आठवणी – हरवलेली सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुचेता सुनील कर्णिक

मार्च महिन्याच्या शेवटी परीक्षा चालू झाल्या की अभ्यासातल्या अक्षरांबरोबरच सुट्टीतले खेळ, मजा डोळय़ांसमोर नाचू लागे आणि कधी एकदा शेवटचा पेपर टाकतोयसं होऊन जाई. आमच्या चाळीतल्या बिऱहाडांसमोरची मागची पुढची जागा म्हणजे वाळवणीचं मैदान होऊन जाई.

तेलात लडबडलेल्या, दोऱयानं कापलेल्या पेढय़ांच्या आकाराच्या पापडाच्या ‘लाटय़ां’कडे न पाहताच महामुश्किलीनं जिभेवर आवर घालून पेपरला जावं लागे. आम्हा सीकेप्यांचा जिव्हाळय़ाचा विषय म्हणजे ‘वाल’ आणि सुका बाजार. वालाची हिंग, तेल लावून, उन्हं देऊन अन् वर्गवारी करून साठवणीच्या डब्यात रवानगी होई.

अट्टल सी.के.पी. खवय्या ओली नाही तर सुकी मासळी खाऊन आपला मांसाहारी नेम चालू ठेवणारच. त्यात ‘काडय़ा’ अन् ‘सोडे’ हे अपरिहार्य घटक. मग त्यांची जोपासणीही तितक्याच आत्मीयतेने कावळे, मांजरं यापासून त्यांचं रक्षण करून होई. त्यावेळी आमच्यासारखे परीक्षेनंतरचे रिकामटेकडे न् फुकटचे राखणदार आवडत्या खाऊच्या आमिषावर राबविले जात.
एप्रिल-मेच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहण्याचं आणखी एक कारण असे – आंबे. आमचा काका या सुमारास आंबे, फणस, ओले काजू घेऊन येई. टॅक्सीतून आंब्याच्या पेटय़ा आणि मोठाले फणस उतरले की चाळीतल्या आजूबाजूच्या लोकांचं डोकावणं सुरू होई.

मला नेहमी गंमत वाटे. आंबे, फणस मोकळय़ा हातानं वाटणारे आम्हीच आणि भातुकलीसारखे खेळ खेळताना मुलांना पळवून लावून मज्जा घालविणारेही आम्हीच. कोडं कधी सुटलंच नाही. विक्षिप्त कुठले! जेवणावळीच्या या प्रकारानंतर आम्हाला घरातच बंदिवास भोगावा लागला. खरोखरच जेवण जेवून तृप्त झालेले आमचे सवंगडी बाहेर खेळ खेळत होते आणि आम्ही खिडकीच्या गजाला नाक लावून ते पाहण्याखेरीज काही करू शकत नव्हतो. रिझल्ट लागेपर्यंतचा काळ मनसोक्त हुंदडण्याचा असायचा. आमच्याबरोबरची मुलं उशिरापर्यंत लोळत असताना आम्ही मात्र आईनं लावून दिलेल्या बालमोहनच्या हिंदी परीक्षेच्या वर्गांना किंवा कोणत्या तरी कोर्सला जात असू. त्यावेळी आईचा खूप राग येई. आमचे जेवढे ती लाड करी, आमच्यासाठी बोलणी खाई तेवढीच ती याबाबतीत ठाम असे. पाचवी-सहावीत साधारण त्यावेळच्या कॉलेजच्या दुसऱया वर्षाचं हिंदी असतानाही माझ्या बहिणीनं सहावीत असताना पहिलं येणं काही खाऊ नव्हता. आमची आई त्यावेळी क्रायलिन पेंटिंगचे क्लासेस घेत असे. चित्रकला, शिवणकाम, क्रोशा, भरतकाम, पॅचवर्क, पाककला इ. सर्व कलागुण तिच्यात होते. ते सर्व ती आमच्याकडून पुरं करण्याचा नेहमी प्रयत्न करी. त्यामुळे आमची एकही सुट्टी आम्हाला काही नवीन शिकायला मिळालं नाही अशी गेली नाही. चित्रकलेचा वारसा आम्हाला तिच्याकडूनच मिळाला.

दुपारच्या जेवणानंतर पत्ते, लॅडिस, ल्युडो, रमी, कॅरम यांसारखे बैठे खेळ खेळत असू. ‘नॉट ऍट होम’ या खेळात त्याचा उच्चार जोरदारपणे करताना ‘नॉटॅठोम’ असा लघुउच्चार उंच आवाजात मजा आणी. हुकूम सांगणाऱयाला नजरकैदेत ठेवण्यात गंमत वाटे. आमच्याकडे वडिलांचा चॅम्पियन बोर्ड अजूनही आहे. त्यावर खेळताना उगीचच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यासारखं वाटे. छापापाणी, फुलीगोळा, नाव-गाव-फळ-फूलसारखे हलके फुलके खेळ मधेमधे खेळायला टाइमपास होई.

