लेख : ठसा : डॉ. सुचिता बिडकर

1416

>> विकास काटदरे

डॉ. सुचिता बिडकर ऊर्फ मालूताई या ज्येष्ठ गायक व व्हायोलिनवादक पं. गजानन बुवा जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या. गानपरंपरा असलेल्या जोशी घराण्याच्या चौथ्या पिढीचे त्या प्रतिनिधित्व करत होत्या. जन्मतःच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. बालपणापासून त्यांना गुरुकुल पठडीची घरंदाज गायकीची तालीम त्यांना मिळाली. ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर शैलीचे अनेक अप्रचलित, अनवट राग शिकण्याचे भाग्य त्यांना मिळाले. घरी अनेक विद्वान कलाकारांची ऊठबस होत असल्याने संगीतातील चर्चा, विवेचन त्यांच्या कानावर सहज पडत होते. यामुळे रागदारी संगीताकडे जाणीवपूर्वक बघण्याची डोळस नजर त्यांना मिळाली. शास्त्राकडे वळण्याची संधी त्यांना संगीतातील अनेक परीक्षकांनी दिली असे त्या मानत. संगीताचार्य आदी परीक्षा देताना संगीतशास्त्राकडे त्या नकळत आकर्षित झाल्या.

संगीत ग्रंथांचे वाचन करण्याबरोबरच त्यातील नांदी काढण्याची सवय त्यांना लागली. यातून स्फूटलेखनाची सुरुवात त्यांनी केली. पुण्याच्या ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ येथे त्या संगीत विषयाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या, तर डोंबिवलीच्या स. वा. जोशी शाळेत त्या शिक्षिका होत्या. वाचन, लेखनामुळे चर्चासत्रामध्ये त्या सक्रिय झाल्या. व्हायोलिन वाद्यावर त्यांनी शोधप्रबंध लिहिला. त्यांचे माहेरचे नाव मालती जोशी होते. पं. गजानन जोशी यांचा चरित्रग्रंथ ‘पुत्र व्हावा ऐसा’, मधुमालती, सूरसुरभिचा राजा, पं. भीमसेन जोशी : व्हायोलिन तंत्र आणि मंत्र आणि संगीताविषयी विपुल लेखन केले. मालूताई या नावाने त्या शिष्य परिवारात परिचित होत्या. घराणेदार गायकीची समृद्ध परंपरा समर्थपणे पुढे नेत असताना त्यांनी अनेक रागांमध्ये उत्तमोत्तम रचना करून बंदिशीचे अमूल्य भांडारच संगीत रसिक व विद्यार्थ्यांना खुले करून दिले. आकर्षक मुखडे, सहजपणे व्यक्त होणारा रागभाव व तालाचा डौल ही त्यांच्या बंदिशीची वैशिष्टय़े सांगता येईल. गायनाच्या सादरीकरणाबरोबरच संगीतशास्त्राच्या क्षेत्रातही मालूताईंचे योगदान मोठे आहे. इंग्रजी व हिंदी साहित्याचादेखील त्यांचा चांगला अभ्यास होता. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे विपुल लेखन, उत्तमोत्तम बंदिशी याच्या रूपात त्यांचा वरदहस्त संगीताच्या विद्यार्थ्यांवर कायम राहील.

आपली प्रतिक्रिया द्या