
धनाजीराव जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन 1697 ते 1708 या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठय़ांच्या स्वातंत्र्यलढय़ाची धुरा वाहिली. ते सिंदखेडच्या जाधवराव कुळातील सदस्य, त्यामुळे राजमाता जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे संगोपन झाले. तुळापूर छावणीवरील धाडसी हल्ल्याच्या प्रसंगात सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात धडकी भरवली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराम केला. श्रीवर्धनहून सातार्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यानी शाहूमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भट यांना प्रथमत पेशवाईची सूत्रे मिळाली. प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची शान राखत मोगलांना धूळ चारणार्या धनाजी जाधव यांच्या पायाला दुखापत होऊन वडगाव येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे समाधी स्मारक कोल्हापूर जिह्यामधील पेठ वडगाव (तालुका हातकणगले) येथे आहे.




























































