सुखस्वप्नांसाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

स्वप्नातील दुनिया अद्भुत असते किंवा भेसूरही! कुणाला कसली स्वप्नं पडतात यावर ते अवलंबून आहे. काही जणांना स्वप्नं पडतच नाहीत तर काहींना अगदी तासा- दोन तासांच्या झोपेतही अनेक स्वप्नं पडतात. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असं म्हटलं जातं ते खरंच. आधुनिक विज्ञानात या ‘मना’ची जागा मेंदूच्या कार्यातच समाविष्ट असते आणि मेंदूचे कार्य माणसाच्या मूलभूत जडणघडणीचा आराखडा असलेल्या गुणसूत्रांवर चालते. त्यावरच त्या त्या व्यक्तीचा स्वभाव आणि स्वप्नंही अवलंबून असतात. उत्साही लोकांना सतत उत्कर्षाची स्वप्नं पडतात तर निरुत्साही स्थितीतील स्वप्नंसुद्धा दचकवणारी असतात. अर्थात याचं निश्चित गणित नाही. प्रत्यक्ष जीवनात जे साध्य होत नाही पण व्हावंसं वाटतं असंही काही स्वप्नात दिसू शकतं. मेंदूच्या सततच्या विचारप्रक्रियेचा हा भाग आहे.

म्हणूनच जागेपणी चांगले विचार करा असं म्हटलं जातं. ‘डेअर टू ड्रीम’ या संदेशात जागेपणी पाहण्याच्या उत्कर्षकारी स्वप्नांचा विचार आहे. सातत्याने रचनात्मक विचार करण्याची सवय लागली तर स्वप्नंही तशीच पडतील. काही वेळा तर मेंदू झोपेतही विचार करत असताना स्वप्नांच्या माध्यमातून एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं कोणी सांगतं त्यात आश्चर्याची किंवा चमत्काराची गोष्ट नाही. झोपल्यानंतर ज्यांची ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ सातत्याने सुरू राहते त्या वेळेत त्यांचा मेंदू जागेपणी करतो तशाच विचारात गुंतलेला असतो. त्यामुळे या ‘आरईएम’ काळात झोपेत असतानाही अनेक दृश्यं दिसतात. अनेकांशी संवाद होतो. कधी कधी त्यातूनच काही समस्या सोडवणारी उत्तरंही मिळतात. मेंदूच्या या अगम्य वाटणार्‍या प्रक्रियेचा शोध घेण्याचं काम संशोधक सातत्याने करत आहेत.

एखाद्या विषयाचा ध्यास घेतलेला, लेखक, कवी, संशोधक, चित्रकार, सतत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. ‘ध्यानी, मनी, स्वप्नी’ त्यांना एकच गोष्ट दिसत असते. अशा ध्यासातूनच जगातली महाकाव्यं, महाशिल्पं, उत्तम कलाकृती आणि आपण आधुनिक काळात वापरतो त्या सर्व यांत्रिक वस्तूही निर्माण झाल्या.

एडिसनसारख्या माणसाने यंत्रयुगाची अनेक स्वप्नं पाहिली आणि अनेक गोष्टींचा शोध लावला. निसर्गातल्या शक्तीचाच योग्य वापर करून यंत्रनिर्मिती झाली. एडिसनच्या मनात विजेचा दिवा प्रथम उजळला म्हणून त्याला ‘बल्ब’चं दृश्यस्वरूप आलं आणि गेल्या दीडशे वर्षांत अवघं जग उजळून निघालं. ‘राइट बंधूं’नी उडण्याचा ध्यास घेतला आणि पहिलं यांत्रिक ‘फ्लायर’ विमान उडालं. त्यानंतर अनेकांच्या स्वप्नांची गगनभरारी थेट ग्रहमालेला गवसणी घालण्यापर्यंत पोहोचली आहे.

