
केंब्रिज ऍनालिटिका प्रकरणात झालेली नाचक्की, यूजर्सच्या खासगी माहितीचा फेसबुककडून झालेला गैरवापर, अनेक देशांकडून सुरू झालेली चौकशी अशा आपत्तींमधूनदेखील फेसबुक काही शिकायला तयार नाही. फेसबुकने नुकताच एका सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने फेसबुक आपल्या वापरकर्त्यांची सर्व खासगी माहिती, जसे की त्याचे घर, घरचे सदस्य, घरातल्या सदस्यांची एकमेकांशी असलेली नाती, दुरावे, त्यांच्या आवडी निवडी, घरातील वस्तू, हे लोक काय काय आणि कशी खरेदी करतात अशी सर्व माहिती गोळा करू शकणार आहे. यासाठी यूजर्स तर्फे फेसबुक आणि इस्टांग्रामवरती टाकण्यात आलेल्या फोटोंचा अभ्यास करून त्याचे नीट विश्लेषण करून हे सॉफ्टवेअर सगळी माहिती गोळा करण्यास मदत करणार आहे. या फोटोत टॅग करण्यात आलेले सदस्य, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, किती किती कालावधीनंतर आणि कोणा कोणाला टॅग करण्यात आले या सगळ्याचा अभ्यास करण्यास हे सॉफ्टवेअर समर्थ असणार आहे.
आता ही पूर्ण खासगी माहिती फेसबुक जाहिरात क्षेत्रासाठीच वापरणार किंवा जाहिरात कंपन्यांना पुरवणार आणि बक्कळ पैसा कमावणार. या पेटंटमध्ये फेसबुक नमूद केल्याप्रमाणे अशा माहितीचा उपयोग हा उलट फेसबुक यूजर्सना त्यांच्या आवडीच्या आणि गरजेच्या वस्तूंच्या विक्रेत्यापर्यंत सहजपणे पोचवण्यासाठी आणि यूजर्सच्या फायद्यासाठीच केला जाणार आहे. एखाद्या यूजरची खासगी माहिती नसेल तर त्याला दाखवल्या जाणार्या जाहिराती या चुकीच्या परिणाम साधणार्या असतात. अशा वेळी यूजरची आवडनिवड आधीच माहिती असल्यास त्याला अधिक परिणामकारक जाहिराती दाखवणे सोपे होणार आहे. मात्र अशा पेटंटसाठी अर्ज केला म्हणजे लगेच असे सॉफ्टवेअर बनवले जाईलच असे नाही, अशी पुस्तीदेखील फेसबुकने जोडली आहे.
































































