ठसा – प्रतापराव भोसले

>> गजानन चेणगे

जुन्या काळातील काँग्रेसचे धडाडीचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले तथा भाऊ यांना तब्बल 90 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. 1960 पासूनची तब्बल पाच-सहा दशके महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर त्यांचे नाव चमकत होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांची झंझावाती कारकीर्द ज्यांनी जवळून पाहिली असेल त्यांना गहिवरून येणे स्वाभाविक आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या मुशीत राजकीय जडणघडण झालेल्या प्रतापराव भाऊ यांची एक सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक असलेला नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख होती. भारदस्त, उंचपुरे, देखणे व्यक्तिमत्त्व, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व याची देणगी त्यांना लाभली होती. 25 ऑक्टोबर 1934 रोजी भुईंज येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतापराव भोसले यांनी वयाच्या तिशीतच आपल्यातील राजकीय परिपक्वतेची चुणूक दाखवून दिली होती. सामाजिक बांधीलकीची जाण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रति असलेली तळमळ, त्याला लढाऊ बाण्याची मिळालेली जोड यामुळे अल्पवयातच ते भुईंजचे सरपंच झाले. भुईंज हे वाई तालुक्यातील विशेषतः महामार्गावरील बाजारपेठेचे मोठे गाव म्हणून सर्वांना परिचित असल्याने अर्थातच त्या गावचे सरपंचपद मिळवणारे प्रतापराव भाऊ त्याकाळी युवक वर्गात चांगलेच चर्चेत आले. साहजिकच काँग्रेसने त्यांना 1967 साली म्हणजे वयाच्या 33 व्या वर्षी वाई-खंडाळा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. तत्पूर्वी तब्बल चार टर्म आमदार राहिलेल्या दादासाहेब खाशेराव जगताप यांचा त्यांनी पराभव केला. पुढचे सलग चार टर्म प्रतापराव भाऊ हेच वाई-खंडाळय़ाचे आमदार होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1978 मध्ये जो पुलोद आघाडीचा ऐतिहासिक प्रयोग केला, त्यामध्ये पवारांसोबत खंबीरपणे आघाडीवर राहिलेल्यांमध्ये प्रतापराव भाऊ हे एक होते. त्या पुलोद सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यानंतर 1983 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात पॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. ग्रामीण विकास मंत्री म्हणून ते त्या मंत्रिमंडळात होते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतापराव भोसले या नावाला एक मोठे वलय प्राप्त झाले. त्या वेळी यशवंतराव चव्हाण लोकसभेत सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असत. 1984 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या वेळी प्रतापराव भोसले यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला होता. दुर्दैवाने याचदरम्यान चव्हाण साहेबांचे देहावसान झाले. त्यामुळे डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले प्रतापराव भाऊ त्या निवडणुकीत काँग्रेसचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार झाले. सातारा मतदारसंघाचे यशवंतरावजींचे वारसदार या नात्याने 1984, 1989 व 1991 अशा सलग तीन निवडणुकांमध्ये प्रतापराव खासदार म्हणून निवडून आले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचे सरकार आले. 1997 मध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा एक आश्वासक चेहरा म्हणून प्रतापराव भोसले यांच्याकडे सोपवली. 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचा हा विश्वास सार्थ ठरवला. राज्यात काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्ष जिंकतो त्यांना मुख्यमंत्री करण्याचा एक अलिखित संकेत गृहीत धरला तर प्रतापराव भोसले 1999 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला हवे होते. परंतु त्याप्रमाणे घडले नाही हे खरे. प्रतापराव भाऊ यांचे राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रांत अनमोल असे योगदान राहिले आहे. कृषी, औद्योगिक समाज रचनेचा यशवंतरावांचा विचार पुढे नेण्यासाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्यांना शिक्षणाच्या सुविधा देण्यापासून कामगारांच्या हाताला काम आणि शेतकऱयांच्या शेतमालाला भाव हा ध्यास घेऊन त्यांनी आपली हयात खर्ची घातली. भाऊंचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याचे स्मरण चिरंतन राहील.

[email protected]