
आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस. पूर्वी 7 जूनला सुरू झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस संपायचा. आता छत्रीचे लोढणे बाळगायला नको म्हणून गर्दीच्या मुंबईतले चाकरमानी सुखावायचे. सरत्या पावसामुळे सर्वत्र पसरलेली हिरवाई आणि वर स्वच्छ निळय़ा आकाशातून येणारा सोनेरी सूर्यप्रकाश आल्हाददायक वाटायचा. रात्रीच्या अंधारात, चार महिन्यांनंतर तारकांची लगबग जाणवायची. हे असे सगळे भूतकाळवाचक लिहिण्याचे कारण म्हणजे निसर्गही आता माणसासारखाच लहरी व्हायला लागलाय. पावसाळा नेमका कधी सुरू होणार आणि संपणार यापेक्षा कुठे समुद्रात कमी दाबाचे पट्टे नि अवकाळी वादळ-पाऊस कधी येणार याचीच धास्ती. तरीही ऑक्टोबरपासूनचा काळ रात्रभराचे आकाशदर्शन करू इच्छिणाऱयांच्या दृष्टीने मोलाचा. कोविडमधून लवकरच बाहेर पडलो तर महिन्या-दोन महिन्यांत कदाचित दुर्बिणी घेऊन निरभ्र काळोख्या रात्री अवकाशी मौज अनुभवता येईल, अशी अपेक्षा करूया.
गेल्या काही लेखात आपण ‘तारे’ कसे व त्यांचे स्वरूप याची थोडीफार माहिती घेतली. खूप तपशील त्यात भरला तर ते लेख फारच तांत्रिक माहितीचा होईल म्हणून या विषयांची कुतूहल वाढवणारी ओळख एवढा आपला उद्देश असतो. या वेळी आपण आपल्याला सहज दिसणाऱया दीर्घिकांविषयी माहिती घेऊया. सर्वात स्पष्ट दिसणारी दीर्घिका म्हणजे आपण ज्या दीर्घिकेचा भाग आहोत ती आकाशगंगा किंवा ‘मिल्की वे’ दीर्घिका म्हणजेच गॅलॅक्सी. आपणच त्यात समाविष्ठ असल्याने, ही दीर्घिका एकूण कशी दिसते ते आपल्या अवकाश दुर्बिणीने काढलेल्या फोटोतच दिसू शकते.
आपली आकाशगंगा गॅलॅक्सी विश्वातील अब्जावधी दीर्घिकांपैकी एक आहे. ती स्पायरल किंवा सर्पिलाकृती आहे. म्हणजेच एका बाजूने पाहिल्यास आपल्या दीर्घिकेचे बाहू (आर्म्स) आपल्याला दिसतील. यातल्याच ‘एसबी’ प्रकारच्या दीर्घिकेचे आपण सदस्य आहोत. सर्पिलाकृती किंवा स्पायरल प्रकारच्या दीर्घिकांचे तीन प्रकार असतात. ‘एसए’ प्रकारच्या दीर्घिकांचे बाहू घट्ट असतात. तर ‘एससी’ प्रकारच्या सर्पिल गॅलॅक्सी सैलसर बाहूंच्या असतात. आपली आकाशगंगा यापैकी ‘मध्यम’ स्वरूपाची असून ती ‘एसबी’ प्रकारची आहे. एका बाजूने आपल्या दीर्घिकेकडे पाहिल्यास चकतीप्रमाणे व मध्ये फुगीर दिसते. मात्र ती अनेक बाहूंची व सर्पिलाकृती या दीर्घिकेच्या ययाती आणि धनू या दोन बाहूंना जोडणारा जो ‘ओटायन ब्रीज’ आहे त्या ‘पुलां’वर आपली सूर्यमाला बसलेली आहे. आकाशगंगेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लांबी मोजली तर एक लाख प्रकाशवर्ष होईल. म्हणजे प्रकाशाच्या सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने इकडून तिकडे पोचायला एक लाख वर्ष लागतील. आकाशगंगेच्या मध्यावर जो फुगवटा दिसतो त्याची रुंदी पाच हजार तर अगदी टोकाला दोन हजार प्रकाशवर्षे एवढी आहे. धनू तारकासमूहात आपल्या आकाशगंगेचे केंद्र आहे.
आकाशगंगेच्या केंद्रस्थानी महाशक्तीशाली कृष्णविवर असल्याने बाकीचा पसारा किंवा पिसारा त्याभोवती फिरतो. आपली सूर्यमाला सेकंदाला 230 कि.मी. वेगाने याच केंद्रकाभोवती फिरते आणि या वेगाने एक महावर्तुळ पूर्ण करायला सूर्यमालेला पंचवीस कोटी वर्षे लागतात. आपल्या सूर्याचे वय आता पाच अब्ज वर्षांचे आहे. म्हणजे जन्मापासून आपल्या सूर्यमालेने आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती वीस फेऱया मारल्या आहेत. आता आणखी वीस फेऱया झाल्या की सूर्याचा कायमचा अस्त होईल. म्हणजे सूर्याचे वय शंभर वर्षे मानले तर आता तो पन्नास वर्षांचा प्रौढ तारा झालेला आहे.
ज्या ‘ओरायन ब्रीज’वर आपली सूर्यमाला आहे ती जागा आकाशगंगेच्या केंद्रकापासून तीस हजार प्रकाशवर्षे म्हणजे बरीच जवळ आहे. या आकाशगंगेत असूनही आपल्याला आकाशगंगेचा शुभ्र पट्टा निरभ्र काळोख्या रात्री या काळात दिसतो. शर्मिका, मिथून, धनू अशा तारकासमूहामधून जाणारा हा दुधाळ पट्टा पाहून पाश्चात्यांनी त्याला ‘मिल्की वे’ असं नाव दिलंय. धनू राशीच्या पार्श्वभूमीवर आकाशगंगेची शुभ्रता अधिक जाणवते. वाढत्या प्रदूषणामुळे आणि दिव्यांच्या लखलखाटामुळे आता आकाशगंगा पहायची तर शहरापासून खूप दूर जावे लागते. एकोणीसशे साठच्या दशकात मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या थोडेसे बाहेर पडले की आकाशगंगेचे मनोहारी दृश्य दिसायचे. आता त्यासाठी शहरी भागापासून खूप दूर जावे लागते. तरीही ही ‘आपली’ आकाशगंगा जेंव्हा जमेल तेंव्हा जरूर पहा. सुमारे शंभर ते दोनशे अब्ज ताऱयांसह संपन्न असलेली आकाशगंगा हीच आपल्या सूर्यसंकुलाची जननी आहे.
































































