
>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज.
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सुपरफिटचे गुपित आज जाणून घेऊ या..
ऐश्वर्या नारकर सांगतात, रोज किमान एक तास स्वतःसाठी काढा. दिवसाच्या सुरुवातीचा वेळ अगदी उत्तम. कारण त्याने तुमचा पुढील दिवस कसा जाणार हे कळून येते. वजन कमी- जास्त असणे हे महत्त्वाचे नाही, पण तुमचे आरोग्य एकदम ठणठणीत असणे जास्त महत्त्वाचे आहे. वेळेत जेवणे व झोपणे गरजेचे आहे. जंक फूड कधीतरी ठीक आहे, पण तुमचा भर हेल्दी फूडकडे जास्त असला पाहिजे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे.
शरीरासोबत मनही येते. शरीर उत्तम असेल तर मनदेखील प्रसन्न असते आणि नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन उमेद जरूर देते. योगा, रनिंग, वॉकिंग, जिम इत्यादी गोष्टी करू शकता, पण नियमितपणे त्याचे पालन करता येईल याच्याकडे लक्ष द्यावे. सातत्याने तुम्ही एखादे कार्य करत राहिलात तर त्याचे परिणाम नक्कीच तुम्हाला अनुभवता येतील…आणि हो, या सगळय़ाला साथ असते उत्तम आहाराची. या दोन्हींचे संतुलन राखलेत तर स्वतःचे सुंदर रूप आपल्याला दिसते, असे ऐश्वर्या सांगतात.
त्या रोज घरून डबा घेऊन सेटवर जातात. त्यांच्या जेवणाच्या वेळा थोडय़ा वेगळय़ा आहेत. त्या 11-11.30 ला लंच आणि 6 ते 6.30 डिनर घेतात. स्वतःला फिट व प्रेसेंटेबल ठेवणे त्यांना आवडते.
ऐश्वर्या छान स्वयंपाक बनवतात. त्या सगळे जेवण तुपात करतात. त्यांच्या हातची मुगाचा शिरा, मुगाच्या डाळीची भाजी सगळय़ांना आवडते. कामामुळे कधी त्यांच्या डाएटवर परिणाम
झालेला नाही. त्यांनी पथ्यंही आवडीचं आणि जास्त काळ सांभाळता येईल, असे निवडले आहे.
आपल्या पचनक्रियेला जे पचेल आणि जे आवडेल तेच खावे. पोट जर आनंदी असेल तर आपणही आनंदी असतो. मुळात दिवसाची पहिली सुरुवात चांगल्या खाण्याने झाली पाहिजे. मग दिवस चांगला जातो. नुसती चव महत्त्वाची नाही आहे, पौष्टिक जेवण खा. आपण काय खातोय आणि किती खातोय याचे भान आपल्याला असले पाहिजे, असा कानमंत्र त्या सांगतात.
एखाद्या वेळी चालतंय की…
ऐश्वर्या यांना पावभाजी, पाणीपुरी, सुखी भेळ आवडते. त्यांना ठेचा घातलेला तिखट वडापावही आवडतो. त्यांना भात फारच आवडतो. भाज्या, कोशिंबीर या गोष्टी मुळातच आवडतात. म्हणून त्यांचे डाएट तुटत नाही. त्यांच्या खाण्याबाबतीचा कल तिखटाकडे थोडा जास्त आहे. भाकरीसोबत ठेचा वा खर्डा एकदम फक्कड. त्यांचे सहकलाकार कधी कुठे, बाहेरगावी गेले, तर त्यांच्यासाठी आवर्जून ठेचा किंवा लोणचे आठवणीने घेऊन येतात.



























































