
उत्तराखंडातील एका अनोख्या लायब्ररीची चर्चा सध्या सगळीकडे आहे. ही कुठल्या चार भिंतीच्या आड असलेली वा कुठल्याही शैक्षणिक संस्थेची लायब्ररी नाही. ही घोडा लायब्ररी आहे. दुर्गम भागांतील मुलांना अद्ययावत साधने सोडाच, साधे पुस्तकही वाचायला मिळणे कठीण असते. त्यांच्यापर्यंत पोहोचणारी वाटच खडतर असल्याने पुस्तके मिळत नाहीत. अशा परिस्थितीत कुमाऊ गावातील घोडा लायब्ररी मुलांना आणि मोठय़ांना आवडू लागली आहे.
नैनितालचे रहिवासी 29 वर्षीय शुभम बधानी यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. ते स्वतः प्रशिक्षित ग्रंथपाल आहेत. तसेच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अशी शुभम बधानी यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मार्ग सापडला आणि त्यांनी घोडय़ावर फिरणारी लायब्ररी सुरू केली. त्यांची कल्पना स्थानिकांनी लगेचच उचलून धरली आणि त्यांना घोडे दिले. ‘हिमोत्थान’ आणि ‘संकल्प युथ फाऊंडेशन’ या दोन स्वयंसेवी संस्थांनी पुस्तके आणि निधीची जबाबदारी स्वीकारली. ‘आमचे स्वयंसेवक पुस्तकांचे वितरण करतात आणि वाचनसत्र आयोजित करतात,’ असे बधानी यांनी सांगितले. गावोगावी जाऊन मुलांना पुस्तके दिली जातात. ही पुस्तके त्यांना आठवडाभर ठेवण्याची मुभा असते. त्यानंतर पुस्तके गोळा करण्यासाठी ते दुसरी फेरी काढतात आणि त्यांना नवीन पुस्तके देतात.

























































