
महेश उपदेव
पारंपरिक ते आधुनिक चित्र नव्या पद्धतीने साकारण्यात हातखंडा असलेले, स्वातंत्र्यसेनानी व विख्यात चित्रकार अरुणदादा मोरघडे यांचे नुकतेच 96 वर्षी निधन झाले. सकाळी 10.30 वाजता जागनाथ बुधवारी येथील निवासस्थानी निधन झाले. जीवनाकडे अतिशय सकारात्मकतेने बघणारा एक कलंदर माणूस म्हणजे अरुण मोरघडे, अशी त्यांची राज्याच्या उपराजधानीत ओळख होती. चित्र आणि चित्रच सर्वस्व मानणारा, जिवापाड स्नेह जपणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. 14 ऑगस्ट 1927 रोजी जन्म झालेल्या अरुणदादा मोरघडे यांनी 65 वर्षे चित्रकला व साहित्य सेवा केली आहे. महात्मा गांधी व आचार्य धर्माधिकारी यांच्या विचारांच्या प्रेरणेने ते 1942 मध्ये इंग्रजांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान त्यांना भूमिगतही व्हावे लागले होते. स्वातंत्र्य युद्धातील योगदानासाठी त्यांना शासनातर्फे 1995 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. शिवाय, चित्रकला व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
मोरघडे यांनी वयाच्या तिसऱया वर्षी हाती कुंचला घेतला. 14ऑगस्ट 1927 रोजी एका गरीब घरात जन्मलेला मुलगा लहानपणीच चित्रांच्या, रंगांच्या प्रेमात पडला. मुंबईत चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ तेथे नोकरी केल्यानंतर त्यांचे मन तेथे रमले नाही. शेवटी नागपूरची वाट धरली. शेवटपर्यंत ते नागपुरातच रमले.
2004 मध्ये त्यांना जागतिक साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले होते. पारंपरिक ते आधुनिक चित्र नव्या पद्धतीने साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. चित्रांतून साहित्य समन्वय साधण्याचे कार्य त्यांनी पाच दशके केले. ते व्यक्तिचित्रणात सिद्धहस्त होते. वास्तववादी चित्रणासाठी त्यांनी जगदलपूर या दुर्गम भागात प्रवास करून चित्रनिर्मिती केली होती. गडचिरोली येथील मार्कण्डा येथे वास्तव्य करून त्यांनी मंदिराच्या स्थापत्य कलेचा अभ्यास करून चित्रनिर्मिती केली होती. अमूर्त व वास्तववादी चित्र हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय़ होते.
त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी त्यांना महाराष्ट्र शासन, गिरीश गांधी फाऊंडेशन, रसिक राज साहित्य संस्था, चित्र महर्षी अरुणदादा फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण फोरमच्या वतीने ‘अनादी’ या उपक्रमात अरुणदादा मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे या प्रख्यात चित्रकारांना एकत्र आणण्याचे कार्य झाले होते.
वयाच्या 96 व्या वर्षी ते आपली दुचाकी घेऊन शहरात पहाटे फेरफटका मारीत होते. युवकांनाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. ‘आजवरच्या रंगप्रवासात मी कलेसाठी कला म्हणूनच जगलो. कलेचा कधीही व्यवसाय होऊ दिला नाही याचे मला समाधान आहे’, असे ते नेहमी सांगायचे. कलेसाठी वाहून घेणाऱ्या कलावंतासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अरुण मोरघडे यांची इच्छा होती.



























































