लेख : देणाऱ्याचे हात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

कविवर्य विंदा करंदीकरांची एक अप्रतिम कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि या प्रक्रियेत शेवटी ‘घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे ‘हात’ घ्यावे!’ जी उदारता आपण इतरांकडून अनुभवली, ज्या औदार्याचा आपल्या जीवनात महत्त्वाचा आधार ठरला तसं औदार्य आपणही केव्हातरी दाखवायलाच हवं. उदारता अनेक प्रकारची असते. पैसा देता येतो, ज्ञान देता येतं. कुणाला व्यक्तीला मानसिक आधार देता येतो. कुणाची सेवाशुश्रूषा करता येते. आपल्या कुवतीनुसार आपण काय ‘देऊ’ शकतो याचा विचार मात्र मनात रुजायला हवा.

वर्षभरापूर्वीची गोष्ट. नवतरुणाईबरोबर ट्रिपला गेलो होतो. नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा वेगळा मार्ग होता. निसर्गाचं सान्निध्य, थंड हवेत भ्रमंती, चांदण्या रात्री तंबूतला निवास आणि खेडय़ातलं जेवण. ती कष्टकरी माणसं अगदी प्रेमाने जेवू घालत होती. तिथल्या मुलांना आमच्या बरोबरच्या शहरी मुलांबाबतचं कुतूहल होतं. तसंच कुतूहल शहरी मुलांनाही त्यांच्याबद्दल होतंच. बघता बघता मैत्री झाली. आमच्यापैकी एकजण गिटार वाजवणारा होता. गावातल्या तरुणाने ढोलकं आणलं. त्यांच्या पारंपरिक गाण्यांची आणि यांच्या आधुनिक गाण्यांची मैफल रंगली. दोन दिवसांत सारी मंडळी परस्परात इतकी मिसळली ती शतकांची ओळख असल्यासारखी. त्या दुर्गम गावातल्या रानभाज्या आणि करवंद, बोरं, चिंचा असा रानमेवा सर्वांना आवडला. मग या मुलांनी त्यांच्याकडचे बिस्किटांचे पुडे त्यांना दिले. चॉकलेटं दिली. त्या गावातल्या लोकांशी परिचय असलेला आमच्यात एकजण होता. संयोजकांनी कल्पना दिल्यामुळे आम्ही काही शैक्षणिक मदत द्यायचं ठरवलंच होतं. शेवटच्या दिवशी आमच्यातला एक नवतरुण म्हणाला, ‘‘आम्हालाही या मित्रांना काहीतरी द्यायचंय.’’ या ‘ऍप’वाल्या तरुणांना ही जाणीव असावी याचं कौतुक वाटलं. कोणी आपलं जॅकेट दिलं तर सर्वांनी मिळून तिथल्या मुलांना पुस्तकं घेता यावीत म्हणून मदत केली. त्या सात दिवसांत ‘या’ मुलांनी ‘त्या’ मुलांचा हसत खेळत अभ्यासही घेतला. त्यांनी यांना झाडावर चढायला शिकवलं! निघताना त्यांनी आम्हाला भरभरून रानमेवा दिला. हे ‘देणं-घेणं’ व्यापारी नव्हतं. तो मनोव्यापाराचा भाग होता. त्या नकळत उदारमनस्क वागण्याने सर्वांचेच ते सात दिवस ‘श्रीमंत’ झाले. ‘उदारस्य तृणं वित्तं’ असं म्हटलं जातं. जो उदार असतो त्याला संपत्ती तृणवत वाटते असा याचा अर्थ. आपल्याकडे आहे ते सांभाळून ठेवणं तर कुणीही करील, पण त्यात इतरांना सहभागी करून घेण्याची वृत्ती अधिक सधन करते. हे धन समाधानाचं असतं. त्यात देणारा आणि घेणारा यांच्यात कमी-अधिकपणाचा भाव नसतो.

वॉरन बफेट नावाच्या अमेरिकेतील धनवंत उद्योजकाने आपली अब्जावधी डॉलरची संपत्ती ‘दान’ केली. कारण धनसंचय करता करता त्यात ‘अर्थ’ नाही हे त्याच्या लक्षात आलं. असे ‘दानवंत’ अनेक असतात. आपल्याकडच्या मर्यादित पैशांचीही मदत एखाद्या गरजू व्यक्तीला करून ‘‘बघू, होईल माझी सोय काहीतरी, पण तुला आत्ता गरज आहे ना, ती महत्त्वाची’’ असं म्हणणारी अनेक माणसं पाहिली. तेव्हा त्यांच्याकडून खूप शिकता आलं. सर्व दानांमध्ये विद्या म्हणजे शिक्षणाचं दान महत्त्वाचं असं म्हटलं जातं. ‘विद्यादान सर्व दानःप्रधानम्’ आपल्याला जे ज्ञान आहे ते इतराला का द्यावं याचंही उत्तर एका सुभाषितात आहे. ज्ञानाचं वर्णन ‘व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात’ असं केलंय. याचा अर्थ पैसा नावाचं धनसंचय करून वाढत असेल पण ज्ञानधन खर्च केल्यानेच वाढतं! साहजिकच आहे. त्यातून होणाऱ्या वैचारिक आदान-प्रदानातून आपल्यालाही काहीतरी मिळतच असतं.

हे सगळं मनात आलं ते परस्परांशी ‘प्रेमाने’ वागणाऱ्या प्राण्यांची छोटीशी फिल्म पाहताना. त्यात कुत्रा आणि मांजर यांची मैत्री होती. हत्तीसारखा महाकाय प्राणी एक माणसाशी मैत्री करून होता. ही आपुलकीची भावना माणसासारखी प्राण्यांमध्येही असते. प्राणी-पक्षीही प्रसंगी ‘उदार’ होतात. इतरांची ‘केअर’ करण्याची भावना त्यांच्यातही जागते. प्रसंगी आपण उपाशी राहून पिलांसाठी चारा आणणारी चिमणीही हे शिकलेली असतेच. एकूणच जीवसृष्टीत जेवढ्या भयंकर गोष्टी आहेत तितक्याच चांगल्याही आहेत. या सगळ्याकडे कसं बघायचं ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून. …आणि माणूस या सृष्टीतला सर्वोच्च सजीव. त्यामुळे उदात्त औदार्याची भावना त्याच्याकडे अधिक असणं अपेक्षित आहे. माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांमध्येही ऑक्सिटॉसिनसारख्या हॉर्मोनमुळे औदार्याचा गुण येतो असं विज्ञान म्हणतं. तो गुण वाढवणं हे आपल्या हाती. समाजातल्या सर्व क्षेत्रांतल्या अनेक माणसांचा उदारपणा अनुभवता आल्याने विदांच्या कवितेतली ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ ही कल्पता प्रत्यक्षात उतरलेली पाहिली आहे.

घरचीच गोष्ट सांगायची तर आमचे एक नातेवाईक बरीच वर्षे घरकाम करून निवृत्त झालेल्या वृद्ध मावशींना दरमहा ठराविक रक्कम देत असत. मुलांनाही लहानपणापासून थोडासा ‘पॉकेटमनी’ देत. एका विशिष्ट रकमेवर नंतर तो स्थिरावला. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांनी आठवणीने मृत्युशय्येवर असतानाही ‘एक तारखेला सर्वांना बोलावलं आणि पैसे दिले. नातीने त्यांना विचारलं, ‘‘आजोबा, तुम्हाला काय देऊ?’’ तेव्हा ते पटकन म्हणाले, ‘‘घेणे नाही. फक्त देणे!’’ हे त्यांचे शेवटचे उद्गार कुटुंबीयांना सतत प्रेरणा देणारे ठरतील. खरंच, आयुष्यात एक काळ असा येतो की, जगणं ‘लिव्ह टू गिव्ह’ असं व्हावं. आधी म्हटल्याप्रमाणे ते पैशांतच हवं असं बिलकूल नाही. ‘‘ज्यांच्याकडे काही नाही तो इतरांना प्रेम, जिव्हाळा’’, देऊ शकतो असं विनोबा म्हणत. त्याची जाणीव मात्र व्हायला हवी. आसपासच्याच मंडळींमध्ये अशी कितीतरी ‘उदार’ मंडळी असतात आणि त्यांनी देणाऱ्याचे हात कधीच घेतलेले असतात!

[email protected]