
>> ऍड. गिरीश राऊत
मुळात आपल्याकडे धरणे शेतीसाठी झाली नाहीत. ती औद्योगिकरण व शहरीकरणासाठी झाली. आता कोकणाकडे नजर वळली आहे. आज देशातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत व सर्वात कमी ओलितही महाराष्ट्रात आहे. कोरडवाहू शेतीला दोष देणे किंवा पर्यटनाचे कौतुक करणे हेदेखील चूक आहे. आज देशात 2,75,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. 93 टक्के नद्या प्रदूषित आहेत. भूजल खोलवर गेले आहे. लाखो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणून खरे तर प्रश्न असा पडायला हवा होता की, धरणे का बांधली?
नदी, झरे, ओढे जसे जमिनीवरून वाहतात तसे खालूनही वाहतात. नद्यांचे पाणी भूजल वाढवते तसेच भूपृष्ठाखालूनही वर नदीत पाणी येत राहते. नद्या बारमाही वाहण्यात याची मोठी भूमिका असते.
गेल्यावर्षी केरळमधील महापुरासाठी कारणीभूत असलेल्या धरणांबद्दल दोन राज्यांत वाद झाला. मुळात धरण ही चूक आहे. वाहणाऱया नदीला अडवून केलेला पाण्याचा साठा म्हणजे धरण. नदी वाहण्यासाठी जन्म घेते. धरणामुळे खालील सागरापर्यंत हानी होते. जैविक विविधता नष्ट होते. धरणाच्या पाण्यात वरील जंगल, गावे बुडतात. प्रत्यक्ष शेती करणारेच नव्हे तर शेतमजूर, आदिवासी, ताडीमाडी काढणारे वा इतर प्रकारे जंगलाच्या आधारे जगणारे बेदखल होतात. त्यांची कोठे नोंद नसते. ते मग अगतिकतेपोटी उरलेले जंगल तोडून विकून पैसे मिळवणे सुरू करतात. औद्योगिकरण, शहरीकरण करणारे याचा गैरफायदा घेतात.
लोक असा प्रश्न विचारतात की धरणाला विरोध का? नदी जोडण्याला विरोध का? मातृभूमीबद्दल ‘वंदे मातरम्’ गीतात ‘सुजलाम् सुफलाम्’ म्हटले आहे. 50-60 वर्षांपूर्वीपर्यंत स्थिती तशीच होती. शुध्द पाण्याच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. झरे, ओढे, तलाव, विहिरी भरलेल्या होत्या. मासळी होती. प्रत्येक गावात किमान 2 ते 3 नैसर्गिक कमळाच्या फुलांनी युक्त, बदके, हंस विहरणारे सुंदर स्वच्छ तलाव होते. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. देशात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेली गावे फक्त सुमारे 250 होती. पर्वतांवरून येणारे सुगंधी थंडगार वारे वाहत होते. राजस्थानातील जैसलमेर, बिकानेरसारख्या काही चार ते सहा इंच पाऊस पडणाऱया विभागांतील गावेही पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होती. शेतकऱयांनी कधीही आत्महत्या केली नव्हती. मात्र आज देशात 2,75,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. 93 टक्के नद्या प्रदूषित आहेत. भूजल खोलवर गेले आहे. लाखो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत.
म्हणून खरे तर प्रश्न असा पडायला हवा होता की, धरणे का बांधली? नद्या का जोडायच्या?
हरितद्रव्याने अविरत सुमारे 250 कोटी वर्षे कार्बन शोषला. जीवनाचा विकास करणारे सुयोग्य तापमान त्यामुळे मिळाले. म्हणून मानवप्राणी व जैविक विविधता आली. मानवाने जीवन फुलवणाऱया पृथ्वीला आपल्या यंत्रावर आधारित जीवनविरोधी जीवनशैलीमुळे फक्त 250 वर्षांत जीवनास प्रतिकूल बनवले.
स्वतःला आधुनिक म्हणवणाऱया शहरी मानसिकतेच्या माणसाने त्याच्या प्रत्येक मूर्खपणाचे एक शास्त्र केले व ते शिकवण्यासाठी विद्यापीठे स्थापन केली. युरोपातून याची सुरुवात झाली.
