होला

>> विद्या कुलकर्णी

पारवे, कबुतरं. आपल्याकडे माणसांमुळे यांचा होणारा वावर जरा त्रासदायक असला तरी महाराष्ट्राबाहेरील कबुतरं आपल्या देखणेपणाचा आब राखून असतात.

पक्ष्यांची फोटोग्राफी मी 3-4 वर्षांपासून करत आहे. कबूतर, पारवा, होला हे पक्षी कोलंबिडे आणि ऑर्डर कोलंबिफ्स कुटुंबामधले आहेत. त्यांच्या 310 प्रजाती आहेत. शहरांमध्ये आजूबाजूस सर्वत्र दिसणारे, राखी रंगाचे पक्षी हे ‘रॉकपिजन’ आहेत.कबुतर हे पक्षी ‘सहारा वाळवंट, अंटार्टिका, त्याच्या सभोवतालची बेटे आणि उच्च आर्क्टिक’ वगळता पृथ्वीवर सर्वत्र आढळतात.जागतिक युद्धामध्ये कबुतरांचा उपयोग दूतासारखा केलेला होता कारण कितीही लांबवर गेले तरी ते न चुकता मूळ जागी परत येतात. छोटे कॅमेरे बसवून माहिती गोळा करण्यासाठीही त्यांना शत्रूच्या प्रदेशात पाठवले जायचे. हे पक्षी त्यांचे घरटे, काडय़ा व कचऱयाचा वापर करून झाडावर, अडगळीच्या जागेवर किंवा जमिनीवर बांधतात. एका वेळी मादी 1-2 अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले 7 – 28 दिवसांनी घरटय़ाबाहेर पडतात. ह्यांचे वैशिष्ट असे की नर व मादी दोघांनाही प्रजननाच्या काळात अंगावर दूध येते व ते गळ्याजवळील पिशवीत साठवले जाते. त्या दुधानी ते पिल्लांचे पोषण करतात. ह्यांच्या किशोरवयीन पक्ष्याला “squabs” म्हणतात.

पाचू होला
पाचू होला नराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पांढरा पट्टा असतो. हा फरक सोडून नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकेकटे किंवा लहान समूहाने राहणे पसंत करतात. सदाहरित, पानगळीची, बांबूची जंगले येथे ‘पाचू होला’ अधिक प्रमाणात आढळतात. जमिनीवर पडलेल्या विविध प्रकारच्या बिया खाणे या पक्ष्यांना आवडते. ‘पाचू होल हा तमिळनाडू राज्याचा ‘राज्यपक्षी’ आहे.

खवलेदार होला
हे पक्षी जोडीने किंवा समूहाने फिरतात. दुपारच्या वेळी भरपूर पाने असलेल्या झाडांच्या फांदीवर विश्रांती घेतात. मादी प्रजाननांच्या काळात एकापेक्षा अधिक वेळा अंडी घालते. अशावेळी अगोदरच वापरलेल्या घरटय़ाचा उपयोग करतात. त्यामुळेच त्यांच्या घरटय़ाला कावळे, मॅगपाय, मांजरी व सापापासून धोका संभवतो. ह्या पक्ष्यांचे खाद्य मुख्यत्वे अंबाडीच्या, सुर्यफूलाच्या बिया, गहू, ज्वारी व बाजरीचे दाणे, राजगिरा असते. गोगलगायी तत्सम प्राणीही खातात.

ठिपकेवाला होला
वृक्षाच्छादित भाग, शेतें, झुडपे अशा ठिकाणी ठिपकेवाला होला पक्ष्यांचे वास्तव्य असते. हे पक्षी जोडीने किंवा छोटय़ा समूहाने फिरतात. झाडाच्या खोडांवर व खडकांवर उडय़ा मारणे हा त्यांचा आवडता छंद आहे. ह्या पक्ष्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण ज्यास्त असते. त्यांचे खाद्य बी, बियाणे, जमिनीवर पडलेली फळे, इतर वनस्पतींच्या बिया असते. क्वचित हे पक्षी कीटक सुद्धा खाताना आढळतात. मासे खाताना त्याला अगोदर हवेत उडवून डोक्याच्या बाजूने खातात. ह्यांचे प्रजनन वर्षभर चालते. छोटया झाडाझुडूपात किंवा जमिनीवर किंवा बांधकामावर फांद्या वापरून कपाच्या आकाराचे घरटे बांधतात.
ह्या सर्व प्रजातींचे नर जेव्हा मादीस रिझवण्यासाठी ‘गुटर्गु गुटर्गु’ करत गळा फुगवून गोल गोल फेया मारतात तेव्हा ते दृश्य खूप गमतीशीर वाटते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या