आभाळमाया – ‘आभाळमाये’ची ओढ!

>> वैश्विक

‘विश्वरूप दर्शन’ घ्यायचं तर निरभ्र काळोख्या रात्री जागरण करून आकाशाकडे नजर लावून तासन्तास घालवण्याची तयारी हवी. आता तर शक्तिशाली दुर्बिणींद्वारे अवकाशातील केवळ ठळक ग्रह, तारेच नव्हे तर मंगळ-गुरू यांच्यामध्ये असलेले मोठे अशनीसुद्धा पाहता येतात.

अवकाशाचे ‘वेध’ घेण्याची जागतिक परंपरा अनेक संस्पृतींनी जोपासली. आपणही त्यात अग्रेसर होतो. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, वराहमिहीर, आपल्या महाराष्ट्रातील भास्कराचार्य ते प्रा. जयंत नारळीकर अशा अनेक संशोधकांनी त्या त्या काळानुसार विश्वरचनेचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्य जगात दुर्बिणीचा शोध लागल्यावर 17 व्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच अवकाश अभ्यासाला नवं परिमाण लाभलं आणि आधुनिक काळात सर्वसामान्यांनाही दुर्बिणी उपलब्ध झाल्याने आकाशदर्शनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी होऊ लागले.

खग्रास, खंडग्रास, पंकणापृती अशी दिवसा दिसणारी सूर्यग्रहणांची मौज आणि अभ्यासही खगोल अभ्यासक अनुभवू लागले. रात्रभर जागृत दूरस्थ दीर्घिकांचे पह्टो घेणाऱया अॅस्ट्रोपह्टोग्राफरची संख्या वाढली. आपण जिथून आकाशदर्शन करणार, तिथले अक्षांश-रेखांश (किंवा को-ऑर्डिनेट) ठरावीक ‘अॅप’वर नोंदले की, कोणते तारकासमूह त्याक्षणी दिसणार हे ताबडतोब समजतं.

त्याच वेळी या तारकासमूहांची, कृष्णविवरांची तसेच तेजोमेघ, तारकागुच्छ या सर्व अवकाशीय ‘वस्तूं’मागचं विज्ञान समजावून सांगता येतं. ज्या विश्वाचा आपण (पृथ्वी) एक अतिसूक्ष्म घटक आहोत, त्याचं स्वरूप कसं आहे याची जाणीव होऊन वैज्ञानिक जिज्ञासा वाढीला लागून वैचारिक प्रगल्भता येण्यासही मदत होते.

या सर्व गोष्टींचा आनंददायी अनुभव आम्ही गेली 40 वर्षे सातत्याने घेतला. 6 जुलै रोजी 40 वर्षे पूर्ण झालेल्या आमच्या ‘खगोल मंडळा’ने आजवर हजारो लोकांना विश्वरूप दर्शन घडवलं. मराठीतून खेडोपाडय़ांपर्यंत आमचे कार्यक्रम आजही होत असतात. क्लिष्ट वाटणारे खगोलीय विषयही आमचे सभासद सोप्या मराठीत सांगतात. आवश्यक तेथे इंग्लिशचाही किंवा दोन्ही भाषांचा संमिश्र वापर केला जातो. या उपक्रमांतून आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिह्यात पोहोचलो. देशातही उत्तर-दक्षिण हिंदुस्थानात अनेक कार्यक्रम केले. एवढेच नव्हे तर परदेशात गेलेल्या आमच्या सभासदांनी इंग्लंड, अमेरिका, कतार, न्यूझीलँड अशा अनेक देशांतील खगोल संस्थांशी संपर्प ठेवला. काही ठिकाणी आमचे सभासद तिथल्या संस्थांसाठी पदाधिकारी होऊनसुद्धा मार्गदर्शन करू लागले. अशाच एका कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे दिवंगत कुलगुरु राम जोशी यांनी संबोधित केले होते.

2024 मधील खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अमेरिकेतील आमचे बरेच सभासद एकत्र जमले आणि तिथे त्यांनी आम्ही हिंदुस्थानातून अनेकदा पाहिलेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा पुनरानुभव घेतला आणि त्यावर लगेच मराठी-इंग्लिश पुस्तिकाही प्रसिद्ध केली. अशा उत्साही कार्यकर्त्यांचा चार दशकांचा सहभाग आणि नव्या कार्यकर्त्यांचा ओघ यातून लोणार अशनी विवर परिषदेपासून कित्येक खगोलीय कार्यक्रम यशस्वीरीत्या करता आले.

1998 मध्ये वांगणी येथे सिंह राशीतील उल्कावर्षाव पाहायला सुमारे दहा हजार लोक आले. ताशी 250 उल्का आदल्या रात्री पाहिल्यामुळे त्या दिवशीच्या कार्यक्रमाचा उत्साह अवर्णनीय होता, परंतु पावसाने त्यावर अक्षरशः ‘पाणी’ ओतले. तरीही सर्व प्रेक्षकांनी आमच्या मोजक्या कार्यकर्त्यांना उत्तम सहकार्य केले. ती शिस्त पाहून तेथील ग्रामपंचायतीने आकाशदर्शन क्षेत्राकडे जाणाऱया रस्त्याला ‘तारांगण मार्ग’ आणि तेथील चौकाला ‘भास्कराचार्य चौक’ असे नाव दिले. एखाद्या स्वतंत्र खगोल संस्थेच्या इतिहासातील देशातली ही पहिलीच घटना असावी.

अशाच अभ्यासातून प्रेरणा घेऊन आमच्या सुमारे 20 सभासदांनी अनेक खगोलीय विषयांमध्ये पीएच.डी. प्राप्त केली. देश-विदेशातील प्रसिद्ध खगोलीय संस्था आणि प्रकल्पांसाठी काम करण्याची संधी त्यांना लाभली. सहसंस्थापक म्हणून संस्थेच्या या प्रज्ञावंतांचा अभिमान वाटणे साहजिक आहे.

आजही बदलापूरजवळच्या उंबरोली येथे स्वतःच्या एक एकर जागेवर तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कार्यक्रम होत असतात. मागणीनुसार गावोगावी आमचे प्रशिक्षित क् ाैार्यकर्ते खगोल अभ्यासाचे आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात. आपले विश्व आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने समजल्यास इथले पृथ्वीवरचेही अनेक प्रश्न सुटू शकतात. चंद्र, मंगळवार जाणं उत्तमच, परंतु ‘पृथ्वी’ नावाचा ‘ग्रह’सुद्धा विराट विश्वरूपाचाच एक भाग आहे आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे.