
आंग्रे कुळातील सर्व शूर असामींनी ज्या सागरी दुर्गावरून बहुतांशी काळ मराठा आरमाराचा कारभार पाहिला तो सागरी दुर्ग म्हणजे अलिबागजवळचा किल्ले कुलाबा होय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचा पाया रचला, तर कान्होजी आंग्रेंनी त्यावर कळस चढविला. कान्होजी आंगेंनंतर सेखोजी आंग्रे, मानाजी आंग्रे, तुळोजी आंग्रे यांनीसुद्धा मराठी आरमाराचा दबदबा कायम राखत या आरमाराला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले. आंग्रे कुळातील या सर्व शूर असामींनी ज्या सागरी दुर्गावरून बहुतांशी काळ मराठा आरमाराचा कारभार पाहिला तो सागरी दुर्ग म्हणजे अलिबागजवळचा किल्ले कुलाबा होय.
कुलाबा किल्ल्याला भेट देण्यासाठी अलिबाग शहर गाठावे लागते. घोडागाडीने, बोटीने किंवा ओहोटीच्या वेळी चालत जाऊन आपण किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गाठू शकतो. किल्ल्यात दाखल होताच उजव्या हाताला तटाच्या आत धान्यकोठाराची वास्तू आहे. मुख्य पायवाटेने पुढे गेल्यास पद्मावतीची घुमटी लागते. बाजूलाच महिषासुरमर्दिनीची (गोळावती देवी) अतिशय सुबक अशी मूर्ती आहे. पुढे डाव्या हाताला विहिरीच्या बाजूला भवानीमातेचे मंदिर आहे. मुख्य पायवाटेने पुढे आल्यावर डाव्या बाजूला आंग्रेंच्या दोन मजली भव्यदिव्य वाडय़ाचे भग्नावशेष आपल्या दृष्टीस पडतात. या वाडय़ाच्या पलीकडे दगडी पायऱया असलेल्या दोन विहिरी आहेत. याच बाजूला बुरुजावर एक दर्ग्याची वास्तू आहे.
हे सर्व अवशेष पाहून आपण गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या गणेश मंदिराच्या जवळ यायचे. या मंदिराच्या समोर तटबंदीने संरक्षित केलेली पुष्करणी आहे. पुष्करणी पाहून आपण गणेश मंदिरात प्रवेश करायचा. या मंदिरातील गाभाऱयात गणपतीच्या डाव्या हातास विष्णू, उजव्या हातास शंकर, पुढील बाजूने डाव्या हातास देवी व उजव्या हातास सूर्यनारायण अशी पंचायतनाची रचना आहे. पुढे गेल्यावर उजव्या हाताला ‘कान्होबाची घुमटी’ नामक वास्तू आहे.
पुढे आपण दर्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वारावर रिद्धी-सिद्धीच्या सोबत गणेश शिल्पे, मगरीची शिल्पे, गरुडदेवता, हनुमान व शरभ शिल्पेसुद्धा कोरलेली पाहावयास मिळतात. किल्ल्यातील सर्व अवशेष पाहून झाल्यावर आपण तटावर यायचे. तटफेरी करताना पश्चिमेकडील बुरुजावर इंग्रजी बनावटीच्या भल्यामोठय़ा दोन तोफा आपणास दिसून येतात. या तोफा पाहून झाल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या बुरुजाजवळ येऊन पोहोचतो. दगडी जिन्याने खाली उतरून आपण गडप्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. कुलाबा किल्ल्याचे जमिनीकडून संरक्षण व्हावे यासाठी किल्ल्याच्या पुढय़ात सर्जेकोटाची निर्मिती केली गेली.
कुलाबा किल्ल्याची बांधणी मार्च 1680 च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी सुरू केली. त्यांच्या पश्चात किल्ल्याचे बांधकाम संभाजी महाराजांनी पूर्ण केले. पुढे अनेक वर्षे या जलदुर्गावर आंग्रे घराण्याचे आरमारी केंद्र होते. दुर्दैवाने या जलदुर्गाला चार-पाच वेळा भयंकर अग्निप्रलयाला तोंड द्यावे लागले. यात गडावरील वास्तूंची अपरिमीत हानी झाली. 1843 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला.
कुलाबा किल्ल्याच्या दर्या दरवाजावरील मगरीचे शिल्प हे मराठय़ांच्या सिंधू सागरावरील वर्चस्वाचे प्रतीक दर्शवते. शिवाजी महाराजांनी उभे केलेले आरमार कान्होजी आंग्रेंनी शिखरावर नेऊन पोहोचवले. आजही या जलदुर्गांच्या भिंतीना जर आपण कान लावले तर हा गडपुरुष आपल्याला आंग्रे कुळाचा इतिहास अभिमानाने सांगेल.
डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक






























































