पाऊलखुणा – देवराईतील देवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

पश्चिम घाटाच्या परिसरात अनेक निबीड अरण्ये, नद्यांची खोरी, घाट वाटांमधून जाणारे प्राचीन मार्ग, नाना प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक आहेत. तशाच प्रकारच्या असंख्य जातींच्या वेली, झाडी झुडपे आहेत. महाराष्ट्रात या पश्चिम घाटाला आपण सह्याद्री या नावाने ओळखतो त्या सह्याद्रीच्या परिसरात अनेक देवराई आहेत.

या देवराई म्हणजे काय ? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विशिष्ट देवाच्या नावाने राखून ठेवलेला जंगल. यालाच इंग्रजीमधे “Sacred Groves” असं नाव आहे.

या देवराईंमध्ये महाकाय वृक्ष, महावेली, दुर्मिळ औषधी वनस्पती, वेगळ्या जातींची झुडपे, प्राणी, पक्षी, कीटक या सगळ्यांचा अधिवास असतो. त्याचप्रमाणे झरे, तलाव, बारव, विहिरी इत्यादी पाण्याचे जिवंत स्रोतही असतात. देवराईचे हे अस्सलपण टिकून असते ते राईतील देवामुळे. बहुतांश देवरायांमध्ये मातृदेवता या प्रमुख देवता असतात, तर काही वेळा अशा देवींच्या बरोबरीने काही पुरुष रक्षक देवतांची स्थाने ही देवराईत असतात.

या मातृदेवतांची स्थानिक नावे सोमजाई, निमजाई, वाघजाई, जाखाई, कोराई अशा प्रकारची असून बहुतांश देवींच्या नावाने मागे ‘आई’ हे प्रत्यय जोडण्यात येते. या देवी बहुतांश वेळा त्या ज्या देवराईमध्ये असतात त्या ठिकाणी सर्वाधिक आढळणाऱ्या वृक्षांच्या नावांवरून ओळखल्या जातात. उदाहरणार्थ करंज वृक्षाच्या राईतील करंजाई, हिरडय़ाच्या राईतील हिरडाई, वडाच्या राईतील वडजाई अशा असंख्य देवी आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत अढळतात. इतिहास संशोधक डॉ. कोसंबींच्या मते दोन प्राचीन व्यापारी मार्ग जिथे छेदतात त्या परिसरात मातृदेवतांचे रान म्हणजेच देवराई असते. बौद्ध साहित्यातही मातृदेवतांच्या उपवनांचे अनेक उल्लेख मिळतात.

देवराईतील मातृदेवता असणाऱ्या देवींचे मूळ रूप हे त्यांच्या अनघड शिळेला शेंदूर फासलेल्या रूपात दाखवले जाते, परंतु काही देवराईंमध्ये अलीकडे बसवलेल्या सुबक अशा मूर्ती पाहायला मिळतात. या देवींचे रूप हे काहीसे उग्र आणि गूढ असते. त्यांना कोणी पुरुष सहचर नसतो. काही देवी या कुमारीका रूपात असतात. त्यांच्या संरक्षणाखाली असलेल्या राईमधे काही अलिखित नियम आणि संकेत पाळले जातात. त्यानुसार झाडाची फांदी, फळे तोडण्यास मनाई असते, कुठल्याही प्राण्याची शिकार केलेली चालत नाही. देवराईत असणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये देवीचे वास्तव्य असते असे मानले जाते. त्यामुळे बहुतांश देवराया या राईतील देवाच्या धाकामुळे मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित राहिल्या आहेत असे दिसते.

वाघजाई नावाच्या देवीच्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अनेक देवराई आहेत. ही वाघजाई देवी पशुपालकांच्या गुरांचे रक्षण करणारी देवी समजली जाते. तर जाखमातेच्या राईतील जखुबाई ही मूल न होणाऱया स्त्रियांना आधार आणि आशीर्वाद देणारी देवी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर काळकाई किंवा काळुबाई नावाची देवराईतील देवी ही तिच्या उपासकांचे दुष्ट शक्तीपासून रक्षण करते.

पानशेतच्या परिसरातील मोसे खोऱ्यातील शिरकाई देवीच्या देवराईत उत्सवावेळी नरबळी दिला जाई अशी कथा स्थानिक ग्रामस्थ सांगतात. काही देवरायांमध्ये देवीच्या यात्रेत बगाड नावाचा विधी केला जातो. या विधीत एका उंच लाकडी खांबावर आडवा मोठा बांबू असतो त्याला हुकाने टोचून आणि दोराचा आधार दिलेला माणूस गोल फिरवला जातो. शिरकाई देवीच्या देवराई होणाऱ्या या उत्सवावेळी डोंगराळ भागातले सगळे महादेव कोळी हे आदिवासी एकत्र येतात. त्यांची ती कुलदेवी समजली जाते.

प्रत्येक देवराईशी काही लोककथा जोडलेल्या असतात. त्या कथांचे साक्षीदार असणारे गावकरी असतात. या कथांमधे गूढत्व असते तशाच प्रकारे काही घटना कथा रूपात नोंदवून स्थानिक इतिहास जपलेला असतो.

मावळातील डोंगरवाडीच्या सोमजाईला मूल नसलेल्या स्त्रिया पाळणा अर्पण करतात. अशाच प्रकारच्या परंपरांमधून देवराईतील देवीच्या सुफलीकरणाच्या शक्तीचा लोक व्यवहारातील मागमूस सापडतो. अशाच प्रकारे वाघजाई देवीला पशुपालक आपल्या हरवलेल्या अथवा आजारी गुरांवर देवीने उपाय करावा म्हणून लाकडी किंवा दगडी गाईगुरांची लहान प्रतिकृती अर्पण करून याचना करतात. वाघजाईच्या देवराईत तिचे वाहन असणाऱ्या वाघाची मूर्ती असते.

देवराईत असणाऱया नैसर्गिक स्रोतांचे रक्षण होईल अशा प्रकारच्या लोककथा जनमानसामध्ये देवीशी संबंधित असतात. राईंमधे असणाऱ्या देवींभोवती गुढ वातावरण असते. या देवींची देवराईतील स्थान हे काही वेळा उघडय़ावर असते तर काही वेळा लहानशा घुमटीवजा मंदिरात. तरीही पंचक्रोशीत या देवींच्या मोठा प्रभाव असतो. नवरात्रात देवीच्या समोर घट बसवला जातो. नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतात. इतर वेळी स्थानिक उत्सवात या देवींचा मानपान केला जातो. नव्या कामाच्या सुरुवातीला त्यांचा कौल, प्रसाद मागून आशीर्वाद घेतला जातो.  देवराईतील देवीभोवती आदिम श्रद्धा, रानटी प्रथा, प्राचीन परंपरा शिल्लक असलेल्या दिसतात. परंतु या देवींच्याच धाकामुळे देवराईमध्ये शिकार, वृक्षतोड, पाण्याचा गैरवापर या गोष्टी होत नाहीत आणि जंगलाचा अधिवास सुरक्षित राहायला मदत होते.

 pranavpatilgmail.com