अशाच जागृतावस्थेतील ‘स्वप्नां’मधून अजिंठा-वेरूळची अप्रतिम शिल्पं साकारली. जगावर शतकानुशतकं मोहिनी टाकणारी महाकाव्यं जन्माला आली. माणसाच्या मेंदूची ही कमाल आहे. जगातील इतर अनेक प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असलेल्या माणूस नावाच्या या द्विपाद प्राण्याने अवघं विश्व पादाक्रांत करण्याचं स्वप्न बाळगलं आहे. त्यातलं पहिलं पाऊल चंद्रावर पडलं! उद्या तो मंगळावरही जाईल. अशी स्वप्नं साहित्यात, काव्यातही आधी अवतरतात. प्रसिद्ध गायक-नट किशोर कुमारचं ‘नयी दिल्ली’ सिनेमातलं त्याच्यावरच चित्रीत झालेलं एक गाणं आहे… ‘अरे भाई निकल के आ घर से, दुनिका की रौनक देख फिर से’ या गाण्यात कवी शैलेंद्र 1956 मध्ये म्हणून गेलेत, ‘कल चांद और तारों पे, पहुंचेगा ऐटमी घोडा’ यातला ‘ऐटमी घोडा’ म्हणजे अवकाशयान. पुढे 1969 मध्ये माणूस चंद्रावर गेला तेव्हा या गाण्यात सहज नोंदलेलं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं.

अशी स्वप्नं पाहणारे अनेक असतात. काहीजण नुसती स्वप्नं पाहतात तर काही ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. या सगळ्या जागेपणी पाहिल्या जाणार्‍या स्वप्नांच्या गोष्टी. पण ज्याला आपण ‘स्वप्न’ म्हणतो ते झोपेतच दिसतं. त्या क्षणाचा अनुभव खराच वाटत असतो. जाग आल्यावर समजतं की ते स्वप्नं होतं. स्वप्नांमध्ये भयकारी आणि दचकून जाग आणणारी स्वप्नंही दिसू शकतात. इंग्लिशमध्ये त्यांना नाइटमेअर्स किंवा दुःस्वप्न म्हटलं जातं.

सततच टेन्शन, आयुष्यात आलेले विपरीत अनुभव, अचानक उद्भवलेले कठीण प्रसंग यातून, झोपेतही ‘रॅपिड आय मूव्हमेंट’च्या म्हणजेच स्वप्नं पडण्याच्या वेळात भीतीदायी स्वप्नं दिसू शकतात. जपानी संशोधकांनी या आरईएम काळातील स्वप्न घडवणार्‍या ‘जीन्स’वर संशोधन करून दुःस्वप्न टाळता येतील का याचा विचार केला आणि त्यात त्यांना यश येतंय असं त्यांचं म्हणणं आहे. संशोधनाच्या पातळीवरची ही प्रक्रिया किचकट आहे. परंतु त्यातून ‘दुःस्वप्नं’ घालवणारा काही उपाय सापडला तर अनेकांची झोप सुखनिद्रा होईल.

उत्तम आचार, विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन हा दुःस्वप्नातून बाहेर पडण्याचा एक मार्ग असू शकतो आणि तो कोणालाही, आपला आपण प्रयत्न करून साध्य करता घेण्यासारखा आहे. निराशेतून निराशा असा मनाचा प्रवास होण्यापेक्षा, निराशेच्या, दुःखाच्या काळात जे त्यावर मात करून पुन्हा ठामपणे उभे ठाकले अशा माणसांची संख्याही काही कमी नाही. हे लक्षात घेऊन आणि आपल्या अडीअडचणी किंवा निराशा क्षुल्लक वाटावी इतक्या कठीण प्रसंगांतून जाऊनही पुन्हा उभारी घेणार्‍यांच्या डोळ्यात कोणती स्वप्नं असतील याचा विचार केला तर आपल्यालाही बरं वाटेल. आशा-निराशेचे क्षण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतातच. पण जीवनातील अनेक स्वप्नं साकारायची तर जिद्द हवी. सर्वच स्वप्नं प्रत्यक्षात उतरतील असंही नाही, पण त्यातून वेगळा मार्गही सापडू शकेल असा आशावाद हवा. मनाची धाटणी आपणच थोडी बदलली तर झोपेतल्या दुःस्वप्नांपासून हळूहळू मुक्ती मिळेल. जपानी संशोधकांनी झोपेतल्या ‘स्वप्नकाळातील’ ‘रॅपिड आय मूव्हमेंट’वर ताबा मिळवण्याचं तंत्र विकसित केलं तर दुःस्वप्न पडणार नाहीत हे चांगलंच, पण कदाचित ‘वाट इथे स्वप्नातील’ थबकेल! चांगली स्वप्नं तर पहायलाच हवीत… आणि प्रत्यक्षात उतरवायलाही हवीत.

[email protected]