
सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोविशिल्ड लसीच्या निर्मितीत मोलाचे योगदान असलेले डॉ. सुरेश जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या नावावर जगभरातील अनेक पेटंट नोंदविले गेले आहेत. डॉ. सुरेश जाधव हे मूळचे बुलडाण्याचे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये पीएच.डी. मिळविली. सुरुवातीच्या काळात त्यांनी नागपूर विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी हाफकिनमध्ये संशोधक म्हणून लस उत्पादनासंबंधी कार्याला सुरुवात केली. डॉ. सुरेश जाधव 1979 मध्ये सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत असला तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ‘सिरम कुटुंब आणि भारतीय लस निर्मिती उद्योगाने डॉ. सुरेश जाधव यांच्या रूपाने दीपस्तंभ गमावला आहे,’ अशा शब्दांत ‘सिरम’चे अदर पूनावाला यांनी आदरांजली वाहिली होती. डॉ. जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये पीएच. डी. घेऊन 1970 पासून पन्नास वर्षांची अखंड सेवा दिली. ते सुरुवातीला नागपूर विद्यापीठ व ‘एसएनडीटी’ विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर हाफकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी आपले काम चालू केले. सिरम इन्स्टिटय़ूटचे 1992 पासून कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू लागले. जागतिक आरोग्य परिषद असो की राष्ट्रीय लसीकरण धोरण, इंडियन फार्माकोपिया किंवा लस उत्पादन इत्यादीसंबंधी कोणतीही समिती असो तेथे जाधव सरांचे योगदान ठरलेले होते. पुढची किमान दोन ते तीन वर्षे कोरोनासोबत राहावे लागेल, असे डॉ. सुरेश जाधव एका कार्यक्रमात बोलले होते. लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ असं डॉ. सुरेश जाधव यांना म्हटलं जातं. सध्या ज्या लसींना मान्यता मिळाली आहे, त्या लसी कोरोनाच्या नव्या विषाणूशी लढण्यास सक्षम असल्याचं ते म्हणाले होते. देशातील किमान 70 टक्के लोकांचं लसीकरण झाल्याशिवाय मास्क वापरणं बंद करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे हिंदुस्थानी वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.































































