
>> बीके नीताबेन
लहान असताना सर्वात आवडता सण कोणता, असे कोणी विचारले की लगेच उत्तर द्यायचो ‘दिवाळी’. सर्वात मोठी सुट्टी या सणानिमित्त मिळायची. वेगवेगळे खाद्यपदार्थ, फटाके, नवीन कपडे… किती मजा. पण नेहमी हा प्रश्न मनामध्ये यायचा की फक्त याच सणाआधी घरामध्ये इतकी साफसफाई का? घरातल्या कानाकोपऱ्यातून सफाई, कपाटाचा प्रत्येक खण, घरातले एक–एक भांडी साफ केली जायची. पण आज या सर्वांचा अर्थ समजला आहे.
हिंदुस्थान एक संस्कृतीप्रधान देश आहे, जिथे सण–उत्सव साजरे केले जातात. आपल्या वेगवान जीवनामध्ये रोजच्या ताणतणावापासून थोडेसे अलिप्त होऊन सर्वांबरोबर आनंद साजरा करावा, पण त्याचबरोबर प्रत्येक सणाबरोबर काही पौराणिक कथा जोडल्या जातात त्यांच्या पाठीमागे काही अर्थ आहे.
दिवाळी हा सण पाच उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, नवीन वर्ष, भाऊबीज हे पाच उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारांना घेऊन साजरे केले जातात. जर हा सण आध्यात्मिक रहस्यांना समजून साजरा केला तर जीवनामध्ये एक वेगळे परिवर्तन आणू शकतो.
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी अर्थात लक्ष्मीपूजन. वैदिक ऋषींनी लक्ष्मीला संबोधित करताना श्रीसुक्त गायले आहे.
“ओम महालक्ष्मै च विद्महे विष्णू पत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्’’
याचा अर्थ असा आहे की, महालक्ष्मी, जी विष्णू पत्नी आहे, जिचे ध्यान केल्याने माझ्या मन, बुद्धीला प्रेरणा मिळू दे. लक्ष्मी जी धनाची देवी मानली जाते, पण इथे लक्ष्मीचा उपयोग करणारी माणसाची मनोवृत्ती शुद्ध असली तरच त्याचा सद्उपयोग होऊ शकतो. विकृत मार्गावर वापरली जाणारी लक्ष्मी अलक्ष्मी मानली जाते. स्वार्थाच्या मार्गावर वापरली तर त्याला वित्त म्हटले जाते. परार्थासाठी वापरली जाणारी लक्ष्मी धनलक्ष्मी समजली जाते आणि प्रभूकार्यासाठी वापरली जाणारी लक्ष्मी महालक्ष्मी समजली जाते. महालक्ष्मी नेहमी हत्तीवर बसून येते असे सांगितले जाते. हत्ती हे उदारतेचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यामध्ये, प्रभूकार्यामध्ये उदारतेने लक्ष्मीचा वापर केला तर पिढय़ान्पिढय़ा लक्ष्मी त्यांच्याकडे वास करते अशी मान्यता आहे. ईश्वरीय ज्ञानाअनुसार ज्ञानधन आपल्या सर्वांकडे आहे. Knowledge is source of income म्हटले जाते. स्थूल आणि सूक्ष्म धन जर आपण ईश्वरीय कार्यामध्ये लावले, त्याचा सद्उपयोग केला तर नक्कीच 21 जन्मांचे, 21 पिढय़ांचे सुख आपल्याला मिळू शकते.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशीला काल चतुर्दशी म्हणूनही ओळखले जाते. प्रागज्योतिषपूरचा राजा नरकासुर आपल्या शक्तींचा उपयोग दुसऱ्यांना कष्ट देण्यासाठी करायचा. त्याने 16 हजार कन्यांना बंदी केले होते. अमावस्येच्या रात्री त्याचा नाश झाला. त्याच्या अत्याचारातून मुक्त झालेल्या लोकांनी दिवे लावून, नवीन कपडे घालून उत्सव साजरा केला, आनंद व्यक्त केला.
कलियुगाच्या या अंतामध्ये मनुष्य विकारांनी आणि वासनांनी भरलेला आहे. जोपर्यंत शिवपरमात्म्याद्वारे स्वतःची ओळख मिळत नाही तोपर्यंत अज्ञानाचा अंधकार दूर होणार कसा? जीवनात खऱ्या सुख–शांतीचा मार्ग जेव्हा मिळतो, ज्ञानाचा प्रकाश जेव्हा मिळतो तेव्हा आपण आपल्यातल्याच असुराला नष्ट करू शकतो. या आसुरी वृत्तींचा नाश करणे म्हणजेच खरी नरक चतुर्दशी साजरी करणे होय. या दिवशी विशेष चिरोटे नावाचे फळ पायाखाली ठेवून फोडले जाते, उटणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. अर्थातच अवगुणांना समूळ नष्ट करून सद्गुणांनी स्वतःला सुगंधित करण्याचा हा दिवस.
दिवाळी
या दिवशी व्यापारी आपला जुना हिशेब संपवून नवीन हिशेब सुरू करतात. हिशेबाच्या वहीची पूजा केली जाते. आपणही गतवर्षामध्ये केलेल्या चुका, राग, द्वेष, ईर्षा, मत्सर यांना नष्ट करून प्रेम, सद्भावनेने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी स्वतःला प्रेरित करावे.
नवीन वर्ष
याला बलिप्रतिपदा म्हटले जाते. राजा बली ज्याचा पराभव श्रीकृष्णाने वामन अवतार घेऊन केला. राजा बली ज्याच्यामध्ये लोभ आणि मोह हा विकार दाखवला जातो, परंतु त्याचबरोबर तो दानवीरसुद्धा दाखवला आहे. कनक आणि कांता यांना बघण्याचा पवित्र दृष्टिकोन सर्वांना दिला. कनक अर्थात लक्ष्मी आणि कांता अर्थात स्त्री जाती. दोन दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
भाऊबीज
भाऊबीज म्हणजे एक पवित्र नाते. परमात्म ज्ञान आपल्याला आत्मिक दृष्टी देते. प्रत्येक आत्म्याशी आपला संबंध भाऊ–भाऊचा आहे. जेव्हा ही दृष्टी कायम होते तेव्हाच खरी दीपावली आपण साजरी करतो. या दृष्टीनेच आत्म्याची ज्योती जगते.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव. आत्मज्योती जागृत करण्याचा हा सण. ज्ञानाचे घृत जेव्हा या दीपकामध्ये पडेल तेव्हाच आत्मज्योती प्रज्वलित होऊ शकते. आत्मज्योती जागृत झाली तर जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होईल.
चला तर, आजपासून ज्ञानाचा दीपक आपल्या मनामध्ये लावून सर्वांचे जीवन उज्ज्वल करूया. एका दीपकाने अनेकांच्या जीवनातला अंधकार समाप्त करूया, हाच खरा दीपोत्सव.































































