
>>प्रतीक राजूरकर
आपल्या देशात कोळसा उद्योगाला 1970 ते 80 च्या दशकात औद्योगीकीरणामुळे मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे कोळसा उद्योगाचे झपाटय़ाने राजकीयकरणसुद्धा झाले. मात्र त्याचवेळी कोळसा खाण कामगारांच्या आयुष्याचे अवमूल्यनदेखील झाले. कोळसा उद्योगातून अनेकांचे हात ‘पांढरे’ झाले आणि श्रीमंतीही अवतरली. मात्र कोळसा खाण कामगाराच्या जीवाचे कमाल मूल्य फक्त 10 लाख रुपयेच राहिले. त्यांच्यावर आजही अपघाती मृत्यूची टांगती तलवार तशीच कायम आहे. 4 मे हा दिवस ‘कोळसा खाण कामगारदिन’ म्हणून पाळला जातो. अर्थात त्यामुळे या कामगारांच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. त्यांच्या नशिबातला अंधःकार मात्र अजूनही कायम आहे.
हिंदुस्थानात 550 पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. विविध खनिज, तेल, वायू, धातू यासारख्या 89 प्रकारच्या खाणींचा विचार केल्यास हा आकडा दोन हजार खाणींच्या जवळपास जातो. यात अंदाजे आठ ते दहा लाख कामगार कार्यरत असावेत. केवळ खाण क्षेत्राचे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाटा आहे. परंतु खाण कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चिंताजनक राहिला आहे. 2016 सालच्या एका अहवालानुसार प्रत्येक दहा दिवसांत एका खाण कामगाराचा खाणीत कार्यरत असताना मृत्यू होतो.
हिंदुस्थान हा जगातील तिसऱया क्रमांकाचा सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारा देश आहे. देशातील 60 ते 70 टक्के ऊर्जेची गरज यातून पूर्ण होते. याव्यतिरिक्त स्टील, सिमेंटसारख्या उद्योगांना मोठय़ा प्रमाणात कोळशाची गरज असते. अर्थात वारेमाप कोळसा उत्खनन पर्यावरणाला हानी पोहोचवतेच. शिवाय कोळसा खाणीतील कार्यरत कामगारांच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतात. कोळसा खाण कामगारांचे स्वास्थ्य नैसर्गिक आणि अनैसर्गिक कारणांमुळे प्रदूषित होते. कधी उत्खननात वापरल्या जाणाऱया स्फोटांच्या वापरातून, कधी विशिष्ट रासायनिक वायूमुळे तर कधी उत्खनन करताना पाणी आत शिरल्याने अथवा दुर्घटनेत या कामगारांना मृत्यू येतो.
एप्रिल 2014 साली राष्ट्रीय हरित लवादाने Rat Hole पद्धतीने कोळसा उत्खनन करण्यास मनाई केली आहे. मेघालयातील कुपली नदीचे पाणी पिण्यासाठी वापरात आहे. अवैध उत्खननामुळे लगतच्या पहाडातील कोळसा खाणीत रासायनिक वायू निर्माण झाल्याने नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाल्याचे हरित लवादाच्या निदर्शनास आणण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोळसा वाहतुकीस दिलेल्या परवानगीखाली मेघालयात अवैध उत्खनन जोरात सुरूच राहिले. परिणामी डिसेंबर 2018 ते मार्चदरम्यान मेघालयातील अवैध कोळसा खाणीत अडकून 15 कामगारांचा मृत्यू झाला. चार महिने अथक प्रयत्न करूनही आपत्ती नियोजन करणाऱया संस्थांना सगळे मृतदेहसुद्धा बाहेर काढण्यात यश येऊ शकले नाही. शेजारच्या नदीचे पाणी आत शिरल्याने कामगार अडकून पडले आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. केवळ दोन मृतदेह काढण्यात यश येऊ शकले. मेघालयात कोळशाचा थर कमी असल्याने उत्खननात Rat Hole पद्धतीने कोळसा उत्खनन करण्याची पद्धत आहे. ती पद्धती धोकादायक असून बहुतांशी 18 वर्षांखालील कामगारांचा यात सहभाग असतो.
कोळसा खाण कामगारांच्या मृत्यूचा इतिहास कोळशाहून अधिक काळा आहे. गेल्या काही दशकातली आकडेवारी कोळसा खाण कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धक्कादायक आहे. 1965 साली धनबाद कोळसा खाण दुर्घटनेत 268 कामगारांचा मृत्यू झाला. चसनाला दुर्घटनेवर काला पत्थर चित्रपटाने मोठे उत्पन्न कमावले. चसनाला कोळसा खाणीत 380 कामगार मृत्युमुखी पडले. 1994 साली उदयपूर येथील राजपुरा खाण दुर्घटनेत 63 कामगारांचा अडकून मृत्यू झाला. त्यात मेघालयातील कोळसा खाण दुर्घटनेने अधिक भर घातली आहे. याव्यतिरिक्त अनेक लहान-मोठय़ा दुर्घटना आणि कोळसा खाणीत काम केल्याने प्रकृतीवर परिणाम होऊन हजारो कामगारांनी आपले प्राण गमावले आहेत. कोळसा खाण कामगारांच्या जीवाचे कमाल मूल्य केवळ दहा लाख रुपये आहे. आपल्या देशात कोळसा उद्योगाला 1970-80 च्या दशकात वाढत्या औद्योगीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे कोळसा उद्योगाचे झपाटय़ाने राजकीयकरणसुद्धा झाले. मात्र त्यापेक्षा अधिक कोळसा खाण कामगारांच्या आयुष्याचे अवमूल्यन झाले असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. कोळसा उद्योगातून अनेकांचे हात काळे झाले आणि सोबतीला श्रीमंती पण अवतरली. खाण मालक रोज दिवाळी साजरी करत असताना कोळसा खाण कामगारांच्या नशिबातला अंधकार मात्र अजूनही कायम आहे.
अवैध कोळसा उत्खननात उत्पन्न अधिक असल्याने गावातील दहा लोक मिळून कामावर जातात. त्यातील सहा उत्खनन तर उर्वरित चार कोळसा बाहेर नेण्याचे काम करतात. विशिष्ट भागात उत्खनन करण्यासाठी अशा समूहाची निवड केली जाते व ठरावीक संख्येत उत्खनन केल्याचे एकत्रित मूल्य ठरवून अवैध उत्खनन केले जाते. त्यामुळे दहा व्यक्तींना मिळून दिवसाला किमान 4-5 हजार रुपये प्राप्त होतात. जे प्रत्येकी 400-500 रुपये दिवसाचे उत्पन्न असते. एकटय़ाने काम केल्यास कमाल 200 रुपये उत्पन्न तुलनेने कमी असल्याने साहजिकच एकत्रितपणे काम करणे फायद्याचे ठरते. अवैध कोळसा उत्खननाच्या उत्पन्नाची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी किमान 2000 कोटी रुपये उत्पन्न मालकाला प्राप्त होते असा अभ्यासकांचा दावा आहे.


























































