
>> योगेश मिश्र
उज्जैनमध्ये दीड महिन्यापूर्वी एका मुलीवर झालेल्या नृशंस, अमानुष अत्याचाराची घटना आजवर घडलेल्या अशा असंख्य घटनांपैकी एक असली तरी त्यामुळे सामूहिक मानसिकतेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गर्दीबद्दल बोलताना मानसशास्त्रज्ञांनी ‘बायस्टँडर इफेक्ट’ नावाचा मानवी वर्तनाचा एक पैलू शोधला आहे. बायस्टँडर म्हणजे प्रेक्षक. एखादी घटना अनेक लोकांसमोर घडते तेव्हा ते स्वतः काहीही न करता दुसऱ्याने पुढे जावे अशी अपेक्षा करतात. या सिद्धांतानुसार गर्दीमध्ये स्तब्धता येते आणि प्रत्येक जण प्रेक्षक बनून केवळ बघ्याची भूमिका घेत राहतात व माणुसकी, माणूसपण हरपून जाते.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मुलीवर दीड महिन्यापूर्वी झालेला अमानुष अत्याचार ही अनेक घटनांच्या मालिकेतील एक घटना आहे. ही बातमी 25 सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांसमोर आली तेव्हा अनेकांची मने हादरली, त्यांच्या आत्म्याला धक्का बसला. कथित गुन्हेगार पकडले गेले, पण यापूर्वीच्या असंख्य घटनांप्रमाणे अवघ्या चार-पाच दिवसांत सर्व काही शांत झाले. ज्यांच्या हृदयाला हादरा बसला, ज्यांचे आत्मे घायाळ झाले ते सर्व जण पुन्हा ‘अधिक महत्त्वाच्या’ कामात व्यस्त झाले.
लोकसमूहांची अशी वर्तणूक नवीन किंवा आश्चर्यकारक नाही. हे नेहमीच घडत आले आहे आणि पुढील काळातही याच चक्राची पुनरावृत्ती होत राहणार आहे. असे इतके अत्याचार आपण पाहिले, ऐकले आणि वाचले आहेत की, आपल्यात जणू त्यांविषयीची ‘रोगप्रतिकारक शक्तीच’ तयार झाली आहे. नवनवीन कांड, नवी बीभत्सता या आता केवळ काही काळाचा आक्रोश तयार करतात. त्यापेक्षाही दुसरे काही नाही. मात्र त्या मानवी अधःपतनाचे नवीन विक्रम रचत आहेत. उज्जैनच्या घटनेनेही नवे चित्र उभे केले आहे. याला नवीन म्हणणे योग्य ठरणार नाही, पण उज्जैनच्या घटनेने एक असे वास्तव समोर आणले आहे ज्याविषयी सर्वांना माहीत असूनही त्यावर कोणी बोलत नाही. हे वास्तव म्हणजे आपण सर्वच जण प्रेक्षक आहोत. प्रेक्षक म्हणून आपण सर्व जण या भेदक चित्राचा भाग आहोत. आपले चेहरे त्या चित्रात आहेत. उज्जैनचे चित्र अशा लोकांचे आहे ज्यांनी आपल्या घरासमोरून रक्ताने माखलेल्या अवस्थेत जाणाऱ्या मुलीकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर तिचा पाठलागही केला.
काय म्हणायचे या मानसिकतेला? आपण इतके असंवेदनशील, बोथट आणि क्रूर झालो आहोत की, कोणाच्याही वेदनांचा आपल्या मनावर काहीही परिणाम होत नाहीये? भवतालातील जागृती, संकल्पांचा आणि घोषणांचा हा परिणाम आहे का? अशा लोकांसाठी एवढेच म्हणता येईल की, प्रत्यक्ष गुन्हे करणाऱ्याइतकाच गुन्हा पाहणाराही दोषी असतो. आज जे तटस्थ आहेत त्यांचे गुन्हे काळ लिहिल्याशिवाय राहणार नाही. वाईट घटना घडताना पाहूनही तोंड लपवणाऱ्यांना तटस्थ म्हणणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यांना समान गुन्हेगार म्हणणे अधिक योग्य ठरेल, पण गुन्हेगार कोण निवडणार हा प्रश्न आहे. कारण इथे ‘हमाम मे सब नंगे’ अशी स्थिती आहे.
