
>>>स्वरा सावंत
ठाण्यातील ‘वुई टुगेदर’ या छोटय़ाशा संस्थेद्वारे 450 अन्नपूर्णा अन्नदानाचे काम करत आहेत. धान्य बँकेसारखा अभिनव उपक्रम राबवणाऱया संस्थेच्या कामाचा परिचय करून देणारा लेख.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या भावनेतून माणुसकी जपताना आपणही समाजाचे काही देणं लागतो अशी धारणा समोर ठेवून 13 गृहिणी एकत्र आल्या. अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या माणसांच्या पोटाची खळगी कशी भरता येईल या विचारातून मग धान्य बँकेचे बीज रोवले गेले. बघता बघता त्याचा वटवृक्ष झाला. आजच्या घडीला सुमारे 450 अन्नपूर्णा अन्नदानाचे काम करीत आहेत.
गृहिणी उज्ज्वला बागवाडे यांनी बीडमध्ये नागरगोजे दांपत्यानं ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शांतिवन संस्थेला भेट दिली. तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात उज्ज्वलाताईंना जाणवलं की, संस्थेला अन्नधान्याची मोठीच चणचण आहे. ठाण्यातल्या मैत्रिणींशी यासंदर्भात गप्पा मारता मारता धान्य बँकेची कल्पना सुचली आणि 2 डिसेंबर 2015 ला 13 मैत्रिणींनी मिळून ‘वुई टुगेदर’ या ग्रुपची स्थापना केली. ठाणे आणि कर्जतमधल्या या सख्यांनी प्रत्येकी चार सदस्य जोडत जोडत साखळी पद्धतीनं बँक विस्तारली. आज या बँकेचे सदस्य 450 आहेत.
शांतिवनासोबत श्रद्धा फाऊंडेशन आणि सेवाश्रम या संस्थांनाही धान्य बँक मदत करते. आतापर्यंत धान्य बँकेने 16 हजार किलोपेक्षा जास्त धान्य संस्थांना पोहोचवलं आहे. किमान 5 महिन्यांच्या अन्नधान्याची गरज यातून पूर्ण होत आहे. अन्नधान्याच्या गरजेची कायम काळजी घेतली जाईल हा विश्वास हा ग्रुप संस्थांना देतो.
धान्य बँकेचे सदस्य प्रत्येकी एक किलो धान्य आणि जमल्यास स्वयंपाकाकरिता लागणारे इतर जिन्नस देतात. ज्यांना धान्य देता येणं जमत नाही, त्यांच्याकरिता रोख रकमेचा पर्याय ठेवला आहे. जमा झालेल्या रकमेचंही धान्यच विकत घेऊन दिलं जातं. किमान 50 रुपये किंवा 1 किलो धान्य अशी आखणी आहे. त्यामुळे सर्व थरांतील लोकांना यात सहभागी होता येतं. उज्ज्वलाताईंच्या सोसायटीत घरकाम करणाऱया 2 मैत्रिणीही या साखळीत आहेत. सभासदांना संस्थांकडून देणगीची पावती दिली जाते. दर तिमाहीतून एकदा या बँकेत धान्य आणि रोख रक्कम जमा करायची असते. साधारण आठवडाभराचा अवधी दिला जातो. मुख्य सभासद आपल्या साखळीतील लोकांना डिपॉझिट करण्याचा कालावधी कळवते.
जमा झालेलं सर्व धान्य कर्जतच्या श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. जमा झालेल्या रकमेतून घाऊक बाजारातून संस्थांच्या गरजेनुसार धान्य, साबण आणि इतर जिन्नस खरेदी केले जातात. जमा रकमेतील 40 टक्के रकमेचं सामान श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. श्रद्धा फाऊंडेशनची गाडी येऊन त्यांचं सामान घेऊन जाते. शांतिवनाकरिता नगरच्या एका होलसेल व्यापाऱयाकडून सामानाची खरेदी करण्यात येते. शांतिवनाच्या वाटय़ाची 60 टक्के रक्कम किती आहे हे त्यांना कळवण्यात येतं. त्या रकमेचं सामान संस्था आणते आणि मग धान्य बँक सामानाचे पैसे भरते.
दर महिन्याच्या तिसऱया शुक्रवारी ‘वुई टुगेदर’च्या तेराजणी जमतात आणि बँक आणखी सक्षम कशी होईल यावर चर्चा करतात. उज्ज्वलाताई सांगतात, आपण फक्त गृहिणी आहोत. आपल्याला काही करता येणार नाही असा विचार कोणीही करू नये. गृहिणींच्याच पुढाकारामुळे या साखळीशी माणसं जोडली जात आहेत आणि कित्येकांच्या भुकेची सोय होत आहे. गेल्या दोन वर्षांत कितीतरी गृहिणींना आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास या साखळीमुळे आला आहे.
तुम्हालाही सहभागी व्हायचंय!
अन्नदानाच्या या चळवळीत तुम्हालाही सहभागी व्हायचंय तर लगेच आपला खारीचा वाटा उचला आणि उज्ज्वला बागवाडे (9769125148) यांच्याशी संपर्क साधा.

























