दुपारी कधी कधी बायस्कोपवाला यायचा. चाळीच्या दारातच त्याचा संसार थाटला जायचा आणि आम्ही त्याच्याभोवती कोंडाळं करीत असू. एका वेताच्या तिकाटण्यावर त्याचा रंगीबेरंगी पत्र्याचा डबा लागे. त्यावर कठपुतळीच्या बाहुल्या असत. मग त्याचं डब्यावर ताल धरत गाणं सुरू होई…. ‘आओ, आओ, सब लोग आओ. दिल्ली का कुतुबमिनार देखो, आगरे का ताजमहाल देखो, बम्बईका गेटवे देखो….’ आम्ही धडाधड आमच्या खाऊचे पैसे घेऊन हजर होत असू. ज्यांचे पैसे मिळतील त्यांना डबऱयाचं झाकण उघडून मिळे. त्या डब्याला लावलेल्या गोल काचांमधून दोन हात डोळय़ांच्या बाजूला ठेवून आतला ताजमहाल आणि कुतुबमिनार प्रत्यक्ष पाहत असू. मुला-मुलींचे क्लासिफाईड खेळ विलीन व्हायचे पकडापकडीत, लपाछपीत आणि उंच उडीत! खाली बसून एकावर एक पाय, हात, पंजे, क्रमवारीनं करता करता उंच उडी मारण्याच्या नादात दमछाक होत असे.

मनसोक्त हुंदडल्यावर रामरक्षा आणि परवचा यातून सुटका नसे. आम्ही ती म्हणत असू. आईला दीडकी, अडीचकीही म्हणता येई. मग शंभरपर्यंतचे पाढे तरी म्हणणं भाग आहे ना बॉस! रामरक्षा एवढय़ासाठी की, त्या काचांच्या ‘काचातून’ आमचं रक्षण होण्यासाठी रामाला साकडं फार गरजेचं असे.

रिझल्ट लागल्यानंतर मात्र आजीकडे जाण्याचे वेध लागत. आईची तयारी सुरू होई. रिझल्टचे पेढे, पापड, मुरांबे सर्व आठवणीनं घेतलं जाई. सुट्टीत आपल्या लेकरांसह आलेल्या पोरीबाळी पाहून आजी-आजोबा खूश होत. आम्ही सगळीच मावस, मामेभावंडं एकत्र आल्यावर मस्तच धुमाकूळ. आमच्या एका वात्रट मावसबहिणीच्या येण्याच्या चाहुलीनं आजी सर्व मेहनतीनं केलेल्या वस्तूंची पडताळात आधीच सुरक्षित जागी व्यवस्था करे. असेच मजेत दिवस झरझर निघून जायचे ते कळायचं नाही. परतण्याचा दिवस जवळ येऊ लागायचा आणि परत आपापल्या घरी गेल्यावर पुन्हा कधी भेटणार याची खात्री नसायची.

निघताना पायच उचलत नसे. नमस्कार करायला वाकताच ‘औक्षवंत व्हा’चा आजोबांचा आशीर्वाद मिळायचा. आजी न चुकता दहीसाखर हातावर ठेवी. ‘पुन्हा या गं भवान्यांनो’ म्हणून गालाचा पापा घेई. खूप मोठय़ा व्हा, खूप शिका बरं’ म्हणून सांगे. वात्रट मावसबहिणीला न विसरता ‘पुढच्या वेळेस वांडपणा कमी कर गं बयो. पोरीच्या जातीला बरं दिसत नाही बाळा!’ म्हणे. डोळे ओलावत. आईचं, मावश्यांचं माहेरचा निरोप घेताना हलणारं काळीज आज आम्ही पुन्हा सासरी जाताना होण्यापेक्षा काही वेगळं नव्हतं हे आता समजलं.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुस्तकं, वह्या, युनिफॉर्मची गडबड असे. नवीन बूट, रेनकोट सर्वांची आठवण होई. कोऱया पानांच्या दादांनी वह्या बायडिंग करून आणलेल्या असायच्या. नेहमीप्रमाणे मला नवीन आणि बहिणीला-रेखाला माझी पुस्तकं ‘पास ऑन’ झालेली असत. कोऱया करकरीत, जुन्या सर्वच वह्या-पुस्तकं कव्हरं लावून सज्ज असत. नव्या उत्साहानं आम्ही नवीन वर्गासाठी तयार होत असू. पण मागे पळालेली एप्रिल-मेची सुट्टी ‘आईच्या पत्रा’प्रमाणेच खरोखर हरवून गेलेली असायची. आताही लिहिताना ती थोडीशी गवसल्यासारखी वाटली, पण पटकन पुन्हा निसटली.

मुली म्हणतात, हे सर्व ऐकताना वेळेचं घडय़ाळ पुन्हा एकदा मागे गेलं तर आम्हालाही या सर्व गोष्टी जिवंत झालेल्या पाहायला मिळतील, तर मजा लुटताना तितकाच आनंद होईल.

खरंच असं झालं तर? आमच्या काळातल्या 50-60च्या दशकातल्या लोकांना जरूर यातला काही भाग तरी आपलासा वाटेल याची मला खात्री आहे आणि असं वाटलंच तर माझं हे लिहिणं व्यर्थ गेलं नाही असं मी म्हणेन!