विज्ञान-रंजन – ‘बूमरँग वॉकर’चे भाकीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

परवा एका मित्राचा फोन. ‘तुला विज्ञानातलं कळतं ना?’ हा प्रश्न. मी म्हटलं, ‘थोडंसं.’ तर तो म्हणे की, हे एल निनो, नानी, नानू, निना काय प्रकरण आहे? म्हटलं, ते फक्त एल निनो आणि ला निना एवढंच आहे. ‘बरं. तेच ते, पण त्याचा नि पावसाचा काय संबंध?’ दरवर्षी अशी चर्चा कित्येक वर्षं ऐकतोय. ‘ऐकतोस ना? आणि स्वतःला टेक्नोसॅव्ही वगैरे म्हणतोस ना. मग जा नेटवर आणि शोध.’ ‘एवढा वेळ कुणाला आहे!’ हे यावरचं उत्तर. वर ‘मग तुम्हा पत्रकारांचं काम काय?’ असाही टोला. त्याला म्हटलं, ही सगळी गोष्ट थेट ‘बूमरँग वॉकर’पर्यंत जाते. त्याचा पलीकडे आश्चर्याने ‘आ’ झाला असावा!

गंमत जाऊ द्या. पाऊस कमी होणार असेल तर ‘एल निनो’ आणि समाधानकारक होणार असेल तर ‘ला निना’ची चर्चा जगात सर्वत्र होते. या वर्षी आपल्याला ‘एल निनो’चा इशारा मिळालाय. हे दोन्ही स्पॅनिश शब्द आहेत. ‘एल निनो’ म्हणजे बॉय पिंवा मुलगा आणि ‘ला निना’ म्हणजे मुलगी. वातावरणीय बदलात तीव्र उन्हाळी जलप्रवाह दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला (म्हणजे द. अमेरिका खंडाच्या पश्चिमेला) पॅसिफिक सागरात तयार होतात, त्याच्या तीव्रतेला ‘एल निनो’ म्हणतात. अशा वेळी साहजिकच तिथली हवा तापते. त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पाण्याची वाफ आणि त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील पाऊस तिकडे ‘खेचला’ जातो आणि हिंदुस्थानी उपखंडातल्या चार महिन्यांच्या ‘पावसाळा’ या संपूर्ण जलऋतूवर विपरीत परिणाम होऊन आपल्याकडे पाऊस कमी होतो.

तीव्र आणि क्षीण वाऱयांच्या-वादळांच्या प्रभावाने सागराच्या पाण्याची नेहमीची गती बिघडून अधिक घुसळण होऊन तप्त प्रवाह बनतो एवढंच सोप्या शब्दांत सांगता येईल. त्याचा परिणाम कसा होतो ते आधी सांगितलंच. आता ‘ला निना’च्या बाबतीत उलट परिणाम झाल्याने एल निनो साधारण डिसेंबरात नाताळात जाणवतो. म्हणून त्याला ‘बॉय चाइल्ड’ असं नाव पडलं. ‘ला निना’मध्ये कर्क आणि मकर वृत्तांच्या मधल्या उष्ण कटिबंधातील समुद्रावर थंडावा आल्याने पावसाळी ढग भरपूर पाऊस पाडतात. अर्थात ही भाकितं तंतोतंत खरी ठरतात असं नव्हे. यावेळीही पाऊस लांबणार म्हणता म्हणता तो आपल्याकडे अंदमानमध्ये आल्याचं वृत्त आहे. कदाचित हा लेख वाचेपर्यंत ‘धो-धो’ पावसाचा अनुभव येत असेल किंवा कडक उन्हाचा!

