विज्ञान रंजन – काळोखाची किमया

>> विनायक 

‘तमसो मा ज्योतीर्गमय’ हे तात्विकदृष्टय़ा खरंच आहे. त्याचा अर्थ अज्ञानाच्या अंधःकाराकडून ज्ञानाकडे जाणं असा होतो. मात्र जीवशास्त्र्ाात आणि भौतिकशास्त्र्ाात प्रकाशाइतकंच काळोखालासुद्धा महत्त्व आहे. कल्पना करा की, एका संध्याकाळी सूर्य मावळलाच नाही तर? म्हणजे संध्याकाळच झाली नाही आणि सूर्य सातत्याने तळपत राहिला तर जगणं असह्य होईल. पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण धुवीय प्रदेशात क्षितिजावरच्या सूर्याचं अस्तित्व बराच काळ राहून सुमारे 23 तासांचाही दिवस घडतो. परंतु तिथली रात्रही कालांतराने तशीच व्यापक होते. काही अपवादात्मक सजीव अशा वातावरणाशीही जुळवून घेऊन राहतात. त्यात माणसांचाही समावेश असतो, परंतु ज्याला आपण वैविध्यपूर्ण ‘जीवसृष्टी’ म्हणतो ती बहरते ती मुख्यत्वे विषुववृत्ताच्या आसपासच्या परिसरात आणि दिवस-रात्रीचे प्रहर समान असतात अशा ठिकाणी.

सध्या आपल्या देशात हिवाळा सुरू आहे. कारण सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर तळपतोय. 21 डिसेंबरला तर दिवस (डे-टाइम) कमीत कमी आणि रात्र सुमारे 13 तासांची असेल. याउलट उन्हाळय़ात रात्र (नाईट-टाइम) कमी आणि दिवस मोठा असतो. यात अक्षांशानुसार थोडाफार फरक पडत असला तरी दिवस-रात्रीचा खेळ सुरूच राहतो. जीवन फळण्या-फुलण्यासाठी प्रकाश आणि काळोख दोन्हीचीही सारखीच गरज असते.

माणसाच्या बाबतीत सांगायचं तर काळोखात विश्रांती घेण्याने डोळय़ांना आणि मेंदूलाही आराम मिळतो. दिवसाचा प्रकाश सहन करण्याची डोळय़ांची क्षमता अबाधित ठेवायची तर अंधाराची गरज असतेच. डोळय़ातील प्रकाशसंवेदनाशील (लाइट-सन्सेटिव) पिंगमेन्टस किंवा रंगद्रव्याची अथवा ऱ्होडोप्सिनची पुनर्निर्मिती काळोखात होते. हे डोळय़ांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतं. रात्रीच्या झोपेसारखी निवांत झोप दिवसा येत नसल्याने आपला जैविक ताल (ऱ्हिदम) हळूहळू बिघडतो. त्यातून डोकेदुखी, डोळेदुखी, निद्रानाश असे विकार कालांतराने त्रास देऊ शकतात.

काळोखामुळे शरीराचं ‘जागृतावस्था आणि निद्रा’ यांचं ‘घडय़ाळ’ (बायोक्लॉक) व्यवस्थित चाललं तरच हॉर्मोन्सची योग्य वाढ आणि चयापचय क्रिया सुरळीत चालते. रात्री पुरेशी, आरोग्यदायी झोप झाली असल्यास सकाळी जाग येताच ‘फ्रेश’ वाटतं. मात्र गेल्या दोन शतकात माणसाचा हा दिवस-रात्रीचा ‘ताल’ पार बिघडलाय. लवकर म्हणजे सूर्यास्तानंतर थोडय़ाच वेळात झोपी जाऊन लवकर म्हणजेच सूर्योदयापूर्वी जागे होण्याचा काळ कधीच मागे पडला. त्याला दोन महत्त्वाची कारणं घडली. त्यापैकी एक म्हणजे विजेचे दिवे आल्याने जो झगमगाट सर्वत्र पसरला त्याने आणि औद्योगिक क्रांतीनंतरच्या रात्रपाळीच्या नोकरीने साऱ्या घरादाराची झोप बिघडवली. अर्थात, या वैज्ञानिक प्रगतीचे फायदे अगणित झाले हे कोणीही मान्य करेल. विजेच्या दिव्यांनी नुसतं जगच उजळलं नाही तर अवजड यंत्रेही विजेवर चालू लागली. या ‘क्लीन एनर्जी’ने माणसाला बरंच काही दिले, परंतु आत्मसंयम नसल्याने रात्रीचा दिवस करून जागरणं, पाटर्य़ा याचं प्रमाण वाढलं. कृत्रिम प्रकाशाने ‘दिवसा’चा ‘प्रकाशवेळ’ इतका वाढवला की, आता सुमारे 75 टक्के मानवी वस्तीत काळोखी रात्र होतंच नाही.

पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी राहत नाही याचा विसर मात्र पडत गेला. कारण ज्या ‘निशाचर’ प्राणी, कीटक, वनस्पतींचे जैवचक्र काळोखावरच अवलंबून असतं त्यांच्यावर मानवी लखलखाटाचा विपरीत परिणाम होणं साहजिकच होतं.

पौर्णिमेच्या रात्री वगळता पृथ्वीवर रात्रीचा अंधार भेदणारा प्रकाश पूर्वी फक्त ताऱ्यांचा असायचा. प्रकाशमापनात तो सर्व उजेड केवळ 0.002 लक्स इतकाच असे, परंतु प्रत्येक रात्रीची सर्वंकष ‘दिवाळी’ करण्याच्या नादात आता 80 टक्के पृथ्वीवासीयांना रात्रीचं आकाश किमान 10 टक्के जास्त प्रकाशमान दिसतं. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश केवळ 0.25 लक्स असतो. यावरून कृत्रिम ‘तेजा’ने रात्रीचं गणित किती बिघडवलंय ते लक्षात येईल.

मेलॅटोनिन नावाचं हॉर्मोन रात्रीच्या अंधारातच मेंदूतील पिनीयल ग्रंथीतून निर्माण होतं ते झोपेसाठी आवश्यक असतं. माणसाच्या ‘झोपेचं खोबरं’ अतिरिक्त प्रकाशाने कसं होतं हा एक भाग, पण काजवे, समुद्री कासवं यांच्या प्रजनन संकेतात, तसंच स्थलांतरीत पक्ष्यांच्या नैसर्गिक दिशादिग्दर्शनात रात्रीचा कृत्रिम प्रकाश बाधा आणतो. त्याचप्रमाणे अनेक उभयचर (जमीन आणि पाण्यात राहणारे) जीव अगणित सूक्ष्म कीटक यांची रात्र माणसाने त्यांना ‘न सांगता’ काढून घेतल्याने त्यांचं जीवन दिवसेंदिवस अधिक धोक्यात येत आहे. वैज्ञानिकांच्या मते आपण सध्या सहाव्या ‘विलोपा’च्या (एक्स्टिंक्शन) दिशेने चाललो आहोत. त्यात नैसर्गिक उत्पत्ती-स्थिती-लयाचं चक्र बिघडविण्यात मानवनिर्मित प्रदूषणाचा आणि त्यातही प्रकाश प्रदूषणाचा वाटा आहेच. मग कोणी म्हणेल, रात्रीचे जॉब काय थांबवायचे? अनेक कार्यक्रम रद्द करायचे? नाही. लगेच इतक्या टोकाला जायचं कारण नाही. मात्र तारतम्याने दिवस-रात्रीचा नैसर्गिक समतोल सांभाळण्याच्या दृष्टीने विचार तेवढा करायचा. तो व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, सर्व क्षेत्रांत कधी ना कधी करावाच लागेल. विज्ञानाचे मूक इशारे लक्षात घेणारा ज्ञानप्रकाश उजळला तर माणसाचं भवितव्य धोक्यात आणणारा अज्ञानाचा अंधार दूर व्हायला मदत होईल. ‘तमसो मा ज्योतीर्गमय’ ते हेच असेल!