मनतरंग : कोरोना काळातील मानसिक आरोग्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीलांबरी जोशी

कोरोना महामारीचे परिणाम गेले दिड वर्षांहून अधिक काळ आपण अनुभवत आहोत. समाजातल्या सर्व स्तरातील जीवनमानावर या महामारीचा परिणाम झालेला आहे. या सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला एक गंभीर प्रश्न म्हणजे मानसिक आरोग्याचा. 10 ऑक्टोबर हा दिवस जगभरात मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत जागरुक राहावं यासाठी साजरा केला जातो.

आपल्या वस्तीत तो फिरत फिरत येतो. आपलं न्हाव्याचं दुकान उघडतो. खूप जळमटं दिसतात. त्याला आश्चर्य वाटतं. पण तो ते साफ करतो. एवढय़ात काही सैनिक येऊन दुकानाची तोडफोड करतात. त्याचं त्याला भयंकर आश्चर्य वाटतं..! या आश्चर्याचं कारण म्हणजे सगळं काही जिथल्या तिथे असेल अशी त्याची अपेक्षा असते. मध्ये विस्मृतीच्या आजारात गेलेली 20 वर्षे त्याला आठवणार नसतातच. चार्ली चॅप्लीनच्या “द ग्रेट डिक्टेटर’’ या चित्रपटातला हा प्रसंग. या चित्रपटात चार्लीनं रंगवलेला ट्रँप युद्धकाळात एका विमानातून पडतो. तो वाचतो, पण डोक्याला मार लागल्यानं रुग्णालयात दाखल होतो. त्याला आपण कोण आहोत हे आठवायला लागल्यावर 20 वर्षांनी तो आपल्या वस्तीत जातो.

कोरोना लॉक डाऊननंतर अनलॉकच्या काळात आपली अवस्था या ट्रँपसारखी आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आधीचं जग आपण अनलॉकनंतर शोधायचा प्रयत्न करतोय. पण सगळंच बदललं असल्यामुळे आपलं भावविश्वच हादरून गेलं आहे. कोरोनाकाळात गमावलेले आप्तेष्ट, गेलेल्या नोकऱ्या, बंद पडलेले व्यवसाय, कोरोनाच्या आजारातून बाहेर पडल्यानंतर भेडसावणारे शारीरिक आजार याचा प्रत्येकाच्या मनाला बसलेला धक्का तीव्र स्वरूपाचा आहे. आर्थिक दुरवस्था आणि समाजात वावरायच्या भीतीमुळे वाढलेला एकटेपणा यातून जगातल्या प्रत्येक माणसामध्ये मानसिक तणाव वाढले आहेत. कोरोनाची साथ आता आटोक्यात आल्यासारखी वाटत असली तरी त्यामुळे झालेले मानसिक परिणाम मात्र दीर्घकाळ टिकतील असं तज्ञांचं मत आहे.

कोरोना व्हायरसच्या थैमानानं मानसिक आरोग्याला जेवढी हानी पोचली आहे ती दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावांपेक्षाही तीव्र आणि मोठय़ा प्रमाणात आहे. दुसऱ्या महायुद्धात 7.5 कोटी माणसं मारली गेली. त्यापैकी 2 कोटी लष्करातली होती आणि 4 कोटी सामान्य नागरिक होते. मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांचा विचार केला तर सुमारे 30/40 कोटी लोकांना दुसऱ्या महायुद्धाची झळ पोचली असं म्हणता येईल. शारीरिक अत्याचार आणि त्यातून झालेले दीर्घकालीन शारीरिक आजार अनेकांना सहन करावे लागले. पण त्या प्रत्येकाला नैराश्य, अस्वस्थता, चिंता, धक्कादायक घटना घडल्यानंतर जाणवणारी-पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असे मानसिक विकारही सतावत होतेच.

