गुगल हेर…

269

>> अमित घोडेकर

समाज माध्यमांमधून आपली प्रत्येक गोष्ट अक्षरशः जगजाहीर होते. गुगल आपल्या एका नवीन तंत्रज्ञानातून आपली व्यक्तिगत माहिती त्याच्याकडे साठवून ठेवत आहे.

मोबाईल/इंटरनेटवर वापरले जाणारे बरेच सॉफ्टवेअर हे आपला पाठलाग करत असतात आणि आपल्याला त्याचा मागमूसदेखील नसतो. इंटरनेट विश्वातील दादा कंपनी गुगलदेखील अनेक प्रकारे आपली बरीच माहिती आपल्याला माहीत नसताना त्यांच्याकडे साठवून ठेवत असते. काही दिवसांपूर्वी गुगलने गुगल नाऊ नावाची एक सेवा मोबाईलवर सुरू केली होती. या सेवेच वैशिष्टय़ म्हणजे तुम्हाला काहीही शोधायची गरज नाही सर्व माहिती गुगल तुम्हाला स्वतःहून देणार. उदा. जर तुम्ही सकाळी तुमच्या घरातून निघून कामावर जात असाल तर गुगल तुम्हाला सकाळी सांगणार की आज तुम्ही जात असणाऱया रस्त्यावर ट्रफिक आहे की नाही तुम्हाला तुमचे ऑफिस गाठायला किती वाजणार आज दिवसभरात तुम्ही कोणाकोणाला भेटणार.

खरंतर आपल्याला हे वापरताना ही सर्व माहिती किती सोयीची असा विचार करतो. पण ही माहिती मिळवण्यासाठी गुगल तुमच्यावर 24 तास प्रत्येक वेळेस नजर ठेवून असतो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे गुगल इंटरनेट किंवा जीपीएसचा वापर करून तुमच्या प्रत्येक ठिकाणाचा तुमच्या प्रत्येक भेटीगाठीची अतिशय सूक्ष्म अशी नोंद करत असते. अशी माहिती जर चुकूनदेखील कोणाच्या हाती पडली तर तुम्ही समजू शकता की तिचा कशा प्रकारे गैरवापर केला जाऊ शकतो.

काही दिवसांपासून तर गुगलने अजून एक नवीन सेवा सुरू केली आहे. गुगल हँगआऊट हे सेवादेखील तुमचे सगळे एश्ए तुम्हाला माहीत नसताना त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करून ठेवत आहे अगदी तुमचे फोटो देखील. गुगल झेप इथेच थांबली नाही तर गुगल तुम्ही जर एखाद्या वाहनातून प्रवास करत असाल आणि जर तुम्ही गुगलचा नकाशा वापरला तर गुगल तुमची मुव्हमेंटदेखील स्टोर करतो. गुगल जर आपण गुगल मॅप्स वापरत असू तर गुगलला हे माहीतच असते की, अमुक व्यक्ती दररोज कुठे कुठे जातो, काय खातो आणि काय पितो, कारण तुम्हीच तुमचे सगळे फोटो गुगलवर ठेवता मोबाईलमधल्या अनेक ऍप्स आपला डेटा चोरत असतात. काही ऍप्स तुम्हाला माहीत नसताना तुमच्या मोबाईलचा स्पीकर, मायक्रोफोन अगदी कॅमेरा चालू करून तुमचे कॉल्स, फोटो आवाज अशा अनेक गोष्टी चोरत असतात. अशा सगळ्या महितीचा वापर नंतर अनेक गोष्टींसाठी केला जातो.

कल्पना करा तुमची अशी सर्व वैयक्तिक माहिती जर कोणी तुम्हाला माहीत नसताना वापरली तर? पाश्चात्य देशात गुगलच्या या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱया या माहिती चोरीवर अनेक खटले चालू आहेत. चीनसारख्या देशाने तर गुगल आणि फेसबुकच्या अनेक सेवा कित्येक दिवसांपासून बंद केल्या आहेत, पण याच सेवांचा हिंदुस्थानात आणि इतर देशांत मात्र आपण सर्वजण अजाणतेपणाने सर्रास वापर करत आहोत. याच सर्व माहितीचा वापर करून मग अनेक हॅकर्स पुढे अनेक लोकांना गंडादेखील घालतात. अनेक प्रकारे लोकांची लुबाडणूक करतात. त्यामुळे संगणक आणि मोबाईल आणि इंटरनेट वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी व ती म्हणजे कोणीतरी आहे तिथे…जो आपला पाठलाग करत आहे.

