
>> योगेंद्र ठाकूर/वामन भोसले
फोर्ट, हुतात्मा चौक, नरीमन पॉइंट हा मुंबईचा आर्थिक केंद्रबिंदू असलेला परिसर आहे. या विभागातील विविध आस्थापनांतील अमराठी लोकांना शिवरायांचे शौर्य व मराठी अस्मितेचे दर्शन घडावे, शिवरायांचे शौर्य तेजाने झळाळून यावे आणि मराठी कला संस्कृतीच्या आविष्काराचे दर्शन अमराठी लोकांना घडावे म्हणून 1978 सालापासून लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते. 1978 साली सुरू झालेले हे ‘शिवराय संचलन’ आजही अव्याहतपणे सुरू आहे, सुरू राहील.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे व मराठी माणसाचे आराध्य दैवत, मराठी तरुणांचे व हिंदूंचे स्फूर्तिस्थान, हिंदुस्थानचे रक्षणकर्ते. त्यांचा शिवजयंती सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने, आनंदाने व अभिमानाने शिवसेनेतर्फे साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे फोर्ट, हुतात्मा चौक, नरीमन पॉइंट ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वार या मुंबई परिसरात शिवराय संचलनाचे शानदार आयोजन गेली चाळीस वर्षे केले जात आहे. आज महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या वर्षीच्या लोकाधिकारच्या शिवराय संचलनाचे वेगळे-आगळे महत्त्व आहे.
फोर्ट, हुतात्मा चौक, नरीमन पॉइंट हा मुंबईचा आर्थिक केंद्रबिंदू असलेला परिसर आहे. या विभागातील विविध आस्थापनांतील अमराठी लोकांना शिवरायांचे शौर्य व मराठी अस्मितेचे दर्शन घडावे, शिवरायांचे शौर्य तेजाने झळाळून यावे आणि मराठी कला संस्कृतीच्या आविष्काराचे दर्शन अमराठी लोकांना घडावे म्हणून 1978 सालापासून लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते. त्यात विविध आस्थापनांतील समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व शिवप्रेमी जनता मोठय़ा अभिमानाने, उत्साहाने सहभागी होते.
सुरुवातीच्या काळात नेव्हल डॉकयार्डमधील ‘महाराष्ट्र मित्र मंडळा’तर्फे तेथील कर्मचारी कट्टर शिवसैनिक शरदचंद्र आमोणकर जहांगीर कलादालन ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वारपर्यंत मर्यादित स्वरूपाचे शिवराय संचलन करीत असे. त्या काळी मराठी भाषा संस्कृती व इतिहास या सर्व विषयी केंद्रीय आस्थापनातील अमराठी माणसांना काही देणे-घेणे नव्हते, एकप्रकारे द्वेषच होता. अशा वेळी नेव्हल डॉकयार्डमध्ये एक शिवसैनिक शिवाजी महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडवतो व परिणामाची तमा न बाळगता शिवराय संचलन यशस्वी करतो याचे सर्वत्र कौतुक झाले. लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनाही याचा अभिमान वाटत होता.
त्या वेळी सर्वत्र स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे आंदोलने होत होती. मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य ही शिवसेनेची भूमिका पटत होती, जनसामान्यात रुजत होती. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष व शिवसेना नेते सुधीर जोशी आणि सरचिटणीस गजानन कीर्तिकर यांना शरदचंद्र आमोणकरांकडून प्रस्ताव आला की, लोकाधिकार महासंघातर्फे शिवराय संचलनाचे भव्य आयोजन फोर्ट-नरीमन पॉइंट परिसरात व्हावे; जेणेकरून मराठी माणसांचे अस्तित्व व शिवरायांचे शौर्य व कर्तृत्व या सर्वांचे महत्त्व अमराठी माणसांनाही कळून येईल. त्यांची सूचना महासंघाला पटली. आपण सर्व शिवरायांचे व शिवसेनेचे पाइक आहोत. तेव्हा महासंघातर्फे शिवराय संचलनाचे आयोजन करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आणि 1978 साली सर्वप्रथम स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ‘शिवराय संचलन’ भव्य प्रमाणात आयोजित केले.
त्यानंतर आजतागायत हॉर्निमन सर्कल, हुतात्मा चौकमार्गे हे शिवराय संचलन हिंदुस्थानच्या प्रवेशद्वारापर्यंत संपन्न होते. रिझर्व्ह बँक, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, हवाई कंपन्या, माझगाव डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, संशोधन संस्था, रेल्वे उद्योग, मुंबई महानगर टेलिफोन, टपाल, भविष्य निधी, ओएनजीसी, आयुर्विमा महामंडळ व खासगी उद्योगातील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मराठी कर्मचारी मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात. हिंदुस्थानचे प्रवेशद्वार येथील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून सांगत होते. संपूर्ण संचलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत, ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत सर्व चाकरमानी मराठीजन मोठय़ा आनंदात व जल्लोषात सहभागी होत असतात.
फोर्ट-नरीमन परिसरातील केंद्र व राज्य सरकारची आस्थापने, बँका आदी आस्थापनांची दारे कधीकाळी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी अमराठी लोक उघडत नव्हते. शिवसेना व लोकाधिकार महासंघाच्या लढय़ामुळे त्याच आस्थापनात मराठी तरुणांस न्याय मिळाला. आज तीच मंडळी त्या आस्थापनांच्या खिडकीतून लोकाधिकार समिती महासंघाचे भव्यदिव्य शिवराय संचलन पाहत असतात. हा शिवसेना व लोकाधिकारच्या लढय़ाचा व चळवळीचा विजय आहे, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका शिवराय संचलनात मार्गदर्शन करताना काढले होते.
या वर्षी शिवराय संचलनास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते, उपनेते, राज्याचे मंत्री व लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांच्या पदाधिकाऱयांना पार पाडलेल्या बैठकीत शिवराय संचलन शानदार करण्यासाठी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी कार्यरत आहेत.
आषाढी एकादशीच्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱयांप्रमाणे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्यकर्ते त्याच भक्तिभावाने आजही मोठय़ा उत्साहात शिवराय संचलनात सहभागी होतात. 1978 साली सुरू झालेले हे ‘शिवराय संचलन’ आजही अव्याहतपणे सुरू आहे, सुरू राहणार आहे.



























