कोरोना व्हायरसने मात्र जगातल्या 700 कोटी लोकांपैकी 23 कोटी गाठलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा विचार केला तर सुमारे 100 कोटी लोकांना थेट आणि जगातल्या प्रत्येक माणसाला या ना त्या प्रकारे कोरोनाची झळ बसली आहे. एप्रिल 2020 मधल्या पहिल्या लॉक डाऊनपासून सुरू झालेली मानसिक तणावांची अनेक लक्षणं मे 2021 च्या लॉक डाऊननंतर लक्षणीय प्रमाणात वाढली. कोरोनामुळे झालेल्या मानसिक परिणामांमध्ये चिंता आणि नैराश्य यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. दोन वर्षांपूर्वी या दोन्हीचं सुमारे 11 टक्के इतकं असलेलं प्रमाण 2021 साली 41.1 टक्क्यांपर्यंत पोचलं आहे. व्यसनाधीनता आणि आत्महत्या यांचं प्रमाण वाढत चाललं आहे.

कोविड-19 मुळे ज्यांना रुग्णालयामध्ये जावं लागलं त्या रुग्णांमध्ये मनोविकारांचं प्रमाण एकूणच जास्त आहे. कोविड-19 होऊन गेलेल्या 8 लोकांपैकी एकाला कोरोनाचं निदान झाल्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये मेंदूविकार जडले आहेत. तसंच कोविड-19 होऊन रुग्णालयामध्ये जावं लागलं नसलेल्या 9 लोकांपैकी एकाला कोरोनाचं निदान झाल्यानंतर नैराश्य किंवा हृदयविकाराच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तसंच कोविड-19 होऊन गेलेल्या लोकांमधल्या पाचपैकी एकाला पहिल्या तीन महिन्यांत कोणता ना कोणता मनोविकार जडला आहे. हिंदुस्थानींवर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कोविड-19 नंतर 40.5 टक्के लोकांमध्ये चिंता, नैराश्य यांची लक्षणं आहेत. 71.7 लोकांना मानसिक अस्वस्थता आहे..!

मात्र साथीच्या रोगांबाबत यापूर्वी इतिहासात न घडलेली एक गोष्ट कोविड-19 च्या काळात घडली. ती म्हणजे या साथीचा लोकांवर मानसिक परिणाम किती / कसा झाला याबाबत संशोधकांनी मोठया प्रमाणात डेटा जमा केला. या डेटाच्या आधारावर जगभरातल्या लोकांवर कोणकोणते मानसिक परिणाम झाले, त्यांची तीव्रता किती होती, जगातल्या कोणत्या प्रदेशातल्या, कोणत्या आर्थिक / सामाजिक स्तरांमधल्या लोकांवर कसे मानसिक परिणाम झाले याचा लेखाजोगा मांडता येणं शक्य आहे. त्यानुसार उपचारांची दिशा ठरवता येईल. अर्थात, हे सगळं आटोक्यात यायला किती वेळ लागेल? याचं उत्तर कोणाकडेच नाही. यावर उपाय म्हणजे मुळात मूड चांगला नसणं आणि प्रत्येक गोष्टीत चिडचिड होणं, भावनांचा उद्रेक होणं हे सगळं आपल्याला होणार हे मान्य करायला हवं. आपल्या भावना जाणून घेऊन त्यावर उपाय करण्यासाठी मानसोपचारतज्ञांची मदत लागेल हेही मान्य करायला हवं. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं. चिंता किंवा नैराश्य वाटत असल्यास लगेच जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलणं, समाजातल्या सर्व लोकांशी संवाद साधायचा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे प्रयत्न करणं आणि गरज वाटल्यास समुपदेशकाची मदत घेणं हे उपाय गरजेचे आहेत.

मुळात जगभरात मानसिक आरोग्य इतक्या मोठय़ा प्रमाणात बिघडलं असलं तरी त्यावरच्या उपाययोजनांचा बहुतेक देशांत तुटवडा आहे. ‘‘जागतिक आरोग्य संघटने’’नं या समस्या लक्षात घेऊन 10 ऑक्टोबर 2021 या “वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’’च्या निमित्तानं “मूव्ह फॉर मेंटल हेल्थ ः लेट अस इनव्हेस्ट’’ हे कॅम्पेन जाहीर केलं आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करा असं आवाहन या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन – हू) यूटय़ूब, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक आणि लिंकडइनच्या चॅनेल्सवर आणि वेबसाईटवर राबवण्यात येणार आहे.

[email protected]