गेल्या वर्षात सगळ्यात जास्त गुन्हे मोबाईलवरून झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजकाल आपण जवळपास सगळ्याच गोष्टी मोबईलवरून करत असतो. अगदी पिझ्झाची ऑर्डर असो किंवा विमानाचे तिकीट असो किंवा बँकेचे व्यवहार असोत सगळं काही मोबाईलवरच. याच मोबाईलवरून आपण फेसबुक पण वापरत असतो आणि व्हॉट्सऍप पण वापरत असतो. अगदी याच मोबाईलवरून आपण आपले फोटो पण काढत असतो आणि तेच फोटो शेयर पण करत असतो आणि याच मोबाईलचा वापर आपण अनेकदा प्रवास करण्यासाठीदेखील करत असतो म्हणजे प्रवासात एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून नकाशाचा वापर करतो आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यावर आपण त्या ठिकाणाबद्दलची माहितीदेखील समाजमाध्यमाद्वारे शेयर करतो. म्हणजेच आपल्या दिवसाची सुरुवात मोबाईलने होते आणि दिवसाचा शेवटदेखील मोबाईलवरच होतो असा हा मोबाईल जर चोरी झाला किंवा कोणी जर तो चोराला आणि जर त्यात काहीही सुरक्षा प्रणाली लावली नसेल तर काय होऊ शकते याची फक्त कल्पनाच करा.

फेसबुकने सगळ्या लोकांचा डेटा केंब्रिजला विकल्यावर तर कोण गजहब झाला आणि तुमच्या आमच्या सगळ्यांनीच प्रायव्हसीच्या नावाने बोलायला सुरुवात केली. मग तिकडे अमेरिकेत तर चक्क मार्क झुकरबर्गला तर अमेरिकन काँग्रेसमध्ये बोलावून त्याची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. आपण सगळ्यांनी रडवेला मार्क झुकारबर्ग टीव्हीवर बघितला हे सगळं कशामुळे तर अमेरिकन लोकांना असे वाटले की, फेसबुकने त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. मग त्यातून त्यांनी प्रायव्हसीसाठी अनेक कठोर तरतुदी करायला सुरुवात केली. मोबाईलमधली गुन्हेगारी इथून पुढे खूप मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे आणि आपल्यालाच आपला बचाव करावा लागणार आहे नाहीतर कोणताही सायबर चोर येऊन तुमच्यावर कधीही दरोडा घालून जाईल गरज आहे ती थोडय़ा जागरूकतेची.

मोबाईलचा सुरक्षित वापर कसा करालः
संगणकाप्रमाणे मोबाईलवरदेखील अँटिव्हॉयरस वापरणे गरजेचे झाले आहे, आजकाल बरेच अँटीव्हॉयरस स्वस्तात मिळतात.
कोणताही गेम किंवा ऍप इंस्टॉल करण्यापूर्वी ते तुमच्या मोबाईलमधली कोणती माहिती गोळा करणार आहे ते तपासून घ्या.
कोणत्याही पॉपऍप आलेले सोफ्टवेअर/गेम्स/ऍप इंस्टॉल करू नका.
सोशल नेटवर्कवर अतिशय वैयक्तिक माहिती शेयर करू नका.
प्रत्येक मोबाईल ऍप्स इंस्टॉल करताना ती मोबाईल ऍप्स मूळ कंपनीची आहे की नाही याची खात्री करून घ्या.
मोबाईलला पासवर्ड किंवा बायोमॅट्रिक सुरक्षा लावा.
आपला मोबाईल अनोळखी लोकांना वापरायला देऊ नका.
आपल्या मोबाईलमधून झालेल्या कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती तुमच्या बँक किंवा संस्थेला कळवा.
अनोळखी लोकांना तुमची माहिती ईमेल किंवा फोन मेसेजवर शेयर करू नका.

आपली प्रतिक्रिया द्या