प्रासंगिक – प्रमुख स्वामी महाराजांची जन्मशताब्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश उदावंत

संयुक्त राष्ट्रांशी (यूएनओ) संलग्न असणाऱया विश्वव्यापी बोचासणवासी श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामी नारायण संस्थेचे पाचवे अध्यक्ष ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिनाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असून अहमदाबाद येथील प्रमुख स्वामीनगरामध्ये जन्मशताब्दी सोहळा सुरू आहे. यानिमित्त प्रमुख स्वामीजींच्या जीवनकार्याचा हा आढावा.

हिंदुस्थानची भूमी ही संत, महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. धर्मक्षेत्राच्या पवित्र समृद्ध वारशातूनच समाजाचा रहाटगाडा पुढे सरकतो आहे. या अविरत वाटचालीत संतांची शिकवण व मार्गदर्शन मोलाची साथ देत राहिली आहे. गुजरात राज्यातील बोचासणवासी श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) यांनी धर्म प्रबोधन व धर्मप्रसाराची मुहूर्त रोवून धर्मपताका सातासमुद्रापार नेली. समाजकार्यासोबतच धर्मकार्य करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेत आहे. हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. विश्व अध्यात्मिक गुरू म्हणून प्रमुख स्वामी महाराज यांचा सन्मान झालेला आहे. गुजरातेतील चाणसद (जि. बडोदा) येथे त्यांचा 7 डिसेंबर 1921 मध्ये जन्म झाला. वयाच्या 94 वर्षी त्यांचे सारंगपूर येथे महानिर्वाण झाले. लहान वयापासूनच ते हुशार होते. बालवयात त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. यातूनच ते स्वामीनारायण संस्थेच्या धर्मकार्यात सक्रिय झाले. ही अविरत अमृततुल्य सेवा त्यांना गुरूपदापर्यंत नेणारी ठरली.

भगवान स्वामी नारायण (3 एप्रिल 1781-1830) यांनी आपल्या 49 वर्षांच्या प्रकटकालांत धर्मकार्याचा प्रसार केला. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच वेद, पुराणांचा सखोल अभ्यास करून ‘वचनामृत’, ‘शिक्षापत्री’ आदी अद्वितीय ग्रंथनिर्मिती केली. त्यांच्याच कार्याचा प्रसार पुढे नेण्यासाठी अनुयायी अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी (1785-1867) यांनी स्वामीनारायण संप्रदाय निर्माण केला. संप्रदायाचे हे पहिले वंदनीय गुरुवर्य होत. या परंपरेत ब्रह्मस्वरूप प्रागजी भक्त उपाख्य भगतजी महाराज हे दुसरे, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज तिसरे, ब्रह्मस्वरूप योगीजी महाराज चौथे, तर ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज हे पाचवे गुरू तथा वारस ठरले आहेत. प्रमुख स्वामी महाराजांच्यानंतर सध्याचे महंत स्वामीजी महाराज हे सहावे तथा वारस म्हणून संस्थेचा समृद्ध वारसा पुढे चालवीत आहेत. शास्त्रीजी महाराज यांनी संस्थेची ‘बोचासणवासी श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था (बी.ए.पी.एस.) अशा नावाने 1907 मध्ये स्थापना केली. या संस्थेअंतर्गत अध्यात्मसोबत गतिमान समाजकार्यास प्राधान्य दिले जाते. मंदिर निर्माण, आरोग्य-शिक्षण, आपत्तीस्थितीत मदतकार्य, समाजोन्नती, पर्यावरण जनजागृती, व्यसनमुक्ती, धर्म-संस्कृती, शिक्षणसेवा अशा अनेक कार्यासाठी अभियान राबवून सातत्याने सेवा कार्यरत आहे. भगवान स्वामी नारायण यांनी 17-18 व्या शतकात समाजाच्या उद्धार व उन्नतीसाठी कार्यारंभ केला हा सेवेचा अभियज्ञ आजतागायत सुरूच आहे.

‘बीएपीएस’ संस्थेचे प्रमुख म्हणून अहोरात्र सेवा कार्यरत प्रमुख स्वामी महाराज हे क्षमामूर्ती म्हणून प्रसिद्ध होते. प्रमुख स्वामीजींचे मूळ नाव शांतीलाल होते. माध्यमिक शिक्षण घेत असताना ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराजांच्या सेवेत ते रुजू झाले. त्यांची अध्यात्मिक रुची ध्यानी घेत शास्त्रीजी महाराजांनी त्यांना स्वामी नारायण संस्थेत समाविष्ट करून ‘शांती भगत’ या नावाने, त्यानंतर 10 जानेवारी 1940 मध्ये ‘साधू नारायण-स्वरूपदास’ या नावाने दीक्षा दिली. 21 मे 1950 मध्ये शास्त्रीजींच्या कृपेने बीएपीएस संस्थेचे अध्यक्षपद नारायण स्वरूपदास यांच्याकडे आले. तेव्हापासून ते प्रमुख स्वामी या नावाने ओळखले गेले. आपल्या प्राकटय़काळामध्ये प्रमुख स्वामी महाराज साधे, सरळ जीवन जगले. केशरी पायघोळ, गोरी कांती, कपाळी कुंकुम टिळा व चेहऱयावर शांतभाव असणारे प्रमुख स्वामी महाराज देशविदेशात धर्मयात्रेतून मार्गदर्शन करीत असतानाही साधेपणाची जपणूक करायचे. त्यांनी देशभरासह विदेशामध्ये भव्यदिव्य स्वामी नारायण मंदिरांची निर्मिती केली. सुमारे 713 पेक्षा जास्त मंदिरांची त्यांनी उभारणी केली. लंडन येथे बांधण्यात आलेले मंदिर तर विसाव्या शतकातील स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुनाच ठरले आहे. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर न्यू जर्सी (अमेरिका) येथे उभारले आहे. अहमदाबाद (गुजरात) येथील स्वामीनारायण मंदिर, दिल्लीतील अक्षरधाम मंदिर प्रमुख स्वामीजींच्या कुशल नेतृत्वाखाली अजरामर ठरले आहे.

ganeshudawant [email protected]