चष्मेवाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विद्या कुलकर्णी

इवल्याशा डोळय़ाभोवती पांढरे वर्तुळ म्हणजे या छोटय़ाशा पक्ष्याने रुबाबात चढवलेला चष्माच वाटतो.

चंचल चुळबुळ मंजुळ किलबिल ना कसली तमा
शुभ्र कडे नेत्राभोवती भासे जणू चष्मा
इवलासा नाजूक पण मोहक तुझा करिष्मा
प्रसन्न होई मन पाहुनी निरंतर तुझा गरिमा

प्रथम मी या पक्ष्याला बघितले तेव्हा त्याचे छोटेसे सुंदर रूप व कुतूहल पाहून तो सतत कुठल्या तरी कामगिरीवरच आहे का, असा प्रश्न पडला. त्याच्या डोळ्यांभोवतीचे पांढरे वर्तुळ बघून त्याचे ‘चष्मेवाला’ नाव अगदी योग्य वाटले. त्यांचे वास्तव्य उष्ण कटिबंधातील आशियातील जंगलांमध्ये सापडते व प्रजननही तिथेच होते. हिंदुस्थानी उपमहाद्वीपांपासून दक्षिणपूर्व आशिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि कराची भागातील मॅन्ग्रोव्ह क्षेत्रांवरही हे पक्षी आढळतात. या बेटांवर अधिक कीटक असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे जगू शकतात.

पश्चिम हिंदुस्थानच्या शुष्क वाळवंट प्रदेशात मात्र हे पक्षी दुर्मिळ आहेत. फळा-फुलांमधील मध व कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य असते. हे पक्षी बऱयाच वेळा गटागटाने, समूहाने वावरतात. प्रजननाच्या हंगामात फक्त वेगळे होतात. हे पक्षी झाडाझुडपांमध्येच राहतात व जमिनीवर अगदी क्वचितच उतरतात. हा पक्षी लहान, सुमारे 8-9 सें.मी. लांबीचा आहे. नर व मादी सारखेच आहेत. हिरवट पिवळा रंग वरच्या बाजूस, पिवळा गळा, राखाडी पांढरा रंग खालील बाजूस, पांढरा चष्मा लावल्यासारखे डोळे व काळसर पट्टा डोळ्यांपासून चोचीपर्यंत असा हा अतिशय सुबक, कमनीय पक्षी आहे. या विस्तृत प्रजातींच्या सुमारे 11 उपप्रजाती आहेत. हिरवट पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमुळे त्यांच्यातील भिन्नता दिसून येते.

त्यांचा प्रजनन हंगाम फेब्रुवारी ते सप्टेंबर आहे, परंतु एप्रिलमध्ये त्यांचे प्रजनन सर्वात जास्त प्रमाणात होते. हा पक्षी झाडाच्या फांदीच्या खोबणीमध्ये वाटीच्या आकाराचे छोटेसे घरटे बांधतो व त्यासाठी गवत, पानांच्या शिरा, झाडांवरील जाळी, कोळिष्टकं, काडय़ा-काटक्या इत्यादींचा वापर करतो. घरटे साधारण चार दिवसांत तयार होते. थोडय़ाच दिवसांत मादी दोन फिकट निळी अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून 8-10 दिवस अंडी उबवतात. या पक्ष्याची शीळ व त्यांची साद मंजुळ असते. हे पक्षी सतत इकडून तिकडून उडत एकमेकांना साद देतात व खूप आनंदी दिसतात. बऱयाच वेळा झाडाच्या फांदीवर उलटे टांगलेले बसतात. कधी कधी तर एकत्र चाळीस चाळीस पक्ष्यांचा थवा नजरेस पडतो. हे पक्षी सतत पानांमध्ये, पाण्याच्या झऱयांमध्ये कीटक शोधत असतात व फुलांवरही खूप वेळ बसतात.

हे पक्षी जरी खूप उंचीवरून लांब उडत नसले तरी कधी कधी वादळवाऱयाबरोबर बरेच लांब स्थलांतर करतात. असेच काही पक्षी 1980च्या दशकात कॅलिफोर्नियामध्ये गेले. त्यांना आमिष दाखवून, खोटी साद घालून कैद केले गेले. असा क्रूरपणा बघून मात्र वाईट वाटते. पक्ष्यांचे संवर्धन करणे, त्यांना अनुकूल वातावरण तयार करणे हे फारच महत्त्वाचे आहे.

हिंदुस्थानात मला गणेशगुडी व सत्ताल येथे या पक्ष्यांची फोटोग्राफी करता आली. अतिशय नाजूक असे त्यांचे सौंदर्य मला खूपच भावले. त्यांचे कधी प्रेम करणे, कधी रुसणे, कधी एकमेकांच्या भोवती उडणे, कधी सवंगडय़ाबरोबर बागडणे… सर्वच दृश्ये अतिशय विलोभनीय दिसली. असे सुंदर दृश्य पाहिल्यावर निसर्गाचे प्रेम, आस्था अधिकच वाढते व आपापल्या परीने आपण निसर्गाची काळजी घेऊ लागतो.

[email protected]