चांगल्या गोष्टी शिकवणारा दसरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विलास पंढरी  

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. या दिवशी श्रीरामाचा पूर्वज रघू या अयोध्याधीशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या म्हणून रघू राजा कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. युद्ध नको म्हणून आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटण्यात आल्या. त्या काळापासून हिंदू विजयादशमी महोत्सव साजरा करतात. राजकारण हे प्रजेच्या हितासाठी असतं हा संदेश राज्यकर्त्यांना देणारा हा दिवस आहे.

उत्सवप्रिय मानल्या जाणार्‍या आपल्या देशात काही सण असे आहेत की, जे सर्वत्र साजरे होतात. राज्य, भाग बदलताच रीत बदलते, पण सण मात्र साजरा होतो आणि उत्साहही तसाच असतो. विजयादशमी किंवा दसरा हा असाच एक सण. ‘दुष्टावर सुष्टाचा विजय’ या संकल्पनेतून साजरा होणारा हा सण मध्य, उत्तर, पश्चिम, पूर्व अशा सर्वच हिंदुस्थानभर उत्साह आणि जोशात साजरा होतो. दसरा म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतात ती आपट्याची पानं. अत्यंत महत्त्वाचा असा कुठलाही उपक्रम सुरू करायलाही दसरा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. वाहन, गृह किंवा कुठल्याही खरेदीसाठी दसर्‍याचा मुहूर्त साधला जातो, पण हा सण हिंदुस्थानात साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडे जसं घटस्थापनेला घटात धान्य पेरलं जातं, तसंच कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीच्या भांड्यात सत्तू पेरतात. दसर्‍याच्या दिवशी त्यातून उगवलेले कोंब ज्याला नोरात्रा किंवा नोरता म्हणतात, ते पुरुष मंडळी त्यांच्या टोपीत खोचतात किंवा कानामागे ठेवतात. कारण हे नोरता शुभलक्षणी मानले जातात.

जशी देवीची साडेतीन पीठं आहेत तसे मुहूर्तही साडेतीन मानण्याची परंपरा आहे. दसरा हा त्यातील एक मोठा मुहूर्त समजला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करायलाही शिकवतो. दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करून नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्र, अस्त्र, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर आनंदाप्रीत्यर्थ सर्वांना सोने वाटायचे असते.

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघू या अयोध्याधीशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या म्हणून रघू राजा कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. युद्ध नको म्हणून आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटण्यात आल्या. त्या काळापासून म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात. राजकारण हे प्रजेच्या हितासाठी असून स्वतःचे खिसे भरण्यासाठी नसतं हा संदेश राज्यकर्त्यांना देणारा हा दिवस आहे.

देवीतत्त्व कार्यरत असल्यास सगुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते अन् केवळ विष्णुतत्त्व कार्यरत असल्यास निर्गुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते असे शास्त्र आहे. दसर्‍याच्या दिवशी तारक देवीतत्त्व विष्णुतत्त्वाच्या समवेत एकत्रितपणे कार्यरत होते. या दोन भिन्न तत्त्वांनी संयुक्तपणे कार्य केल्यामुळे तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य संपन्न होण्याबरोबरच या दोन तत्त्वांमधील परस्परांविषयीची प्रीती जागृत होऊन त्यांच्यातील तत्त्वाकडून विनाशाचे कार्य करण्याबरोबरच सृजनतेचे कार्यही आपोआप होऊ लागते. देवी आणि विष्णू यांच्या संयुक्त कार्यरत तत्त्वांकडून प्रक्षेपित होणार्‍या प्रीतीयुक्त कल्याणकारी स्थितीजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरतात. त्यामुळे सृजनतेच्या कार्याला गती प्राप्त होते. त्यामुळे पीक चांगले येणे, भरभराट होणे, शेतकरी आनंदित होणे यांसारखे परिणाम दिसून येतात.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक तर हनुमान तत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसर्‍याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास सहाय्य होते.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्तीरूपी) आणि तांबूस रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन जिवाच्या मारक भावाबरोबरच नेतृत्व गुणामध्येही वाढ होते. त्यामुळे जिवात क्षात्रभावाचे संवर्धन होते. जिवाने आपल्यामध्ये क्षात्रगुणाचे संवर्धन केल्यानेच तो सहज दुर्जनरूपी शक्तींचा संहार करू शकतो. म्हणूनच या दिवशी युद्धासाठी बाहेर पडत असत, सीमोल्लंघन करीत असत व विजयी होत असत.

दसरा हा सण संपूर्ण हिंदुस्थानसह मोठ्या हर्षोल्हासात इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन आणि थायलंडमधेही साजरा केला जातो. नेपाळमध्ये तर विजयादशमी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे. नेपाळमधील गुरखे कालीमाता आणि दुर्गामातेची नऊ दिवस पूजा करतात. विजयादशमीच्या दिवशी राजदरबारात राजा आपल्या प्रजेला अबीर, तांदूळ आणि दह्याचा टिळा लावतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मॉरिशसमध्ये हिंदू हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करतात.