
>>सुधाकर वसईकर
गझल हा स्वतंत्र काव्य प्रकार असल्याची स्पष्ट जाणीव माधव जुलियन यांनी करून दिली, तर सुरेश भट यांनी मराठीत गझल रुजविण्याचे महान कार्य केले आहे. त्यानंतर त्यांचे अनेक शिष्य निर्माण झाले. वैभवशाली गुरू-शिष्य परंपरेत गझलेचा प्रचार आणि प्रसार झाला. गेल्या दशकात तर शेकडोनीं गझलसंग्रह प्रकाशित झाले असतील. ही बाब मराठी गझलेसाठी नक्कीच भूषणावह असली तरी दर्जेदार लिहिणारे असे कितीसे आहेत? अशा पार्श्वभूमीवर आद्य गझल संशोधक आणि ज्येष्ठ गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा ‘मराठी गझल ः 1920 ते 1980’ हा संशोधननिष्ठ समीक्षा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो.
प्रस्तुत समीक्षापर ग्रंथात संदर्भासहित स्पष्टीकरण, संदर्भ सूची, परिशिष्टे, सनावळ, आकडेवारी आदींची क्लिष्टता न वाटता 298 पृष्ठसंख्या असलेला माहितीवजा ग्रंथ वाचनीय झाला आहे. गझलेचा व्यासंग, अफाट वाचन असल्याने डॉ. सांगोलेकर यांनी स्पष्टीकरणासहित ओघवत्या विवेचन शैलीने अनेकविध संदर्भांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून ग्रंथाची यथायोग्य मांडणी केली आहे. गझलेची वृत्त योजना, काफिया व रदीफ हे यमकांचे प्रकार व त्यांचे नियम, द्विपदींची संख्या, त्यांची स्वयंपूर्णता आणि मतला तसेच मक्ता, द्विपदींचा वेगळेपणा हे गझलेचे तंत्र त्यांनी एकूण मोठय़ा सात विभागांतून विस्तृतरीत्या स्पष्ट केले आहे. शिवाय गझलेचे पारिभाषिक शब्द आणि त्याचे मराठीतील अर्थ यांसारखी आणखी तीन परिशिष्टे व आद्य गझलकार सुरेश भट आणि त्यानंतरच्या गझल समीक्षकांचे प्रस्तुत ग्रंथावरील निवडक महत्त्वपूर्ण अभिप्रायांचे चौथे परिशिष्ट जोडले असल्याने ग्रंथाचे संदर्भ मूल्य अधोरेखित होते.
महत्त्वपूर्ण प्रकरणांमधून माधव जुलियन आणि सुरेश भट या मराठीतील आद्य गझलकारांचा तपशीलवार विचार केला असून त्यांचे गझल विश्वातील स्थान, योगदान यांचे विवेकपूर्ण विवेचन केले आहे. माधव जुलियन यांनी फार्सी गझल मराठीत जशीच्या तशी न आणता थोडा वेगळा विचार केला. मात्र स्वतंत्र, स्वयंपूर्ण द्विपदी आणि यमक बंधने ही गझलेची प्राणभूत वैशिष्टय़ेच त्यांना दोषास्पद वाटली. त्यांनी गझलेला भावगीताचे किंवा भावकवितेचे रूप प्रदान केले. ‘गझल’ या काव्य प्रकारात बदल करून अर्थात परिष्करण करून त्याचा मराठीत परिचय करून दिला. या गझल विचारधारेमुळे तंत्रशुद्ध, खरीखुरी, अस्सल गझल मराठीत रुजू शकली नाही. त्यानंतर बऱयाच वर्षांनी सुरेश भट यांनी खऱया अर्थाने गझल काव्य प्रकार यथामूल स्वरूपाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना कमालीचे यश येऊन खऱया अर्थाने मराठी गझल युग अवतरल्याचे डॉ. सांगोलेकर यांनी पाचव्या दीर्घ प्रकरणात साधार स्पष्ट केले आहे.
डॉ. सांगोलेकर गझलेला समर्पित आयुष्य जगत आले आहेत. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात 1920 ते 1985 मधील गझलेचा त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून साक्षेपी आढावा घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शेकडोच्या वर काव्यसंग्रह अभ्यासले आहेत. तत्कालीन मोठय़ा कवींच्या कविता तपासून कुसुमाग्रज यांनी एक गझल, बा. भ. बोरकर यांनी पाच गझल आणि शांता शेळके यांनी एक गझल लिहिल्याचे निष्कर्ष तर काढलेच; पण इतर छोटय़ा मोठय़ा कवींच्या कविता तपासून कोणी किती गझल लिहिल्यात हे अचूक आकडेवारी आणि गझल रचनेतील द्विपदी, वृत्त आणि गझलेच्या संपूर्ण आकृतिबंधाचे तपशील बारकाव्यानिशी मांडून काढलेले निष्कर्ष थक्क करणारे आहेत. म्हणूनच अथक परिश्रमातून लिहिलेला प्रस्तुत संशोधननिष्ठ समीक्षा ग्रंथ विश्वसनीय वाटतो.
या ग्रंथाला केवळ टीका ग्रंथ न म्हणता मराठी गझलेची केलेली परखड समीक्षा म्हणावी लागेल. ज्यांनी तंत्रशुद्ध, अस्सल, खरीखुरी मराठी गझल लिहिली आणि त्याप्रमाणे आजवर लिहिली जातेय असे आद्य गझलकार सुरेश भट यांच्याही कविता तपासून त्यातील काही कविता या नाटय़गीते, तर काही भावगीतात मोडतात हेही आवर्जून नमूद करतात. खऱया अर्थाने शास्त्रशुद्ध गझलेचा वेध घेणारा ऐतिहासिक ग्रंथ वाटतो. मराठी गझलेच्या विचारात मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. प्रकरणानुक्रमे आलेले काही संदर्भ आणि व्याख्या यांची झालेली पुनरावृत्ती टाळली असती तर प्रकरणं आटोपशीर झाली असती. अर्थात प्रस्तुत समीक्षा ग्रंथ गझल लिहिणाऱया नवकवींना मार्गदर्शक तर आहेच; पण जाणकारांनीदेखील संदर्भ ग्रंथ म्हणून संग्रही ठेवावा असा आहे.
मराठी गझलः 1920 ते 1985
लेखक ः डॉ. अविनाश सांगोलेकर
प्रकाशक ः मिहाना पब्लिकेशन्स
पृष्ठे ः 298 ??मूल्य ः 350/-