
>> अमित घोडेकर
हातातील मोबाईल आपल्याला प्रत्येक गोष्ट सोपी करून देतोय. हव्या त्या रेस्टॉरंटमधील आवडीचे पदार्थही घरबसल्या मिळू लागले. हे वाहकाचं काम स्विगी, झोमॅटोसारख्या फूड ऍप्सनी केले आहे. मध्यंतरी हे ऍप्स दूषित अन्न देतात असे म्हटले गेले. पण मुळात ही फूड ऍप्स अन्न तयार करण्याचे काम करीत नाहीत तर अन्न आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात.
आधी पोटोबा मग विठोबा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींची सुरुवात पोटापासूनच होते. पोटोबा व्यवस्थित असेल तर मग सगळ्याच गोष्टी मस्त..!! आजकाल आपल्या पोटोबाला तृप्त करण्यासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. हॉटेल्सपासून ते अनेक फूडचेन्स अगदी रस्त्यावरील अनेक नामांकित खाऊगल्ल्या आपल्या क्षुधा शांत करत आहेत. यात मग अनेक परदेशी पदार्थ विकणारे लोकदेखील आपले बस्तान बांधून आहेत. मग त्यात पिझ्झा हट किंवा मॅकडोनाल्ड असो किंवा 30 मिनिटांत घरपोच पिझ्झा देणारे डॉमिनोजवाले असोत. डॉमिनोजने प्रथम 30 मिनिटांत घरपोच पिझ्झाची सेवा सुरू केली आणि फोनवर ऑर्डर दिल्यावर अर्ध्या तासात गरमागरम खाद्यपदार्थ पोचवता येऊ शकतात आणि ते यशस्वी होऊ शकते हे जगाने बघितले. अनेक लोकांनी तसला प्रयत्न करून बघितला, पण जवळपास सगळेच यात अपयशी ठरले. घरपोच किंवा अगदी ऑफिसमध्ये किंवा अगदी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पिझ्झाच काय अगदी काहीही पोहचविता येऊ शकते हे यशस्वी व्हायला मग अनेक वर्षे जावी लागली. तोपर्यंत स्मार्टफोनवरून अनेक ऍप्सदेखील वापरू लागले होते. मग ‘झोमॅटो’, ‘स्वीगी’ ‘फूडपांडा’, ‘अर्बन इट्स फॅसोज’ अशा ऍप्सचा जन्म झाला.
ग्राहकाने फूड ऍपची योग्य निवड केली पाहिजे. फूड ऍप्स हे केवळ वाहकाचे काम करतात, अशावेळी ग्राहकाने ऑर्डर करताना हॉटेल्सचा दर्जा पाहावा. समोर पदार्थांचे चित्र चांगले दिसते म्हणून लगेच घेऊ नये. त्याखालील प्रतिक्रियाही वाचल्या तर तुम्हाला मदत मिळेल. भलेही पुढे दिसायला काहीही असेल पण मागून या सगळ्या ऍप्स सारख्याच पद्धतीने काम करत होत्या. त्यांच्याकडचे मुख्य संसाधन म्हणजे त्यांचे डिलिव्हरी करणारे आणि त्याच्यासोबत काम करणारे हॉटेल्स. हॉटेल्स गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या दोन्ही गोष्टींमध्ये अनेक तक्रारी येऊ लागल्या. डिलिव्हरी करणारे अनेक लोक काहीतरी वेगळी किंवा निकृष्ट दर्जाची डिलिव्हरी करत आहेत किंवा दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता, चव अतिशय खराब आहे, अशा एक ना अनेक तक्रारी यायला लागल्या आणि प्रशासन खडबडून जागे झाले. मग याचा सखोल अभ्यास केल्यावर सरकारने तब्बल 5 हजारांहून अधिक हॉटेल्स किंवा ठिकाणे जिथून वेगवेगळे खाद्य पुरवले जायचे ते खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला आणि अशा सगळ्या ठिकाणांना त्वरित त्या ऍप्समधून काढून टाकायला सागितले. त्याचबरोबर खाद्यपदार्थ पुरवताना इथून पुढे अनेक नियमांचे मापदंड पाळावे लागतील जे या सगळ्या कंपन्यांना मान्य करावे लागतील असे सांगितले.
सध्या तरी या सगळ्यातून या ऍप्सना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आपणही कोणत्याही ऍप्समधून काहीही खाद्य पदार्थ मागवताना त्याची गुणवत्ता तपासूनच त्याचा वापर केलेला बरा.
खवय्यांची मज्जाच!
ही सगळी फूड ऍप्स प्रचंड लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे यांच्या कामाची पद्धत, जवळपास बहुतांशी अनेक छोटी आणि मोठी हॉटेल्स यांच्या चेनमध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे खवय्यांसाठी ही ऍप्स म्हणजे अल्लाऊद्दीनचा चिरागच झालाय. शिवाय या ऍप्समधून काहीही ऑर्डर केले की चांगली सूटदेखील मिळत असे. त्यामुळे जिभेच्या चोचल्याबरोबर आपला खिसाही सांभाळता येतो आणि आपण जिथे असू तिथल्या जवळपासच्या अनेक नामांकित हॉटेल्सची यादीच आपल्यासमोर सादर केली जाते. त्यात मग त्या ठिकाणावरून जर अगोदर कुणी काही मागवले असेल तर त्यांना कोणता पदार्थ आवडला हेदेखील कळू लागले. त्यामुळे ही ऍप्स खवय्यंमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली.
- आज अनेक प्रकारची फूड ऍप्स आहेत. त्यातील माहितीतले ऍपच निवडावी.
- फूड ऍपच्या खाली लोकांच्या प्रतिक्रिया असतात. त्या वाचून तुम्हाला थोडा अंदाज येतो.
- फूड ऍपमधून एखादी ऑर्डर करताना त्यात तुम्हाला हॉटेल्सचे पर्याय निवडण्याचे असतात. त्यामुळे योग्य हॉटेल निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे उपाहारगृहाच्या दर्जाला आधी महत्त्व द्या.
- सवलतीच्या मागे लागून खाद्यपदार्थ ऑर्डर करू नका, अशावेळी निकृष्ट दर्जाचे पदार्थ मिळू शकतात.
- अनोळखी उपाहारगृहाची निवड करू नका. रस्स्त्यावरील स्टॉल्स किंवा गाडीवरील अन्न मागवू नका.
- चाट पदार्थ किंवा दाबेलीसारखे पदार्थ नामांकित उपाहारगृहांतूनच मागवा.
- पैशांच्या बाबतीत ऍप्सच्या हेल्पलाइन क्रमांकाच्या संपर्कात राहा.
- ही ऍप्स मजेसाठी असतात. त्याचा आस्वाद घ्या.





























