त्यातून निर्माण झालेले ‘तज्ञ’ आता वैज्ञानिक पध्दतीने डोंगर तोडा, कायदेशीर खाणकाम करा, अभ्यास करून विकास प्रकल्प करा, पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील भाग सोडून इतरत्र औद्योगीकरण करा, असे काहीबाही बरळू लागले.आत मुले पूर्ण शिक्षणकाळात मातीत हात घालणार नाहीत याची ‘काळजी’ घेतली जाते. अर्थात ती एकही झाड लावत नाहीत, अगदी शेतकरी कुटुंबात वाढत असली तरी. हे शिक्षण उपजीविकेसाठी तयार करते ही कल्पना चूक आहे. ते औद्योगिकरणासाठी तंत्रज्ञानाने केलेल्या वस्तू विकत घेऊन वापरणारा माणूस घडवते. हे जगणेच नाही. यंत्राचा भाग म्हणून वापरले जाणे आहे. प्रत्येकाला मोटारीचे स्वप्न दाखवले जाते, परंतु त्यामुळे मान्सून गमावला जाईल आणि काही दशकांत आपण उष्णतेने भाजून मरू हे सांगितले जात नाही.
पदवीधरांनी आयटीत नोकरी करायची की भजी तळायची यावर वाद होतो. पण खरी गोष्ट ही की, ना आयटीत नोकरी करायची आणि ना भजी तळायची. सर्वांनी शेती करायची. आपले अन्न आपण पिकवायचे व खायचे, विकायचे नाही. जसे पाच दहा हजार वर्षे करत होतो.
मुळात आपल्याकडे धरणे शेतीसाठी झाली नाहीत. ती औद्योगिकरण व शहरीकरणासाठी झाली. आता कोकणाकडे नजर वळली आहे. नैसर्गिक समृध्द भागांना आधी ’मागास’ असा शिक्का मारला जात आहे. मग जेथे पाणी मुबलक आहे अशा गावकऱयांना, धरण झाल्यावर तुमच्या घरी नळाने पाणी येईल असे गाजर दाखवले जाते. एवढय़ा प्रलोभनावर लोक धरणांना होकार देऊन आपले शाश्वत पाणी व पुढे नैसर्गिक समृध्दी गमावून बसतात. कोकणातील धरणे, येऊ घातलेल्या रिफायनरी, थर्मल पॉवर, रासायनिक, प्लॅस्टिक, अणुभट्टय़ांसारख्या औद्योगिकरणाला पाणी पुरवण्यासाठी होतील. उद्योगांची भूक व तहान पृथ्वी भागवू शकली नाही. यामुळे इतर भागांप्रमाणे कोकण भकास होईल. विहिरींमधील जमिनीच्या पृष्ठभागालगतचे पाणी ही पृथ्वीमातेची करोडो वर्षांची देणगी आपण धरणाला आमंत्रण देऊन गमावू हे ग्रामस्थांच्या लक्षात येत नाही. हे सर्वत्र घडले. मग अधिकाधिक तंत्रज्ञानावर व पर्यायाने पैशावर अवलंबून राहणे सुरू झाले. निसर्ग संपुष्टात आला.
आज देशातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत व सर्वात कमी ओलितही महाराष्ट्रात आहे. कोरडवाहू शेतीला दोष देणे किंवा पर्यटनाचे कौतुक करणे हेदेखील चूक आहे.
मुंबईत अनावश्यक व हानीकारक, भूयारी रेल्वे प्रकल्प शहरातील झाडे, डोंगरावरील व सागरातील जंगल तोडत असता धोरणात्मक निर्णय व विकास या सबबीखाली विनाशाकडे प्रवास चालू आहे. केरळ, हिमाचलचा अनुभव समोर असूनही, 26 जुलै 2005 व उत्तराखंडापेक्षा मोठय़ा दुर्घटना घडवण्याची तयारी सर्वत्र चालू आहे यात शंका नाही.
(लेखक भारतीय जीवन व पर्यावरण चळवळीचे निमंत्रक आहेत.)































































