दिल्ली डायरी – मोदी, शहा आणि राजनाथ सिंग…!

>> नीलेश कुलकर्णी

मोदी तूर्तास पंतप्रधानपदावरून जाणार नसले तरी मोदींनंतर कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात सातत्याने विचारला जात आहे. त्यामागे काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही संदर्भ दिले जात आहेत. मोदींसंदर्भात काही सनसनाटी गोष्टी येत्या काही दिवसांत पुढे येतील, असे कयास लावले जात आहेत. सरसंघचालकांनीही मोदींच्या वारसदाराबद्दल स्पष्ट सांगितले आहे. ‘सध्या मोदी हेच पंतप्रधान आहेत. मात्र त्यांच्या वारसदाराची निवड करायची वेळ येईल तेव्हा मोदींचे मत महत्त्वाचे असेल,’ असे सांगत मोहन भागवतांनी पंतप्रधानपदाच्या पुढच्या स्पर्धेची जणू फीतच कापली आहे

दिल्लीच्या राजकारणात सध्या पंतप्रधानपदासाठी कोण प्रबळ यावरून अमित शहा व राजनाथ सिंग यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजनाथ सिंग हे भाजपातले नेमस्त गृहस्थ मानले जातात. सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राखून राजकारण करण्याची कला ते आपले गुरू अटलबिहारी वाजपेयींकडून शिकले आहेत. कधी कोणाला व्यक्तिगतरीत्या दुखवायचे नाही, हा त्यांच्या राजकारणाचा शिरस्ता. त्यामुळे आजही सत्तापक्षाचा एखादा निरोप सोनिया किंवा राहुल गांधी यांना द्यायचा असेल तर ती जबाबदारी हमखास राजनाथ यांच्यावर असते. मात्र असे हे ‘सर्वसमावेशक’ राजनाथ अचानक पंडित नेहरूंवर घसरले. नरेंद्र मोदींचे ‘पंडित नेहरू प्रेम’ जगजाहीर आहे. दिल्लीच्या सध्याच्या कडाक्याच्या थंडीलादेखील मोदी हे नेहरूंना जबाबदार धरू शकतात! मात्र राजनाथ यांनी कधी नेहरू वगैरे विषयांना हात घातला नव्हता. राजनाथ यांनी संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वी ‘मुहूर्त’ साधत पंडित नेहरूंवर जहरी टीका केली. नेहरूंना सरकारी पैशांमध्ये मशीद बांधायची होती, असे विधान केले. जे राजनाथ गेली अकरा वर्षे चिडीचूप आहेत. जे राजनाथ खासगीत बोलताना ‘मै तो सिर्फ सलामी लेने का मंत्री हूं, मेरे पास कोई अधिकार ही नही है,’ अशी खंत बोलून दाखवायचे ते अचानक नेहरूंवर घसरले त्याला कारण ही पंतप्रधानपदाची शर्यत असल्याचे सांगितले जात आहे. राजनाथ तसे संघाचेही जवळचे आहेत. त्यात उत्तर प्रदेशचे ठाकूर, त्यामुळे उत्तरेच्या पट्टय़ात ‘फीलगुड.’ त्यामुळे सध्या राजनाथ यांनी या स्पर्धेत उडी मारलेली दिसते आहे. या स्पर्धेतील सर्वात प्रबळ दावेदार हे अमित शहा. ते यासाठी की ते मोदींचे अनेक वर्षांपासूनचे खासमखास आहेत. शहा हे किती शक्तिशाली आहेत, हे वेगळे सांगायला नको. मात्र, संसदेत कॅमेऱ्याचा ‘फोकस’ फक्त आपल्यावरच कसा राहील, याची तजवीज मोदींनी यापूर्वी केली होती. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिले. शहा हे दोन्ही सभागृहांपैकी एकाही सभागृहाचे नेते नाहीत, हे उल्लेखनीय! शहा यांच्या चुनाव सुधारावरील उत्तरावेळी कधी नव्हे ते त्यांच्या पत्नी सोनम या लोकसभेच्या गॅलरीत होत्या. गेल्या अकरा वर्षांत हे चित्र कधी दिसले नव्हते. ते बोलके मानावे लागेल. बघूयात पळता पळता कोण पुढे पळतो ते..

सौगातदा, तुम्हीसुद्धा…?

