
>> अक्षय शेलार ([email protected])
विनोद, व्यंग आणि खास ब्रिटिश तिरसटपणा यांचा सूक्ष्म, मार्मिक मिलाप असणारा कॉमेडियन रिकी जर्वेस. जर्वेसच्या स्टँडअपमध्ये नैतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचा मूर्खपणा, धार्मिक आणि सामाजिक प्रथांवरील टीका हे सारे नियमितपणे दिसते.
स्टँडअप कॉमेडी पाहायला सुरुवात केल्यास रिकी जर्वेस हे नाव सगळ्यात आधी कळतं आणि त्याचं काम पुढे आयुष्यभर पुरेल इतकी भुरळ घालतं. तो फक्त विनोद निर्मिती करणारा कॉमेडियन नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक निरीक्षणे मांडणारा कलाकारदेखील आहे. त्याच्या कॉमेडीत विनोद, व्यंग आणि खास ब्रिटिश तिरसटपणा यांचा सूक्ष्म, मार्मिक मिलाप दिसतो. ज्यामुळे अनेकदा जॉर्ज कार्लिनची आठवणही येऊन जाते.
रिकी जर्वेसची स्टँडअप शैली ही थेट, भेदक आणि अस्वस्थ करणारी असते. तो वैयक्तिक अनुभव, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक-सांस्कृतिक नीतिनियम आणि नैतिक द्वंद्व यांवर भरभरून बोलतो, परंतु ते करताना प्रेक्षकांना सहजतेने त्याच्या कथनात अडकवून ठेवतो. `अॅनिमल्स’, `पॉलिटिक्स’ आणि `फेम’ या स्टँडअप त्रयीपासून ते `ह्युमॅनिटी’ (2017) आणि `सुपरनेचर’पर्यंत (2022) त्याने केलेली उपहासात्मक मांडणी त्याच्या तटस्थ, पण मर्मभेदी दृष्टिकोनाची ठळक उदाहरणं आहेत.
जर्वेस ज्या धीटाईनं बोलतो त्यातून प्रेक्षकांना हास्याचा अनुभव तसेच त्याच्या मुद्दय़ाची गंभीरता दोन्ही आकळते. छोटय़ा विरामांचा आणि शब्दांचा अचूक वापर तो त्याच्या कामात करतो. त्याच्या प्रत्येक बिटमध्ये एक `तीव्रतेचा डोस’ असतो, ज्यात हास्य आणि विचार यांचा समन्वय अचूक साधलेला असतो. जर्वेसच्या स्टँडअपमध्ये नैतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचा मूर्खपणा, धार्मिक आणि सामाजिक प्रथांवरील टीका हे सारे नियमितपणे दिसते. उदाहरणार्थ, `ह्युमॅनिटी’ या स्पेशलमध्ये तो मानवाच्या असुरक्षिततेपासून ते सोशल मीडिया संस्कृतीपर्यंतच्या विसंगतींवर भाष्य करतो.
त्याच्या कॉमेडीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ती नेहमी `बाऊंडरी पुशिंग’ करीत असते. म्हणजे काय तर जर्वेसला `ऑफेन्सिव्ह’ किंवा खळबळजनक मुद्दे निवडायला आवडतात. तो प्रेक्षकांना सतत स्वतला एक प्रश्न विचारण्यास भाग पाडतो तो म्हणजे आपण हसतोय हे खरंय; परंतु ते आपल्या नैतिक मूल्यांशी कितपत जुळते? त्यामुळे त्याचा विनोद जवळपास सर्वच वेळा अस्वस्थ करतो.
वर उल्लेखलेल्या त्याच्या सर्व स्पेशल्समध्ये एक समान सूत्र दिसते ते सूत्र म्हणजे प्रेक्षकांसोबत संवाद, नैतिक मूल्यांवर कटाक्ष, सामाजिक निरीक्षण आणि तोवर स्टँडअपच्या इतिहासात तयार झालेल्या सीमारेषा ओलांडणारा विनोद. या सर्व स्पेशल्समधून जर्वेस दाखवून देतो की, स्टँडअप केवळ हसवण्याचे माध्यम नसून एक विचार प्रवर्तक, सामाजिक माध्यमदेखील आहे.
त्याचे बरेचसे विनोद `निरीक्षणपर विनोद’ या प्रकारात मोडतात. तो रोजच्या जीवनातील सामान्य गोष्टींमध्ये लपलेल्या विसंगती शोधतो आणि त्याला सामाजिक, धार्मिक किंवा नैतिक संदर्भांची जोड देतो. उदाहरणार्थ, त्याच्या `अॅनिमल्स’ या स्पेशलमध्ये तो मानव आणि प्राणी यांच्या वर्तनातील विसंगती उलगडतो आणि मग अगदी सोप्या उदाहरणांपासून मोठय़ा नैतिक प्रश्नांपर्यंत जाऊन पोहोचतो.
त्याचा `पॉलिटिकली इनकरेक्ट’ म्हणजे नैतिक नि राजकीयदृष्टय़ा गुंतागुंतीचा, जवळपास आक्षेपार्ह विनोद हा त्याच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. धर्म, राजकारण, शारीरिक दोष किंवा सामाजिक विसंगती यांसारख्या संवेदनशील विषयांवर तो बोलतो. `ह्युमॅनिटी’मध्ये तो सोशल मीडिया संस्कृती, सेलिब्रिटी कल्चर आणि मानवाच्या स्वतच्या मूर्खपणावर बोलतो. सोबतच तो नेहमी आत्मवंचना असलेले विनोदही वापरतो. तो स्वतवर विनोद करतो, स्वतच्या अपयशांवर, शारीरिक स्वरूपावर विनोद करतो आणि याच्या उलट टोक म्हणजे तो त्याच्या प्रचंड लोकप्रियतेच्या आणि आर्थिक संपत्तीच्या अनुषंगाने आत्मप्रौढीही गाजवतो.
त्याची कथाकथनाची क्षमता अतिशय प्रभावी आहे. लांबलचक कथानक असलेले तुकडे किंवा संक्षिप्त किस्से, दोन्ही त्याच्या शैलीत सहज आढळतात. उदाहरणार्थ, `पॉलिटिक्स’ मध्ये तो राजकारणाबाबतच्या छोटय़ा छोटय़ा घटना मोठय़ा सामाजिक निरीक्षणात रूपांतरित करतो.
या साऱया गोष्टींचा विचार करता रिकी जर्वेस हा विचार करण्यास प्रवृत्त करणारा, चिंतनशील कॉमेडियन म्हणून का ओळखला जातो, हे स्पष्ट होते. जॉर्ज कार्लिनचा वारस असल्याच्या थाटात तो त्याच्या कॉमेडीमध्ये रंजन, निरीक्षण, खास ब्रिटिश तिरसटपणा आणि नैतिक प्रश्नांची गहनता असे सारे काही एकत्र आणतो. त्यामुळेच त्याचं काम काळाच्या ओघात जागतिक स्तरावर आजवर टिकून राहिलं आहे.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

























































