प्रासंगिक – दीप पूजनाचे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रामकृष्ण वि. अभ्यंकर

रविवारी आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे. या तिथीला परंपरेने तिन्हीसांजेला सामुदायिक दीप पूजन केले जाते. परंपरेने आपल्याकडे नवरात्र, दिवाळी या दरम्यानदेखील दीप प्रज्वलन केले जाते. रोज तिन्हीसांजेला तुळशी वृंदावन वा देव्हाऱयासमोर घरातील सारी मंडळी एकत्र बसून अत्यंत मंगल वातावरणात ‘शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदा…’ म्हणतात. सर्वांना उत्तम आयु-आरोग्य, शांती, संपत्ती, संतती, स्थिरता लाभावी हा त्यामागे प्रमुख उद्देश असतो. आषाढ महिना संपून दुसऱयाच दिवशी श्रावण महिना चालू होतो. हिंदू परंपरेत श्रावण महिना अत्यंत पवित्र समजला जातो. त्या महिन्यात बहुतांशी धार्मिक कार्य केली जातात. उपास-तपास, व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा, दान-धर्म, नव्या संकल्पांनी हा काळ अत्यंत समृद्ध होत असतो.

आपल्याला नवरात्र, दिवाळी नवीन नाही. त्यामुळे साहजिकच दीपावलीत दिव्यांची रांग सर्वत्र लावली जाते. ते दिवे तेवल्यानंतर सर्वत्र पसरणारा प्रकाश सर्वांना प्रेरणा व वेगळा उत्साह, आनंद देऊन जातो. दीप अमावस्येच्या अगोदर घरातील सर्व प्रकारचे दिवे, समया, लामणदिवे, निरांजनी, पणत्या बाहेर काढून साफ केल्या जातात. तिन्हीसांजेच्या वेळी पाट वा चौरंगावर वस्त्र पसरवून विविध प्रकारचे दिवे तेल-तुपाने तेवले जातात. त्यांना हळद-कुंकू, गंध-फुले वाहून धूप, फळे, नैवैद्य दाखवून यथाशक्य दिव्यांचे पंचोपचारी पूजन केले जाते. पाटासभोवती छानशी रांगोळी काढली जाते. उदबत्ती धूप, नैवैद्य दाखवला जातो आणि अशी पंचोपचारी पूजा संपन्न केली जाते. कणीक व गूळ, तूप एकत्र करून त्याचा नैवैद्य बनविला जातो. दिवे संध्याकाळी म्हणजे तिन्हीसांजेच्या वेळी लावले जातात. त्या वेळेस लहान मुलांच्या उपस्थितीत ते पूजन केले जाते आणि मुलांचे औक्षण करून, ओवाळून, तेजरूपी अग्नीची प्रार्थना केली जाते.

गटारी अशा शब्दाने या तिथीस अपमानित केले जाते. वास्तविक दीप पूजनाचा व मद्याचा काहीही संबंध नाही. आपल्यात आषाढी अमावस्येस अत्यंत श्रद्धेने दीप पूजन केले जाते. दीप प्रज्वलनाने सर्वत्र सुरेखसा उजेड पडतो. अंधाराचा नाश होऊन त्याद्वारे खरेखुरे ज्ञान प्रचार-प्रसार होऊन आपल्यातील असलेल्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा, रोग, व्याधी नष्ट व्हाव्यात हा मोठा विचार त्यामागे आहे – ‘तमसोमा ज्योर्तिगमय़’ पण दुर्दैवाने घडते मात्र भलतेच. चंगळवाद जोपासताना आपण नको तिथे विचाराने व कृतीने भरकटत चाललो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या संस्कृतीत सणांना फार महत्त्व दिले आहे त्यामागे सामाजिक आरोग्याचा विचार नक्कीच केला आहे.

वैद्यकीय महत्त्व – आषाढी अमावस्येला गतहारदेखील म्हटले जाते. गत आहारी म्हणजे गेलेला आहार. या अमावस्येअगोदरचा आहार. श्रावणात हवामान अन्न पचनास अनुकूल नसल्याने आहारदेखील हलका अपेक्षित असतो. ताज्या भरपूर भाज्या या काळात उपलब्ध असल्याने वैद्यकीयदृष्टय़ा उत्तम शाकाहार योग्य असतो. जडान्न केव्हाही आरोग्य बिघडविण्यास प्रवृत्त करीत असते. उपवास, व्रत-वैकल्यामुळे मर्यादित अन्नसेवन होत असते. उपवासाच्या निमित्त खाल्ल्या जाणाऱया कंदमुळांमुळे आपसूक दुर्मिळ खनिजे व पोषक द्रव्य सेवन केली जातात. या साऱया गोष्टींचा सर्वांकडून या दीप आमावस्येच्या निमित्ताने सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य विचार व कृती होणे आवश्यक वाटते.