कर्ज म्हणजे ताण, गुंतवणूक एक ऊर्जा

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आज आपण बोलणार आहोत आपल्या नजीकच्या काळात येणाऱ्या खर्च किंवा ध्येयासंदर्भात. नजीकच्या काळात येणारे काही खर्च किंवा ध्येय खूपच मोठी असल्याने कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. पण काही खर्च किंवा ध्येय गुंतवणुकीच्या माध्यमातून साकार करता आले तर कर्जाची गरज लागणार नाही

आपल्या आयुष्यात असे अनेक खर्च किंवा ध्येय जे पुढल्या तीन ते पाच वर्षांत अपेक्षित आहेत, त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो व ती गोष्ट समोर आल्यावर मात्र चिंतित राहतो. ती गोष्ट करायचीच आहे तर त्यासाठी कर्ज काढतो किंवा ती पुढे ढकलतो.

आपल्या घरापासून उदाहरण घेतले तर घरची रंगरंगोटी किंवा अंतर्गत सजावट यासाठी पाच लाख खर्च येणार असेल तर पाच वर्षांनंतर त्याची तरतूद न केल्याने एक तर कर्ज घेतो नाहीतर पुढे ढकलतो. त्यामुळे दहा वर्षे घराला रंग लागत नाही. आपण फॉरेन ट्रिपचे ध्येय ठेवतो. तसेच मुलांचा पाचवा वाढदिवस किंवा मुंज अशी अनेक ध्येय आपल्या समोर येणार असतात. याप्रमाणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू या कालांतराने खराब होणारच आहेत. मोबाईल दर दोन वर्षांनी आपण बदलतो. अशा अनेक गोष्टी असतील त्याचा भविष्यात पुन्हा खर्च येणार आहेच व आपण तो टाळू शकत नाही. आपण आजच त्याचा विचार न केल्याने त्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करत नाही व ते समोर आले की हतबल होतो. जोपर्यंत एखादा खर्च किंवा ध्येय लांब आहे तोपर्यंत त्याची झळ लागत नाही, पण ते जेव्हा आजमध्ये येतात तेव्हा मात्र त्यांना रोजच्या खर्चात घेताना आपली तारांबळ उडते.

व्यावसायिकांचा जर विचार केला तर लॅपटॉप, कॉम्प्युटर, नवीन टेक्नॉलॉजी, वाढलेल्या व्यवसायामुळे लागणारी नवीन वाढीव जागा, त्याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, अनेक प्रकारचे टॅक्सेस अशा अनेक गोष्टी येणार असतात, पण आपण आज त्याकडे पाहत नाही.

समजा आपण या येणाऱ्या संभाव्य खर्चाची यादी केली व तो खर्चही गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजूला काढायला सुरुवात केली तर नक्कीच भविष्यात आपल्याला कर्ज घेण्याची गरज उरणारच नाही. जी गोष्ट तीन ते पाच वर्षांत थोडी जोखीम घेऊन म्युच्युअल फंडात जरी गुंतवली किंवा अगदी एक वर्षात उद्भवणाऱ्या खर्चासाठी जोखीम नसलेल्या गुंतवणुकीमध्ये गुंतवली तरीही जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपल्याकडे निधी उभा असेल व त्यातून आपल्याला निखळ आनंद मिळेल.

पाच वर्षांत जर आपणास पाच लाख रुपये लागणार असतील व 12 टक्के परतावा मिळणार असेल तर महिन्याला फक्त 6062/- रुपये एवढीच गुंतवणूक करावी लागेल. हाच परतावा जर 15 टक्केच्या घरात गेला तर तेवढीच गुंतवणूक करून आपल्या हातात 543615/- रुपये मिळतील. अशा प्रकारे भविष्यात येणारे अनेक खर्च आपण संबोधित करू शकतो व आपली ध्येय साकारू शकतो.

ही जर सवय आपल्याला लागली तर तुम्हीच बोलाल, कशाला हवीत कर्जे…

[email protected]