वेब न्यूज – अजब कायदे

>> स्पायडरमॅन

सर्व देशांत आपापले कायदे आहेत. मात्र काही देशांतील कायदे इतके अजब आहेत की, ते आश्चर्यचकित करून टाकतात. बांगलादेशमधला एक अजब किस्सा समोर आला आहे. इथे नऊ बकऱयांना एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेतून नुकतेच मुक्त करण्यात आले. बांगलादेशमधील बारिशाल शहरात कब्रस्तानातील गवत आणि झाडांची पाने खाण्याचा गुन्हा या बकऱयांनी केला होता. त्यासाठी त्यांना दोषी मानून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. 24 नोव्हेंबरला शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. बांगलादेशमध्येच फक्त असे विचित्र कायदे आहेत असे नाही. अनेक देशांत विचित्र कायदे बघायला मिळतात. स्वित्झर्लंडसारख्या देशात रात्री 10 नंतर फ्लश करणे हे चुकीचे मानले जाते. अशा व्यक्तीकडे सामाजिक भान नसल्याचे समजले जाते. जर रात्री दहानंतर तुम्ही या देशात फ्लश केलात आणि त्याचा शेजाऱयांना त्रास झाला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कुत्री पाळणे हा अनेकांचा छंद असतो. त्याला अगदी घरातील एक व्यक्ती असल्याचा दर्जा दिला जातो. मात्र इटलीत यासंबंधी एक खास नियम आहे. इटलीच्या तुरीन शहरात तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला दिवसातून तीन वेळा बाहेर फिरायला घेऊन जाणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. समुद्रकिनारी बिकिनी घालून फिरणाऱया ललना सर्वच देशांत दिसतात. मात्र बार्सिलोनामध्ये तुम्ही समुद्रकिनारी बिकिनी घालू शकता. मात्र शहराच्या इतर कुठल्याही भागात तुम्ही बिकिनी घातलेल्या अवस्थेत आढळून आल्यास प्रचंड मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो. उत्तर कोरियाविषयी तर काय बोलावे…इथे किम जोंगबरोबर मीटिंग चालू असताना चुकून कोणाला जांभई जरी आली तरी मृत्युदंडापर्यंत विविध शिक्षांची तरतूद आहे.