कोरोनामुक्तीसाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

>> डॉ. दिलीप पाखरे

महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत चांगला, पोषक आणि उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे. त्यातून मास्क वापराच, हात धुवाच आणि अंतर ठेवाच. नावही चांगलं सुटसुटीत आहे. एक वचन, तीन नियम. आरोग्याच्या प्रकाशाचा दिवा घरोघरी लावा. यातून त्यांनी मूलभूत आरोग्याच्या प्रकाशाची जाणीव करून दिली आहे. हे मिशन आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून शासन प्रत्येक घर, वाडी आणि वस्तीतून आपले आरोग्य पथक पाठवत आहे. भेट देत आहे. त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची खरी माहिती द्यावी. हे आपले कर्तव्य आहे. तपासणीत सहकार्य करावे. यातून कोरोनाच्या अंधःकाराचे सावट दूर करण्यात आपण मोलाचा वाटा उचलू शकतो.

योग्य कृतीसाठी ज्ञान, अभ्यास, जागरूकता, इच्छाशक्ती आणि नियोजनाची आवश्यकता असते. भविष्याचा वेध घ्यावयाचा असतो तेव्हाच त्याची फलश्रुती सकारात्मक आणि पोषक असते. कोरोना कोविड-19मुळे अनारोग्य, भीती, आर्थिक विवंचना, मंदी, बेरोजगारी, शैक्षणिक दुरवस्था, कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न यामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. या आजाराला हमखास तोंड देणारी औषधे अजूनही अस्तित्वात नाही. म्हणूनच लक्षणांना अनुसरून विलगीकरण, प्रमाणित औषधे, रुग्णाची प्रचंड इच्छाशक्ती आणि आरोग्यमयी प्रतिकारशक्ती याचाच उपयोग होतो. अर्थात आपल्या शासनाच्या काळजीपूर्वक आखलेल्या धोरणामुळे कोविड रुग्णालये, काळजीपूर्वक उपचार यामुळे आपल्याकडे बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लॉकडाऊन आवश्यक होता, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकॅबिलिटीमध्ये त्यालाही मर्यादा होत्या. ‘मिशन बिगिन’ आले. लॅन्सेट पत्रिकेत अलीकडे दिल्लीतील जेनोमिक्स ऍण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक ऍण्ड बायोटेक्नॉलॉजी यांनी एक संशोधन मांडले आहे. आधीचा विषाणू आणि नवीन विषाणू यांच्यात अनुवंशिक फरक आढळतो. तो स्वतःचे स्वरूप बदलतो. जेव्हा दुसऱया शरीरात प्रवेशतो तेव्हा काही बदल होतात. म्हणून दुसऱयांदा कोरोनाची शक्यता असते. लस येणार यात कुठलीच शंका नाही. तरीही 2021 पर्यंत आपल्याला कोरोना कोविड-19चा सामना करावाच लागेल. असे तज्ञांचे मत आहे. डॉ. ओक यांनी दूरदर्शनच्या एका चॅनेलवर आपले असे मत मांडले. हर्ड इम्युनिटीमध्ये बरेच धोके होते. तरीही शासनाच्या आणि त्या अनुषंगिक प्रयोग आपल्याकडे कधीही केले नाहीत. यात शासनाचे CARE FOR THE PEOPLE हे धोरण नक्की कारणीभूत ठरले. आज सहा महिने होऊन गेले. एक मात्र नक्की, स्वच्छ, बंदिस्त आणि हवेशीर घरात याचा शिरकाव नसतो. पण विषाणूंना तोंड देण्याचीच नैसर्गिक शक्ती कमी होते.

म्हणून जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था यांनी तीन नियम सांगितले आहेत. आज तेच आपल्या अत्यंत गरजेच्या ‘मिशन बिगिन अगेन’मध्ये आरोग्याचे सुरक्षित, संरक्षित आणि आरक्षित ही कवच प्रदान करते. ते अत्यंत स्वस्त, मस्त आणि मस्ट आहे.

