लेख – चीन : कर्ज सापळय़ातून वसाहतीकडे …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सद्गुरू उमाकांत कामत  

चिनी राज्यकर्त्यांनी प्रत्येक क्षेत्रात जम बसविण्यासाठी एक चिनी प्रारूप तयार करून त्या त्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी साम, दाम, दंड आणि लाचनीतीद्वारा सुरू केली. बांधकाम क्षेत्र, बंदर उभारणीच्या बरोबरीने चीनने मूलभूत सुखसोयी, सेवा क्षेत्रात जगातील गरीब, अविकसित देशांवर लक्ष केंद्रित केले व हळूहळू त्या देशांना आपल्या कहय़ात अशारीतीने घेतले की, त्या गरीब, अविकसित देशांना चिनी ड्रगनच्या कर्ज सापळ्य़ाच्या मगरमिठीतून बाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे.

 मागील चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत चीनने आर्थिक क्षेत्रात  प्रचंड मोठी झेप घेऊन व्यापार-उदीम, उत्पादन, आधुनिक शास्त्रांच्या विविध शाखा त्याचप्रमाणे अवकाश तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही अमेरिकेतून चोरलेल्या अथवा लाच देऊन मिळविलेल्या तंत्राज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे चीन साऱया जगाचा पुरवठादार देश होण्याइतपत सक्षम बनला. चीनच्या गंगाजळीत खरगो डॉलर्स जमा झाले आणि याच पैशाचा विनियोग करून चीन आज जगामध्ये चिनी वसाहतवादाचे प्रारूप सर्वत्र प्रस्थापित करू पाहत आहे. चिनी राज्यकर्त्यांनी प्रत्येक क्षेत्रात जम बसविण्यासाठी एक चिनी प्रारूप तयार करून त्या त्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी साम, दाम, दंड आणि लाचनीतीद्वारा सुरू केली. बांधकाम क्षेत्र, बंदर उभारणीच्या बरोबरीने चीनने मूलभूत सुखसोयी, सेवा क्षेत्रात जगातील गरीब, अविकसित देशांवर लक्ष केंद्रित केले व हळूहळू त्या देशांना आपल्या कहय़ात अशारीतीने घेतले की, त्या गरीब, अविकसित देशांना चिनी ड्रगनच्या कर्ज सापळ्य़ाच्या मगरमिठीतून बाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे.

जागतिक बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था गरीब, अविकसित आणि विकसनशील देशांना विविध कारणांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. जेणेकरून त्या राष्ट्रांत मूलभूत सुखसोयी, रस्ते, वीज, पाणी, परिवहन, आरोग्य सेवा उपलब्ध होऊन तेथे आर्थिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. जनतेचा जगण्याचा स्वर उंचावेल. सदर कर्जवितरण करीत असताना जागतिक बँक/आयएमएफ या राष्ट्रांची कर्ज परतफेडीची पत काय आहे तसेच होऊ घातलेला प्रकल्प योग्य आहे का, याचे विश्लेषण करूनच त्या देशाला अल्प किंवा मध्यम किंवा दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध करून देते.

चीननेदेखील स्वतःचा वसाहतवाद सर्वत्र पसरवण्यासाठी स्वतःचे एक वेगळे छुपे प्रारूप तयार करून त्याअंतर्गत गरीब, अविकसित आणि विकसनशील देशांना मूलभूत सेवासुविधा आणि इतर कारणांसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली. परंतु ही कर्जे वितरीत करताना चीनने त्या गरजू देशांच्या कर्ज परतफेडीच्या पात्रतेचा अथवा हे प्रकल्प वास्तवात येऊ शकतात की नाही या मुख्य आर्थिक मूलतत्त्वाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. चिनी वसाहतवाद आणि राजकीय, भौगोलिक प्रारूपाचा आत्मा गरीब देशांच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून मोठय़ा कर्जांद्वारे या देशांना अंकित करणे हाच होता आणि आहे. चीनच्या वसाहतवादाच्या चक्रव्यूहात चीनचे राजकीय, भौगोलिक आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत.

