ठसा – दादा लोगडे

>> दुर्गेश आखाडे

16 व्या राज्य नाटय़ स्पर्धेपासून गतवर्षीच्या 59 व्या राज्य नाटय़ स्पर्धेत सातत्याने सहभागी होणारे रंभभूषाकार आणि नेपथ्यकार गणपत ऊर्फ दादा लोगडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. कोकणातील हौशी रंगभूमीच्या उभारणीत ज्यांनी नेपथ्य आणि रंगभूषेची जबाबदारी लीलया सांभाळली होती. मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर रंगभूषा आणि नेपथ्यकार म्हणून काम केल्यानंतर गावी येऊन पुन्हा हौशी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला होता.

बसणी गावात अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादा लोगडे पुढील शिक्षणासाठी मुंबईत गेले. मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असताना नाटकांची आवड असल्यामुळे दादा लोगडे रंगभूमीकडे वळले. नाटकाचे धडे गिरवल्याचा अनुभव त्यांना उपयोगी पडला. मुंबईत भाऊ रांगणेकर, बाबा पार्सेकरसारख्या नेपथ्यकारांकडे त्यांनी नेपथ्याचे धडे गिरवल्यानंतर कृष्णा बोरकरांसारख्या रंगभूषाकारांकडून त्यांनी रंगभूषा आत्मसात केली. त्या वेळी आंतर गिरणी कामगारसारख्या स्पर्धांतून ते बॅकस्टेज, नेपथ्य आणि रंगभूषा करू लागले. त्या काळातील ‘सोबत तव प्रीतीची’, ‘कुटुंब’, ‘खोली पाहिजे’, ‘अमृत नव्हे विष’, ‘नेक जात मराठा’, ‘गारंबीचा बापू’, ‘शिवकंकण’, ‘आधेअधुरे’, ‘सीमेवरून परत जा’सारख्या नाटकांत त्यांनी रंगभूषा आणि नेपथ्याचे काम केले. कृष्णा जन्नूरकर यांच्यासारख्या त्या काळात नावाजलेल्या नेपथ्यकारासोबत काम करताना दादांच्या अनुभवात भर पडली. मुरारी शिवलकर, भाई सावंत, अनंत वालावलकर यांसारख्या मंडळीसोबतचा कामाचा अनुभव घेऊन दादा लोगडे रत्नागिरीत परतले. रत्नागिरीत बसणी पंचक्रौशी, त्यानंतर जिज्ञासा थिएटर्स, समर्थ रंगभूमी आणि मग पुढे रत्नागिरीतील सर्वच नाटय़संस्थांबरोबर त्यांनी काम केले. पूर्वी रंगभूषा आणि नेपथ्य करणारी मंडळी मर्यादित होती. त्यामुळे सर्वच नाटय़संस्थांना दादांचा आधार होता. नाटय़संस्था कोणतीही असून रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून दादा लोगडे हे नाव निश्चित असायचे. संगीत नाटक असो किंवा एकांकिकांना दादा लोगडे यांचे नेपथ्य हे एक ठरलेले समीकरण असायाचं. आयुष्याच्या शेवटपर्यंत रंगभूमीची सेवा करणाऱया दादा लोगडे यांनी अनेक पुरस्कार, पारितोषिके पटकावली आहेत.

त्यांनी महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा नेपथ्याची प्रथम पारितोषिके पटकावली होती. त्यामध्ये ‘आंदोलन’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘आहे उत्तर याला’, ‘मोहिळ’, ‘मिस फायर’ या नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय गोवा कला अकादमीच्या स्पर्धेत, सायक्लो करंडक, कामगार कल्याण राज्य नाटय़ स्पर्धेत नेपथ्याची प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने विशेष पुरस्कारही त्यांना मिळाला. महाराष्ट्र रंगायन दिल्ली येथील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग त्यांनी घेतला. 2014 साली नाटय़संपदा मुंबई आणि अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने बाबा वर्दम स्मृती गौरव कै. बाबुलनाथ कुरतरकर स्मृती पारितोषिक प्रदान करून दादा लोगडेंच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात काम करताना दादा लोगडे हे बसणी गावचे सरपंचही होते. शिवसेनेचे रत्नागिरी तालुक्याचे ते माजी उपतालुकाप्रमुख होते. सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच राजकारणातही त्यांचा वावर होता. वाढत्या वयातही त्यांचा उत्साह तरुण रंगकर्मीना लाजवणारा होता. कोकणात पारावरची नाटकं मोठय़ा प्रमाणात रंगतात. उत्सवात हीच नाटकं ग्रामीण भागातील नाटय़रसिकांसाठी मेजवानी ठरतात. असे नाटय़प्रयोग अधिक उत्तम होण्यासाठी नेपथ्याची गरज असते. ती गरज दादा लोगडेंच्या कलेमुळे पूर्ण झाली. मानधन मिळो न मिळो तरीही दादांनी एखादा नाटय़प्रयोग उभा राहतोय म्हटल्यावर त्यासाठी नेहमी पुढाकार घेतला होता. त्यांचा रंगभूमीवरील अनुभव नवोदित कलाकरांसाठी मार्गदर्शक होता. रत्नागिरीतील विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. कोरोनामुळे हौशी आणि पारावरचे नाटकाचे प्रयोग बंद झाल्याने ते व्यथित झाले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांचे रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या