
>> वैश्विक, [email protected]
धूमकेतूचा ‘स्पर्श’ पृथ्वीच काय, प्रत्येकच ग्रहाने सूर्यमाला तयार होताना हजारो वेळा अनुभवलेला असेल. कारण सूर्यमालेचाच भाग असलेल्या आणि आपल्या सौरमालेच्या सर्व बाजूंनी सुमारे एक लाख ए. यू. म्हणजे सूर्य-पृथ्वी या 15 कोटी किलोमीटर अंतराच्या एक लाख पट दूर अंतरावर असलेल्या ‘उर्ट क्लाऊड’मध्ये धूमकेतूंचा जन्म होतो हे आता सर्वज्ञात आहे. उर्ट नावाच्या डच संशोधकाने मांडलेला धूमकेतूच्या उगमस्थानाचा हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे.
या उर्ट क्लाऊडमधून निसटलेले आणि सौरमालेतील ग्रहांभोवती फिरणारे अनेक ‘सन ग्रेझिंग’ धूमकेतू अंतिमतः त्यांचा जनक तारा असलेल्या सूर्यामध्ये विलीन होतात. आमच्या खगोल मंडळाचे सलील मुळ्ये यांनी असे धूमकेतू शोधले आहेत. तर धूमकेतू प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या सूर्याकडे जसे आकर्षित होतात तसेच ते गुरू-शनीसारख्या मोठय़ा, अतिशय गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहांकडेही आकर्षिले जातातच. 1994च्या जुलै महिन्यात शूमेकर-लेव्ही-9 नावाचा (या दोन संशोधकांच्या नावाचा नववा असलेला) धूमकेतू छिन्नविच्छिन्न होत गुरू ग्रहावर कसा आदळला त्याचं चित्रणही आता उपलब्ध आहे. वांगणी येथे आम्ही त्या पावसाळी महिन्यात दुर्बिणीतून गुरू-धूमकेतूची टक्कर कशी दिसते (आणि मुळात दिसते का ते) पाहायला गेलो होतो.
तर असाच एखादा धूमकेतू अशनीप्रमाणेच पृथ्वीवरसुद्धा केव्हातरी आदळू शकतो. तसा तो आदळला तर या ग्रहावरच्या बऱयाच जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे. कारण अशनी काय किंवा धूमकेतू काय, महासागरात कोसळला तरी त्यातून निर्माण होणारा भीषण भूकंप आणि सुनामींचा उत्पात पृथ्वीवरच्या एकूणच जीवसृष्टीला घातक ठरले. त्यामुळे निअर अर्थ किंवा पृथ्वीसन्निध अशनींचा बंदोबस्त करण्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा तसाच संभाव्य घातकी धूमकेतूचाही केला पाहिजे. विज्ञानाला आताच्या काळात ते कदाचित शक्य होईल. मात्र त्यासाठी धूमकेतूचे स्वरूप जाणून घ्यायला हवं.
पृथ्वीवर बसूनही दुर्बिणीद्वारे केलेल्या निरीक्षणातून धूमकेतूंच्या रचनेची बरीचशी माहिती आपल्याला पूर्वीच मिळालेली आहे. धूमकेतू ‘उर्ट क्लाउड’मध्ये असतात तेव्हा त्यांचा आकार एखाद्या गोळय़ासारखा असतो. त्यात मुख्यत्वे बर्फ, धूळ, छोटे-मोठे दगड आणि काही अडकलेले (ट्रप्ड) वायू असतात. आपली जागा सोडून सौरमालेच्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाटय़ात सापडलेले धूमकेतू सूर्याच्या दिशेने येऊ लागतात. वाटेत ते अनेक ग्रहांभोवती परिक्रमा करत करत पुढे सरकतात. एकदा का हा धूळ आणि बर्फाचा गोळा त्यातील वायू बाहेर टाकायला सुरुवात करतो तो सूर्याच्या उष्णतेमुळे वितळून. त्यामुळे धूमकेतूचे शेपूट सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते (छोटे शेपूट सौर दिशेतही दिसते).
मात्र गुरूवर आदळला तसा उत्पात पृथ्वीवर होऊ नये यासाठी एखाद्या धूमकेतूवर यान पाठवून त्याला स्पर्श करून त्याद्वारे माहिती घेण्याचं युरोपीय स्पेस एजन्सीने ठरवलं आणि ‘रोझेटा’ हे यान त्यावरील ‘फिले’ नावाच्या लँडरसह (अवतरक) चॅरॉव-जेरासिमोन्को या दोन संशोधकांच्या नावे असलेल्या धूमकेतूच्या दिशेने उडाले. तब्बल दहा वर्षे आणि आठ महिन्यांचा प्रवास करून ते या धूमकेतूभोवती फिरू लागलं. त्यानंतर त्यावरचं ‘फिले’ हे लॅन्डर 12 नोव्हेंबर 2014 रोजी या धूमकेतूवर उतरताना दोनदा चेंडूसारखं दूर फेकलं गेलं किंवा ‘बाऊन्स’ झालं. तिसऱया प्रयत्नात ते सुखरूप उतरलं, परंतु सौर ऊर्जेवर चालणारं ‘फिले’ दोनच दिवसांत दीर्घ निद्रेत किंवा ‘हायबरनेशन’मध्ये गेलं. ते 13 जूनला पुन्हा जागृत होऊन संदेश पाठवू लागलं. 6 ऑगस्ट 14 ते 15 सप्टें. 14 पर्यंत त्याने रोझेटाकडे भरपूर माहिती पाठवली.
रोझेरा प्रकल्पाचे संशोधक म्हणतात ‘फिले हायबरनेशन’मध्ये गेल्यावर चिंता होताच, परंतु पुन्हा सिग्नल मिळू लागल्यावर सर्वांनीच उत्तेजित होऊन जल्लोष केला. एखाद्या धूमकेतूवर कोणतंही यान यापूर्वी उतरलेलं नव्हतं. एका अद्वितीय वैज्ञानिक मोहिमेचे आम्ही सहभागी साक्षीदार होतो. धूमकेतूवरील पाण्याचे फवारे, वायूचे पट्टे (जेट्स) तसंच त्यावरील धातू, त्यातील संयुगं, गुरुत्वाकर्षण वगैरे गोष्टींचा अभ्यास करणारी उपकरणं उत्तम प्रकारे काम करत असल्याने हवा तो ‘डेटा’ 30 सप्टेंबर 2016 पर्यंत ‘रोझेटा’कडून मिळाला. त्यानंतर त्याचं कार्य संपवून त्याला त्या धूमकेतूमध्येच विलीन होण्याचा संदेश देण्यात आला.
युरोपच्या अवकाश संस्थेचं हे यश अपूर्व होतं. अंतराळातील विविध मोहिमांपैकी ही वेगळय़ाच धर्तीची मोहीम होती. मोठय़ा उपग्रहावर किंवा ग्रहावर यान उतरवणं तुलनेने सोपं, पण अंतराळात भिरभिरणाऱया छोटय़ा अशनी किंवा धूमकेतूवर उतरणं महाकठीण! शास्त्रज्ञांनी हे ‘असाध्य’ साध्य करून दाखवलं.
































