जर्मनीच्या ‘काईल इन्स्टिटय़ूट फॉर द वर्ल्ड इकॉनॉमी’ या प्रख्यात संस्थेने चीनने चोवीस देशांबरोबर केलेल्या शंभर करारांचे विश्लेषण केले. या संस्थेला अमेरिकेत संशोधन करणाऱया काही संस्थांचा पाठिंबा मिळाला. जर्मनीच्या संस्थेला चीन आणि इतर देशांच्या करारनाम्यांचे विश्लेषण करताना अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत. चीनची कर्ज देण्याची प्रक्रिया दांडगाईची आणि शोषणपूरक आहे. मूलभूत सेवेसाठी दिल्या जाणाऱया कर्जाचा व्याजदर साधारणतः आठ टक्के असतो. पण चीन मात्र या मूलभूत सेवा प्रकल्पांसाठी बाजारभावानेच व्याज आकारणी करतो. तसेच कर्ज वितरीत करताना करारनामे हे बहुतांश चीनच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याकडे झुकलेले असतात. तसेच कर्ज घेणाऱया देशांचे कर्ज परतफेडीचे अथवा तत्सम पर्याय कमीत कमी कसे राहतील याकडे लक्ष दिले जाते. शिवाय कर्ज देणाऱया चिनी बँकांच्या विशेष अधिकारात कर्ज वितरण मोडीत काढून कर्जाची पूर्ण रक्कम नियोजित वेळेआधीच मागण्याची तरतूद सदर करारात करण्यात येते.

2014 पासून सदर करारात ‘गुप्तता’ कलम जोडण्यात येत असून कर्जाच्या अटी किंबहुना कर्जाचे अस्तित्वही त्या त्या देशांना गुप्तच ठेवावे लागते. सदर कलम हे लोकशाही राज्यव्यवस्थेच्या तत्त्वांविरोधात असून राष्ट्रीय प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाची माहिती त्या देशाच्या जनतेला असलीच पाहिजे आणि  त्यासाठी सरकारला जबाबदार धरण्याचा हक्क जनतेला असतोच.

चिनी अर्थसहाय्याने सुरू झालेल्या प्रकल्पांचे उत्पन्नदेखील चीनमधील बँकांमध्ये त्या देशाला ठेवावे लागते. जेणे करून कर्ज परतफेडीत काही मागेपुढे झाले तर सदर रक्कम चीनला ताब्यात घेता येणे शक्य होईल. एखाद्या देशाचे अंतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय धोरण जर चीनला पटले नाही तर ‘सदर धोरण’ कराराचा भंग समजण्यात येतो आणि करार गुंडाळून एकरकमी व्याज आणि मुद्दल चीन वसूल करतो. जर एखादे राष्ट्र तात्काळ सदर कर्ज परतवू शकत नसेल तर त्या राष्ट्राला आपला काही भूप्रदेश, बंदर अथवा तत्सम मालमत्ता चीनच्या ताब्यात द्यावी लागते. अशा प्रकाराच्या अटी सदर कर्ज करारनाम्यात आढळून आलेल्या आहेत. बहुतांश करारांमध्ये कर्ज परतफेडीच्या पुनर्रचनेस वाव नसतो आणि त्यात ‘पॅरीस क्लब’च्या उल्लेखास बंदी असते. पॅरीस क्लब हा काही सधन देशांचा समूह असून गरीब देशांच्या कर्ज परतफेडीच्या प्रस्तावाच्या पुनर्रचनेस मदत करतो. सध्या कोविडग्रस्त जागतिक अर्थव्यवस्थेत चीनच्या सदर जाचक पत वितरण धोरणाने जगापुढे एक आव्हान उभे केले आहे.

