
आपली संस्कृती सत्यमेव जयते या बोधवाक्यावर उभारलेली आहे. पण सत्य हा केवळ एक शब्द आहे का? संत तुकोबा म्हणतात, `सत्य सत्य देते फळ, नाही लागतच बळ।’ सत्य चांगलं फळ देते हे आपली शास्त्र पुराणे सांगतात, बोधकथा सांगतात. सत्याचा अंगीकार केल्यास दुसर्या कसल्याही आधाराची गरज नसते इतकं बळ सत्यात असतं. सत्य आपल्याला निर्भय बनवतं. या भूमीवर जे जे महापुरुष म्हणून सन्मानित झाले त्यांनी सत्याचाच पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर सत्याची आरती लिहिली आहे. `सत्य सर्वांचे आधीघ। सर्व धर्माचे माहेर’. फुलेंनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला. सत्याचा पाठपुरावा केला सत्यशोधक समाजाची-धर्माची स्थापना केली. महात्मा गांधीजींनी अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मूलमंत्र दिला. सत्य हीच नीती आणि नीतीने आचरण म्हणजेच सत्याचरण. बुद्धीला नीतीची आणि सत्याची जोड नसेल तर अनर्थ घडतात, हे आपण अनेक कथांतून पाहिले आहे. सत्य काही काळ दडपलं जातं, पण कायमचं कधीच दडपून ठेवता येत नाही. जे जे सत्य असते ते कल्याणकारी असते आणि जे जे कल्याण करणारे असते ते ते नेहमीच सुंदर असते. म्हणूनच आपण म्हणतो… सत्यम् शिवम् सुंदरम्।।
संध्या शहापुरे

























