लोकसभेत सध्या ई-सिगारेटचा मुद्दा गाजतो आहे. संसद भवन हे देशाच्या लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. मात्र या पावित्र्याला नासवणाऱ्या गोष्टी यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत व सध्याही घडत आहेत हे दुर्दैव. तृणमूल काँग्रेसचे विद्वान खासदार सौगात राय हे संसद भवन परिसरात ई-सिगारेट ओढतात, असा आरोप भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी भरलोकसभेत केला आणि प्रकरण गाजले. पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर असताना अशी आरोपांची धुराडी उडाल्याने साहजिकच त्यावरून गोंधळ होणारच होता. त्यातच सौगात राय यांनी मी सिगारेट ओढतो आणि यापुढेही ओढणारच, असे उर्मट उत्तर दिल्याने लोकसभा सभापतींना त्याची  दखल घेऊन कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. वास्तविक, निवडणुका तोंडावर असताना, असे ‘आ बैल मुझे मार’ पद्धतीचे राजकारण करण्याची तृणमूलला काहीएक गरज नाही. सौगात राय हे केवळ बंगालमधलेच नाही तर देशातले एक विद्वान खासदार म्हणून ओळखले जातात. संसदीय नियम व प्रणालींत तर त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांना देशातील प्रत्येक मतदारसंघाची, प्रश्नांची खडान्खडा माहिती असते. त्यामुळे गमतीने काही तरुण  खासदारांनी त्यांना ‘गुगल अंकल’ असे टोपणनाव दिले आहे. या गुगल अंकलनी आपल्याबद्दल असणारा आदर कायम राखायला हवा. यापूर्वी लोकसभेत भगवंतसिंग मान यांच्यावरून वाद झाला होता. स्वच्छ कारभाराची हमी देणाऱ्या आम आदमी पार्टीने त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री करून मान यांच्या या ‘अलौकिक प्रतिभे’चा गौरव केला होता. सौगातदांनी पेटवलेल्या ई-सिगारेटमुळे कोणाचा फायदा होतो व कोणाला चटके बसतात, हे समजेलच.

संसदीय समित्यांची देणगी

भारतीय संसदेच्या इतिहासात संसद सदस्यांना मोठे अधिकार प्रदान करणाऱ्या संसदीय समित्यांची निर्मिती करणारे लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले. चाकूरकर हे लोकसभेच्या इतिहासातील सर्वात प्रभावी व यशस्वी सभापतींपैकी एक होते. मात्र, ते गाजले ते 26/11 च्या  हल्ल्यानंतर त्यांनी बदलेल्या कपडय़ांमुळे. या एकाच कृतीमुळे त्यांना गृहमंत्रीपद गमवावे लागले. गमतीचा भाग म्हणजे केवळ एकदा ड्रेस बदलला म्हणून शिवराज पाटील यांच्यावर तुटून पडणारा तोच मीडिया आताचे पंतप्रधानांच्या ‘कलर सेन्स’वर व त्यांच्या दिवसातून अनेकदा बदलल्या जाणाऱ्या कपडय़ांवर कौतुकाचा वर्षाव करतो. काळाचा महिमा असा असा अगाध व अगम्य असतो! मोदींच्या ड्रेसिंग सेन्सवर टीव्ही डिबेट होतात. शिवराज पाटील हे देशाचे गृहमंत्री म्हणून भलेही यशस्वी ठरले नसतील. मात्र लोकसभा सभापती म्हणून त्यांनी केलेले काम अजोड आहे. लोकसभेची लायब्ररी अद्ययावत करणे, लोकसभा व राज्यसभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासंदर्भातही त्यांच्या कार्यकाळात मोठे निर्णय घेण्यात आले. संसदेच्या परिसरांत त्यांनी मोठय़ा सुधारणा घडवून आणल्या. लोकसभेचा सभापती कसा निष्पक्ष असला पाहिजे, हे शिवराज पाटलांनी दाखवून दिले. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाला आध्यात्मिक अंगही होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. ‘दासबोधा’चे इंग्रजी भाषांतर करण्याचे मोलाचे कार्य शिवराज पाटील यांनी करून दाखविले. दिल्लीत मराठी माणूस यशस्वी होत नाही, असे नेहमी बोलले जाते. मात्र हिंदी, इंग्रजीवर मजबूत पकड व सोबतीला मोठा व्यासंग असल्याने शिवराज पाटील दिल्लीच्या राजकारणात कमालीचे यशस्वी झाले. शिवराज यांच्या निधनामुळे देशाने संसदीय लोकशाहीतील एक विद्वान व निःस्पृह नेता गमावला आहे.

[email protected]