त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत चांगला पोषक आणि उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे. त्यातून मास्क वापराच, हात धुवाच आणि अंतर ठेवाच. नावही चांगलं सुटसुटीत आहे. एक वचन, तीन नियम. आरोग्याच्या प्रकाशाचा दिवा घरोघरी लावा. यातून त्यांनी मूलभूत आरोग्याच्या प्रकाशाची जाणीव करून दिली आहे. हे मिशन आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून शासन प्रत्येक घर, वाडी आणि वस्तीतून आपले आरोग्य पथक पाठवत आहे. भेट देत आहे. त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची खरी माहिती द्यावी. हे आपले कर्तव्य आहे. तपासणीत सहकार्य करावे. यातून कोरोनाच्या अंधःकाराचे सावट दूर करण्यात आपण मोलाचा वाटा उचलू शकतो. आपले आरोग्याचे पथक एक हात सेवेचा पुढे करत आहे. आपण सहकार्याचे दोन्ही हात पुढे करूया. सावध असा. हस्तांदोलन नाह़ी. या प्रकारे आपण सर्व एक संरक्षक स्वतःचे, कुटुंबाचे आणि जगाचेही ठरू या. खरे धैर्यशील, उपकारक आणि समाजकारक योद्धे ठरू या.

मास्क वापरा, हात धुवा आणि अंतर ठेवा या तीन नियमांत स्वच्छतेचा मूलमंत्र दडलेला आहे. संसर्ग टाळण्याचाच आणि टळण्याचा एक मूलमंत्र दडलेला आहे. संसर्ग टाळण्याचाच स्वस्त, मस्त आणि मस्ट उपाय आहे. मास्क वापरल्यामुळे वातावरणात असलेले विषाणू आणि जिवाणू आपल्या तोंडावाटे आणि नाकावाटे जाणार नाहीत. या मुखनासिका पट्टीमुळे पुढचे फुप्फुसाचे संसर्ग होणार नाहीत. हात धुवा ही एक सवय होईल. तोंडात खाताना हजारोंनी असलेले संसर्गबाधक तिथल्या तिथे नाश पावतील. आपल्या जीवनाची आस संसर्गरहित राहील. आरोग्याची हमी राहील.

आज समाजमाध्यमावर अनेकजण म्हणतात, ये कोरोना वगैरे कुछ नही है, रॅकेट है. याला काही अर्थ नाही. यांच्या काही नादी लागू नका. उगाच ‘आ बैल मुझे मार’ कशाला करून घ्यायचे. थोडा संयम ठेवूया. एक मात्र खरं, काही असांसर्गिक आजारी व्यक्तिमत्त्वे मधुमेही, फुप्फुसाचे आजारी, अतिरक्तदाबाचे आजारी, तणावग्रस्त माणसे आणि ज्येष्ठ नागरिक यांना जास्त धोका आहे. म्हणूनच सावध असावीत पाऊले. सकारात्मक, बचावात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आणि पोषक आहे.

योग्य आहार, पोषक आहार, योग्य व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, शरीर शिथिलीकरणाचे, ऊर्जा मिळवण्याचे व्यायाम, योगासने, प्राणायाम हे प्रतिकारशक्ती, इच्छाशक्ती आणि सकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आपल्याकडे कुठेही थुंकणे याचे प्रमाण जरा जास्त आहे. स्वच्छतेच्या आरोग्यकारक धोरणाला हे मारक आहे. स्वतःला आणि कशाला दुसऱयाला आपल्या सवयीमुळे घातक ठरता. तेव्हा थुंकणं टाळा आणि आरोग्य राखा. महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबरला जगभर जयंती साजरी झाली. ते म्हणायचे, समाजातल्या शेवटच्या घटकाची आठवण ठेवा. सुखसमाधान, शांती आणि आनंद आपोआप मिळेल. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सर्वांसाठीच पोषक आहे. आपणही ती पार पाडूया आणि कोविड-19पासून सर्व मुक्त होऊ या.

आपली प्रतिक्रिया द्या