांनी / पालापाचोळ्यांनी झाकून ठेवतात. मादी 4 ते 7 अंडी देते. या पक्ष्यांचे आयुष्यमान 10 – 15 वर्षे असते. या पक्ष्यांचे फोटो मी भरतपूर व मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काढले आहेत.

मोठी टिबुकली
मोठी टिबुकली हे पक्षी संपूर्ण आशिया, युरोपमध्ये आढळतात. हिवाळ्यात थंड प्रदेशातून स्थलांतर करून ताज्या पाण्याचे तलाव आणि जलाशय किंवा किनारपट्टीवर येतात. प्रजननाच्या काळात या पक्ष्यांचे रूप नटवे दिसते. या पक्ष्यांचे खाद्य मासे, कठीण कवचाचे जलचर छोटे प्राणी, कीटक, छोटे बेडूक इत्यादी असते. हे पक्षी पोहण्यात व सूर मारण्यात कुशल असून पाण्याखालीच राहून त्यांचे आवडते भक्ष्य माशांचा पाठलाग करतात. या पक्ष्यांचे प्रियाराधन फारच उत्कृष्ट व प्रसिद्ध आहे. या काळातील त्यांचे नृत्य एक नेत्रदीपक दृश्य असते. एकमेकांना बराच वेळ ते साद घालतात, नंतर नृत्य करतात, पाण्यामध्ये सूर मारतात, परत वर येऊन चोचीतील पानवेल एकमेकांना देतात. नर व मादी आपापले आवडते पिलू निवडून त्याचीच काळजी घेतात व पोहायला शिकवतात. या पक्ष्यांचे आयुष्यमान 10 वर्षे असते. या पक्ष्यांचे फोटो मी भरतपूरमध्ये काढले आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या