एक प्राचीन संस्कृती, एक अतिशय प्राचीन परंपरा आणि संपूर्ण जगात एक वेगळी ओळख असूनही आपण संवेदनशीलतेच्या पातळीवर कुठे आहोत याचे आकलन प्रत्येकाने करण्याची वेळ आता आली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली जखमी किंवा बेशुद्ध व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी झालेला एखाद्यावर हल्ला, ट्रेनमध्ये होणारे विनयभंग अशा अनेक घटनांचे आपण साक्षीदार होत आहोत, पण या घटना घडत असताना पुढाकार घेऊन आपण मदत करतो का? नाही. कारण आपल्याला तशी शिकवणूकच दिली जात नाही. इतरांच्या समस्यांमध्ये अडकू नका, पोलीस तुम्हाला त्रास देतील आणि उलट तुम्हाला अडकवतील, हाच सल्ला पदोपदी मिळत असतो.
गेल्या काही वर्षांत पोलीस सुधारणा, आधुनिकीकरण, कायदेबदल असे असंख्य उपाय योजिले गेले, पण मदत न करणे हा आजवर गुन्हा ठरलेला नाही. हे ऐच्छिक काम आहे. मुळात खुद्द पोलिसांवरही कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला पडलेल्या एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या आजारी व्यक्तीला पाहून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आपली गाडी थांबवल्याचे तुम्ही पाहिले आहे का? याचे उत्तर तुम्हालाच माहीत आहे.
गर्दीबद्दल बोलताना मानसशास्त्रज्ञांनी ‘बायस्टँडर इफेक्ट’ नावाचा मानवी वर्तनाचा एक पैलू शोधला आहे. बायस्टँडर म्हणजे प्रेक्षक. 1964 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका मुलीचा पाठलाग केल्यानंतर हल्लेखोराने तिच्यावर चाकूने हल्ला केला होता. मुलगी अर्धा तास ओरडत राहिली आणि हल्लेखोर तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर चाकूने वार करत राहिला. हा सर्व प्रकार त्या मुलीच्या घराजवळ घडला. घडणारे सर्व काही पाहत असनूही कोणीही शेजारी मदतीला आले नाहीत. जेव्हा साक्षीदारांना, प्रत्यक्षदर्शींना ‘त्यांनी पोलिसांना का बोलावले नाही’ याबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती की, त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटली. त्यांना या परिस्थितीत अडकायचे नव्हते. लोकांनी असे का केले यावर मानसशास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आणि असा निष्कर्ष काढला की, जेव्हा एखादी घटना अनेक लोकांसमोर घडते तेव्हा ते स्वतः काहीही न करता दुसऱ्याने कुणी तरी पुढे जावे अशी अपेक्षा करतात. या सिद्धांतानुसार गर्दीमध्ये स्तब्धता येते आणि प्रत्येक जण प्रेक्षक बनून केवळ बघ्याची भूमिका घेत राहतात.
उज्जैनमधील घटनेत एक मुलगी घरोघरी जात होती. तिथे गर्दी नव्हती. इथे स्तब्धता नव्हती, तर पूर्ण असंवेदनशीलता होती. याचे कारण लोकांना तशा प्रकारची शिकवणूकच दिली गेलेली नाही. मोठमोठे उपदेशक, कथाकार, यूटय़ूबर, नेते वगैरे मंडळीही या वर्तनाबाबत उपदेश तर सोडाच, पण साधी चर्चाही करत नाहीत. ही मंडळी केवळ ईश्वरप्राप्ती, आत्मिक शांती, देशाला जगातील सर्वात मोठी शक्ती बनवणे, सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे याविषयीच बोलताना दिसतात. मानवतेची, सहकार्याची शिकवण देणारे या भाऊगर्दीत कुणी दिसत नाहीत.
प्राण्यांवरील क्रौर्याविरुद्ध कायदे आहेत, पण एखाद्याचा बचाव न करता बघ्याच्या भूमिकेत राहण्याबद्दल म्हणजेच बायस्टँडर होण्याबद्दल कोणतेही कायदे नाहीयेत. आपण स्वतः आपल्या मुलांना हे शिकवतो का? नाही. कारण समाज, व्यवस्था, पोलीस, कायदा या शिकवणुकीच्या बाजूने उभे राहिलेले दिसत नाहीत.
आणखी काही दिवसांनी उज्जैनची घटना विस्मरणात जाईल, पण माणुसकी विसरू नका. देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग मानवतेच्या माध्यमातूनच जाणारा आहे. जागतिक दर्जाचे बनण्यासाठी प्रथम एक चांगला माणूस बनणे आवश्यक आहे. त्यासाठी ही प्रेक्षकी भूमिका त्यागणे गरजेचे आहे.
(लेखक ज्येष्ठ विश्लेषक–संपादक आहेत)




























