मात्र या ‘एल निनो’ हवामान प्रारूपाशी हिंदुस्थानचा जवळचा संबंध आहे. इंग्रजी राज्यात देशाची भयंकर लूट झाली हे तर सर्वच मान्य करतात, पण ज्या काही बऱया गोष्टी झाल्या त्या इथल्या अभ्यासू प्रशासकांमुळे. त्यातलीच एक गोष्ट ‘बूमरँग वॉकर’ यांची. त्यांचं खरं नाव गिल्बर्ट वॉकर. जन्म 1868 मधला. तब्बल 90 वर्षांच्या आयुष्यात या संशोधकाने हिंदुस्थानातील हवामानावर संशोधन करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. गणित, एअरोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोमॅग्नॅटिझम अशा अनेक विषयांत गती असलेले वॉकर रँग्लर होते. आपल्याकडचं हवामान खातं सुरू करताना त्याची जबाबदारी सोपवली गेली होती हेन्री ब्लॅन्डफिल्ड यांच्यावर. 19 व्या शतकात हा विभाग सुरू झाल्यावर हिंदुस्थानातील पावसाळा हिमालयातील बर्फवृष्टीवर अवलंबून आहे असं ब्लॅन्डफिल्ड यांना वाटलं. मात्र 1892 नंतर ही भाकितं चुकत गेली. त्यानंतर आलेले डायरेक्टर जॉन इलियट यांनी हिंदुस्थानातील पावसाळय़ाचा संबंध सागरी वाऱयांशी असल्याचं सूचित केलं.

1904 मध्ये पेंब्रिजमधली प्राध्यापकी नोकरी सोडून गिल्बर्ट वॉकर हिंदुस्थानात आले आणि हवामान खात्याचे संचालक बनले. यूल यांच्यासह अभ्यास करताना त्यांना हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरावरील वातावरणीय दाबाचा आणि त्यातून निर्माण होणाऱया परिणामांचा अंदाज आला. त्याला त्यांनी ‘सदर्न ऑसिलेशन’ (दक्षिणी सागरजलातील बदल) असं नाव दिलं. ‘एल निनो’ असं त्याला दक्षिण अमेरिकेतले दर्यावर्दी आधीपासूनच म्हणत होते. त्याचं वैज्ञानिक कारण गिल्बर्ट वॉकर यांनी शोधलं. त्यांच्या या महत्त्वपूर्व संशोधनाबद्दल त्यांना 1911 मध्ये ‘ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ अशी पदवीही प्राप्त झाली होती.

वॉकर यांच्यापूर्वीही अनेकांनी उष्ण-शीत सागरी प्रवाहांचा अभ्यास केला होता. साधारण 1300 वर्षांपासून या ‘एल निनो’ प्रकाराची जाणीव दर्यावर्दींना होती. 1525 मध्ये त्याचा पहिल्यांदा उल्लेख झाला. 1900 पासून 100 वर्षांत 30 वेळा एल निनोचा फटका हिंदुस्थानातील पावसाला बसला. त्यापूर्वी 1789 ते 93 मध्ये याच ‘पॅटर्न’ने युरोपला दुष्काळाच्या खाईत लोटलं होतं. त्यातून फ्रेंच क्रांतीला जोर आला. 1876 मध्ये चीनमधल्या दुष्काळात सुमारे 1 कोटी लोकांचा बळी गेला होता असं म्हटलं जातं. पेरू देशातील खलाशी ज्याला ‘एल निनो’ म्हणतात त्याचा हवामान (विशेषतः पाऊस) बदलाशी संबंध आहे असं 1888 मध्ये चार्ल्स टॉड यांनी म्हटलं. मात्र ‘एल निनो’ (आणि त्याविरुद्ध तो ‘ला निना’), सदर्न ऑसिलेशन इम्पॅक्ट’ अशी संकल्पना साधारण 1924 पासून जगप्रसिद्ध झाली ती वॉकर यांच्यामुळे. तीन ते पाच पिंवा सात वर्षांच्या फेऱयाने हे परिणाम दिसून येतात. मात्र हे गणित पक्पं नाही. शेवटी निसर्गाची लहरच श्रेष्ठ.

गिल्बर्ट वॉकर हे या भाकितामधले एक प्रमुख भागीदार. हिंदुस्थानातल्या वास्तव्यात त्यांनी सिमला येथे जलरंगात सुंदर चित्रं काढली. तेथील पक्ष्यांच्या उड्डाणाच्या पद्धतीचा अभ्यास करताना त्यांना ते ‘बूमरँग’ या पारंपरिक अस्त्राच्या गतीने उडतात असं वाटलं. त्यावरून त्यांनाच ‘बूमरँग वॉकर’ असं नाव पडलं, पण त्यांचं संशोधन मात्र कधी बूमरँगसारखं त्यांच्यावर उलटलं नाही!