डॉ. विठ्ठल प्रभू

371

>> शिल्पा सुर्वे

ज्या काळात कामशास्त्र विषयावर बोलण्यास आपल्याकडे संकोच व्यक्त केला जायचा, या विषयाची जाहीर वाच्यता करणे म्हणजे अपराध समजला जायचा अशा काळात म्हणजे 1960 च्या दशकात कामशास्त्र हा विषय घेऊन करीअर करण्याचे धाडस डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले. डॉ. प्रभू यांनी कामशास्त्राचा नुसता अभ्यास केला नाही, तर त्या शास्त्राला कामविज्ञानशास्त्र अशी ओळख मिळवून दिली. अश्लील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामजीवन या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. स्त्री-पुरुषांचे लैंगिकतेविषयीचे समज-गैरसमज दूर केले. अनेक जोडप्यांचे वैवाहिक जीवन सुखी केले. अनेकांना निरामय कामजीवनाचा मंत्र दिला.

डॉ. प्रभू यांनी जीएस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम सुरू केले. याच काळात एका बातमीने त्यांच्या करीअरला दिशा दिली. एका नवविवाहित मुलीच्या आत्महत्येची बातमी होती. मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिठ्ठी सापडली होती. त्यात तिने लिहिले होते, ‘माझ्या नवऱयाने माझ्यावर बलात्कार केला आहे. हे शरीर आता अपवित्र झाले आहे. त्यामुळे जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे.’ मुलीच्या आत्महत्येचे कारण डॉ. प्रभू यांना अचंबित करून गेले. लग्नानंतरच्या नवरा-बायकोच्या खासगी आयुष्याची माहिती मुलीला तिच्या आईने किंवा घरातील वडीलधाऱया स्त्रीने करून देणे आवश्यक असते. ती मुलगी परिस्थितीची बळी ठरली होती. स्त्री-पुरुषाचं खासगी आयुष्य कामविज्ञानशास्त्राशी संबंधित आहे. त्याच्याशी मुलीच्या आत्महत्येचा संबंध डॉ. प्रभूंच्या लक्षात येऊ लागला आणि त्यांनी या विषयाचा अभ्यास वाढवला. सेक्सोलॉजी हा विषयावर काम सुरू केले.

एमबीबीएसच्या अभ्यासात एक शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचं मीलन झाल्यावर गर्भधारणा होते असे शिकवले जाते. मात्र गर्भधारणा होतेवेळी समागम करताना स्त्री-पुरुषाची मानसिकता कशी असते किंवा कशी असायला हवी आणि ती का असायला हवी यावर फारसं शिकवलं जात नाही. कामविज्ञानशास्त्राचा अभ्यास करताना डॉ. प्रभू यांनी केस स्टडीज अभ्यासल्या. त्यातून कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटिंग या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून परिसंवाद आयोजित केला, कार्यशाळा भरवल्या. मात्र असा एक वर्ग आहे, जो अद्याप उघडपणे बोलू शकत नाही. हे लक्षात घेऊन डॉ. प्रभूंनी त्यांच्यासाठी पुस्तके लिहिली. कामविज्ञानशास्त्राबाबत समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे हे उद्दिष्ट त्यामागे होते. डॉ. प्रभूंनी एकूण 35 पुस्तके लिहिली. त्यांचे ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक तुफान गाजले. पुस्तकाच्या 34 आवृत्या निघाल्या. नवविवाहित जोडप्यांना लग्नाची भेट म्हणून हे पुस्तक देण्याची प्रथा पडली, एवढं यश या पुस्तकाला मिळाले. या क्षेत्रातील

डॉ. प्रभू यांचा आदर्श म्हणजे प्रा. र. धों. कर्वे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव असलेल्या रधेंनी कामविज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जीवाचं रान केले. हिंदुस्थानातील पहिल्या संततीनियमन केंद्राची सुरुवात केली. ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केले. डॉ. प्रभूंनी ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक रधोंना समर्पित केलं. याशिवाय ‘यौवन ते विवाह’, ‘गोष्ट एका डॉक्टरची’ हे आत्मचरित्रपर पुस्तक आणि ‘स्नेहबंध’ हे व्यक्तिचित्रण पुस्तक लिहिलं.

गेल्या काही वर्षांत समाजपरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिले जात आहे. लैंगिक आजारांविषयी जागृती केली जात आहे. या जागृतीचा पाया डॉ. प्रभू यांनी फार आधीच घातला होता. काम (सेक्स) याचा संबंध हा फक्त वैद्यकीय शाखेशी नाही तर मानसशास्त्री, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांच्याशी आहे. हे जाणून आयुष्याच्या अखेरपर्यंत लैंगिकतेबाबत समाजशिक्षण केले. म्हणून त्यांचे कार्य अनोखे ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या