आफ्रिका खंडातील कझाकिस्तान, लाओस, मंगोलिया, केनिया, साऊथ आफ्रिका, झांबीया, आशिया खंडातील श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, मालदीव, फिलीपाइन्स, इंडोनेशिया, लॅटीन अमेरिकेतील अर्जेंटीना, व्हेनेझुएला यांसारखे असंख्य गरीब, अविकसित अथवा विकसनशील देश आज चीनच्या ‘कर्ज सापळ्यात’ अडकले असून सदर देशांना त्याची फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.

लाओस हा देश तर स्वतःच्या राष्ट्रीय ऊर्जा वितरणाचे जाळे चिनी कंपन्याच्या ताब्यात देऊन फसला आहे. लाओसमध्ये पाणी मुबलक असून देशात 90 टक्के वीज पाण्यावर उत्पन्न होते. अशा देशाला त्याचे वीज वितरणाचे राष्ट्रीय जाळेच चिनी कंपन्यांना द्यावे लागत आहे. कारण त्यामुळे लाओसच्या पाण्याचे स्रोत चीनच्या अखत्यारीत येऊ शकतील.

कझाकिस्तानला कर्जमाफी मिळविण्यासाठी 1158 चौरस किलोमीटरचा लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला भूभाग चीनला सुपूर्द करावा लागला.

श्रीलंकेलाही चीनच्या कर्ज सापळ्य़ात अडकल्यामुळे ‘हॅम बॅनटोटा’ हे बंदर 99 वर्षांच्या भाडे तत्त्वावर देणे भाग पडले. शिवाय सहा हजार हेक्टर जमीनदेखील चीनला द्यावी लागली. सदर बंदर आणि जमीन लष्करी दृष्टिकोनातून श्रीलंकेसाठी अत्यंत महत्त्वाची होती. पाकिस्तानदेखील चीनच्या कर्ज सापळ्य़ातून सुटलेला नाही. पाकिस्तानातील ग्वादार बंदर पुढील चाळीस वर्षांसाठी चीनला द्यावे लागत आहे. याच जोडीला जगात लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेले छोटय़ा द्वीपकल्प देशांना त्यांच्या आवाक्याबाहेरची मोठी कर्जे वितरीत करून चीनने त्या देशांची लहान बेटे विकसित करून त्या बेटांना या ना त्या कारणांनी आपल्या कहय़ात घेण्याचा सपाटा चालविला आहे. विशेषतः चीनचे हे उद्योग हिंद महासागराच्या परिसरात सुरू आहेत. मालदिव, सोलोमन आयलँड ही त्यातील महत्त्वाची उदाहरणे.

चीनचा वसाहतवाद हा जबरदस्तीने दुसऱया देशात सैन्य घुसवून, हळूहळू त्या देशाची जमीन `Crippling Policy’ च्या माध्यमातून ताब्यात घेऊन अथवा त्या देशांना फसव्या ‘कर्ज सापळय़ात’ अडकवून रेटला जात आहे. अशा देशांतील महत्त्वाचा भूभाग, बंदरे, पाणी, ऊर्जा, रस्ते आपल्या ताब्यात घेणे हे प्रकार चीन सर्रास आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता करीत आहे.

लोकसंख्या, भूभाग या दृष्टिकोनातून, युरोप, अमेरिका खंडातील विकसित, श्रीमंत देश स्वबळावर चीनचा साम्यवादी वसाहतवाद एकटय़ाने रोखू शकत नाहीत हे एक सत्य आहे. तर व्हिएतनामसारखा लढाऊ देश चीनला एकटय़ाने अंगावर घेण्याइतका सक्षम नाही. तथापि अमेरिका आणि हिंदुस्थान हातात हात घालून चीनचा हा वसाहतवाद नक्कीच रोखू शकतात. हिंदुस्थानचा लढाईचा मजबूत अनुभव, लढाऊ वृत्ती आणि अमेरिकेची आग ओकण्याची क्षमता तसेच तंत्रज्ञानातील उंची, चीनच्या Crippling Policy ला रोखून हद्दपार करण्याची क्षमता ठेवतात. फक्त आवश्यकता आहे ती समतोल, तार्किक विचारधारा आणि परिणामकारक अंमलबजावणीची.

[email protected]