मुद्दा – हीच ती वेळ…

>> गीता आदिनाथ हरवंदे

एके वर्षी गणेश दर्शनासाठी एका यजमानांकडे गेलो होतो. त्या दिवशी गौरी आगमन झालं होतं. मी सहज विचारलं, ‘‘तुम्ही गौर आणत नाही.’’ यजमानबाई म्हणाल्या, ‘‘नाही, आमची गौर वाघाने नेली आहे. त्यामुळे आमच्या घराण्यात गौराबाई येत नाहीत. आम्ही नुसताच गणपती आणतो.’’ मला कुतूहलमिश्रित गंमत वाटली. तिथे एक म्हणाली, ‘‘आमच्या गणपतीजवळ उंदीर लागतोच.’’ दुसरी म्हणाली, ‘‘आमचा गणपती सर्पासहित असतो. एका वर्षी आम्हाला सर्प असलेला गणपती कुठे मिळेनाच. मग आम्हीच घरी मातीचा सर्प बनवून रंगरंगोटी करून गणपतीजवळ स्थापना केली. तेव्हापासून आम्ही आगाऊ नोंदणी करू लागलो. अहो, पूर्वी चुकून बिनसर्पाचा गणपती आणला गेला. त्या रात्री मूर्तीचा हात गळून पडला, असं आम्हाला सांगितलं गेलं. देवाच्या बाबतीत परीक्षा घ्या कशाला?’’

गौरींच्या बाबतीतही प्रत्येकीच्या वेगवेगळय़ा प्रथा ऐकायला मिळाल्या. कोणाकडे एक गौर, तर कोणाकडे दोन गौरी येतात. एक गौर घरचीच लक्ष्मी तर दुसरी गौर बाहेरून आणली जाते ती ज्येष्ठा गौर होय, तर काही ठिकाणी लक्ष्मीची मोठी बहीण जी अलक्ष्मी हिचीही पूजा त्या दिवशी मुद्दाम केली जाते. तर काही घरी गौर म्हणजे पार्वतीची गणपतीची माता म्हणून पुजली जाते. त्यातही पुजनाच्या अनेक प्रथा.

एकेकांच्या कथा, प्रथा-परंपरा ऐकत असताना मी त्यांना म्हटलं, ‘‘मी थोडं बोलू का?’’

एकाच क्रतासाठी, सण-उत्सवासाठी किती वेगवेगळय़ा प्रथा आहेत… या आपण मानवांनीच पाडलेल्या आहेत नाही का? शेवटी साऱयांचा उद्देश एकच आहे – जीवन सुकर होणे. आपण बसलो आहोत या घरचंच उदाहरण घ्या. कोणे एकेकाळी या घराण्यातील एक स्त्राr गौर आणावयाला रानात गेली असता तिला वाघाने खाल्ली. त्या रागाने या घराण्यात गौरीची स्थापना करीत नाहीत. एवढेच नव्हे तर दुसऱया घरी जाऊनही ते गौरीची पूजा करीत नाहीत. एवढा पिढय़ांपिढय़ांचा राग धरूनही गौर काही त्यांच्यावर रुसली नाही. ती प्रसन्नच आहे हे आपण प्रत्यक्ष पाहतोच आहोत. मग काळाप्रमाणे आपण आपल्या सवयी बदलायला नकोत का? आता तुम्ही गौर आणायला जाता का रानात? कारण ती आपण शिल्लकच ठेवली नाही! मग तुम्ही आता बाजारात मिळणाऱया वस्तूंवर भागवता. पण तिची प्रतिष्ठापना करताच. तरीही गौर प्रसन्न आहेच. कारण ती मनात हवी, आचारात-विचारात हवी.

माझं बोलणं ऐकून एकीने आपला अनुभव सांगितला. अहो, आमच्या घरी माझ्या दिराच्या हट्टास्तव नागोबा आणण्याची प्रथा होती. बाजारात सर्व नाग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मिळतात. पुजनानंतर संध्याकाळी झाडाच्या बुंध्यात किंवा रानात नेऊन ते ठेवायचे. आता आपण सोसायटीत राहतो. सोसायटीच्या लहानशा बागेत ते कुठे ठेवायचे, शिवाय ते पावसाच्या पाण्यात विरघळतही नाहीत. मग मी यावर तोडगा काढून पिठाचे नाग बनवू लागले. दुसऱया दिवशी ते पक्ष्यांना खाऊ घालू लागले; पण एका वर्षी पक्ष्यांनी ते खाल्लेच नाहीत. आता तर मी नागाचं चित्र काढून पूजा करते. हा सारा बदल करताना मनात कसलाही किंतू-परंतु आणत नाही. शेवटी भाव तोचि देव.

प्राचीन काळी गणेश चतुर्थीस पार्थिव मूर्ती, तीसुद्धा अंगठय़ाएवढी तयार केली जायची. त्यासाठी शेतातल्या मातीचा उपयोग केला जायचा. तिची पूजा, आरती, नैवेद्य झाल्यावर त्याच दिवशी वाहत्या जलात अथवा शेतात विसर्जन केलं जायचं. पार्थिव मूर्तीतील देवत्व केवळ त्याच दिवसापुरतं असतं. पण आता आपण सारे संकेत झुगारून निरनिराळय़ा शर्यतसुदृशतेने उत्सव करू लागलो आहोत. देवत्वातलं पावित्र्य नष्ट करून क्रतभंगाचं पाप मात्र करू लागलो आहोत. यात कोणाचंच दुमत नसेल. आपण आपले देव रस्त्यावर कुठेही, कसेही बसवू लागलो आहोत. शुचिर्भुतपणाचं नामोनिशाण असत नाही. सार्वजनिक उत्सव जे टिळकांनी सुरू केले ते त्या काळाची गरज होती. आज त्याचं काय झालं आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.

हीच ती वेळ आहे… आपल्याला बदलण्याची… अन् ती संधी कोरोनाने आपल्याला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या