
>>वैश्विक
ज्या वैज्ञानिक संशोधनाचे फायदे आपण आज क्षणोक्षणी पृथ्वीवर अनुभवत आहोत आणि ज्या अवकाशस्थ संशोधनाकडे चकित होऊन पाहत आहोत, तसंच चंद्र, मंगळावर वसाहतींच्या कल्पना करत आहोत त्या सग्ळय़ा गोष्टी म्हणजे काळाच्या आधी अनेक संशोधकांनी जो प्राथमिक निरीक्षणांचा आरंभ केला त्याची प्रगत अवस्था आहे. पण त्या सुरुवातीच्या अंदाज किंवा मांडणीसाठी अनेक संशोधकांना रूढीग्रस्त समाजाचा रोष सहन करावा लागला. आपल्या देशात ब्रह्मगुप्त, वराहमिहीर, आर्यभट्ट, भास्कराचार्य यांना सन्मान लाभला तरी त्यांच्या संशोधनाचं आकलन सर्वसामान्यांपर्यंत त्या काळात पोचण्याची शक्यता नव्हती. सतराव्या शतकात जयपूरचे सत्ताधीश सवाई जयसिंग यानी ‘जंतर मंतर’ची पाच ठिकाणी उभारणी करून विश्वाची त्याकाळच्या आकलनानुसार असलेली वैज्ञानिक संकल्पना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न अद्वितीय आहे.
खगोलशास्त्राच्या आधुनिक म्हणजे उपकरण, यंत्र वगैरेंच्या मदतीने होऊ लागलेल्या अभ्यासात दुर्बिण किंवा टेलिस्कोपचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चष्मे बनवणारे नेदरलॅण्डचे (डच) हॅन्स लिपर्शे यांना भिंगातून वस्तू स्पष्ट आणि मोठी दिसते याची माहिती होती. पण त्या तंत्राचा खगोलशास्त्रासाठी वापर करावा हे इटलीमधल्या गॅलिलिओ गॅलिली यांना सुचलं आणि त्यांनी तीन इंच व्यासाच्या भिंगाची जगातली पहिली खगोलीय वेध घेणारी दुर्बिण दाखवली. या दुर्बिणीतून त्यांनी दूरच्या वस्तू जवळ दिसतात हे लोकांना दाखवताच त्यांना त्यांचं कौतुक वाटलं. 30 नोव्हेंबर 1609 या दिवशी गॅलिलिओ यांनी प्रथमतः चंद्राकडे ही दुर्बिण रोखली आणि मग खगोलीय अभ्यासाची क्षितिजं खऱया अर्थाने रूंदावली.
चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे, दऱया, डोंगर आहेत हे लक्षात आल्यावर चंद्राचा आधुनिक अभ्यास सुरू झाला तो आजतागायत. त्याचबरोबर गुरू, शुक्र, शनी अशा ग्रहांचं निरीक्षण करून त्यांची वैशिष्टय़ गॅलिलिओ सांगू लागले, लिहू लागले. हे ग्रह गोलाकार आहेत. गुरू ग्रहाला चार ‘चंद्र’ आहेत तर शनीला ‘कान’ (कडी) आहेत अशी नोंद त्यांनी केली आणि आपल्या विचाराच्या मित्राना ते याबाबत सांगू लागले.
गॅलिलिओ पूर्व काळात ऑरिस्टॉटलच्या विचारांच्या बहुतेक लोकांचा टॉलोपीची ‘पृथ्वी केंद्रित’ विश्वाच्या कल्पनेवर नुसता विश्वासच नव्हे तर श्रद्धा होती. पृथ्वीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, असंच यंत्रयुगाची पहाट होऊनसुद्धा पाश्चात्य समाज समजत होता.
इसवी सनच्या पहिल्या शतकातील क्वॉडिअस टॉलेमीनेही खगोलशास्त्राचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढले होते ते विश्वरचनेबाबत आताच्या संशोधनानुसार खरे नव्हते. तरी त्या काळात त्याचा विचार करणंही फार महत्त्वाचं होतं. पुढे पंधराव्या शतकात जन्मलेल्या निकोलस कॉपर्निकसने सूर्यकेंद्रित विश्वाची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे बाराव्या शतकात आपल्या महाराष्ट्रातील खगोलतज्ञ, भास्कराचार्यांनी पृथ्वी अवकाशात अधांतरी फिरत असल्याची कल्पना मांडली होती. ‘भ्रमद्भपक्रचक्रांतरे मगनान्तरै असा काहीसा तो श्लोक आहे. त्याच काळात ज्ञानेश्वर जैसे सूर्याचे न चालतही चालणे’ अशी उपमा देत होते, त्यावरून पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणारा ग्रह असल्याची कल्पना आपल्या संशोधकांना होती.
युरोपात मात्र सोळाव्या शतकातही पृथ्वीकेंद्रित टॉलेनी मॉडेल’ नाकारून नव्याने आलेलं कोपर्निकन मॉडेल स्वीकारण्याची मानसिकता तयार झाली नव्हती. कोपर्निकस गेल्यावर एकतीस वर्षांनी गॅलिलिओचा जन्म झाला. दुर्बिणीच्या सहाय्याने त्याने दाखवलेलं विश्वदर्शन आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसंच इतर सर्व ग्रहसुद्धा तसेच सूर्याभोवती फिरतात या कोपर्निकसच्या मांडणीचं केलेलं संशोधन रोममधल्या धर्ममार्तंडाला पटणार नव्हतं. एवढंच नव्हे तर टायको ब्रम्हेसारखे खगोल अभ्यासकही गॅलिलिओचं सुस्पष्ट संशोधनही समजू शकत नव्हते. शेवटी गॅलिलिओला त्याच्या ‘चुकीच्या’ विश्वमताबद्दल जन्मभर नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
आधुनिक संशोधनात काळाच्या पुढची मतं मांडणाऱ्यांना जगभरच असा त्रास सहन करावा लागला आहे. गॅलिलिओच्या काळात खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे अनेक संशोधक युरोपात विचार करू लागले होते. हे मात्र खरं. कोपर्निकसने एक नवी दिशा दाखवली होती. त्याच्यानंतर लगेच गॅलिलिओप्रमाणेच जोहान्स केपलर या संशोधकानेही ग्रहगतीचा वेध घ्यायला सुरुवात केली. केपलरच्या नावे तर 1604 चा अतिनवताराही (सुपरनोव्ही) आहे.
अवकाशाचं निरीक्षण केपलरनं गॅलिलिओच्या पद्धतीनं दुर्बिणीद्वारे केलं. कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित ग्रहमालेचं मॉडेलच त्यानं त्या काळात बनवलं. टीकेचे धनी होऊन हे शास्त्रज्ञ आपल्या मनावर ठाम राहिले. यापैकी गॅलिलिओला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. तरी त्याच्या वैज्ञानिक मतांमध्ये परिवर्तन झालं नाही. त्या वेळच्या एका पेंटिंगमध्ये गॅलिलिओ ‘तरीही पृथ्वीच फिरते’ हे भिंतीवर लिहिलेलं वाक्य नजरकैदेत असताना टक लावून पाहत असे, असं दाखवलंय. आता गॅलिलिओचे त्या 1940 च्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘ए पर सी मूव्हे’ म्हणजे (ऍण्ड येट इट मूव्हज म्हणजे पृथ्वीच फिरते) असं म्हणाले की नाही ते आज आपण मानतो हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय आहे.































































